Monday 16 May 2016

आत आणखी एक खोली असतेच..

२७ १२ १९९७

उठायला उशीर झालाय. करावंसं वाटतंय त्याची आणि करावं लागतंय त्याची एकमेकांत झटापट चाललीय. ‘करावं लागतंय’ त्याचीही मी आभारी आहे. कारण त्यामुळे करावंसं वाटतंय त्यातली ओढ, उत्कटता वाढतेय. आज या झटापटीत सगळं उलटं सुलटं चाललंय.

परवा एकदा प्राणशक्तीशी स्वतःला जोडणं म्हणजे काय? हे उमगलं. ते मी लिहिलं. ते लिहिताना हेही आत कुठेतरी लुकलुकत होतं की माझं हे उमगणं म्हणजे आत्तापर्यंत या संदर्भात कुणी कुणी काय काय म्हणून ठेवलंय ते समजून घेणं आहे फक्त. प्रत्यक्ष अनुभूतीचा क्षण कसा असेल?
***

२९ १२ १९९७

आज एक झाड बघितलं. त्याला टेकवून एक सायकल उभी करून ठेवली होती. एखादी काठी रोवून ठवल्यासारखा तो एक निष्पर्ण बुंधा होता अगोदर. मी जातायेता रोज बघायची. त्याला हळू हळू पानं फुटली. एकापुढं एक पानं येत गेली तशा त्यांच्या फाद्या झाल्या. ( कसं ना पानं येतायेताच फांदी बनत/घडत जाते... मग पानं गळून पडली तरी फांदी तशीच राहते. नव्या पानांसाठी. त्यांना उगवून येण्याच्या खुणा जपत...) एक दिवस त्या झाडाकडे विशेष लक्ष गेलं. त्याचा आकार नृत्याच्या एखाद्या मुद्रेसारखा झाला होता. मग ते तसंच वाढत राहिलं. झाड झालं. इतर अनेकांसारखं. इतर अनेकांत मिसळून गेलं. आज पुन्हा एक काठी रोवल्यासारखा बुंधा दिसला तेव्हा या सगळ्याची आठवण झाली. मागे वळून पाहिलं तर तो वाढून झाड झालेला आधीचा बुंधा झाड म्हणून बाजूला उभा होता. कुणीतरी त्याला सायकल टेकवून ठेवली होती.

***

३१ १२ १९९७

आज सकाळी प्रार्थनेच्या वेळी मी स्वतःसाठी प्रार्थना केली. असूदे इच्छा. असतेच ना ती आत. आज व्यक्त केली मनातल्या मनात. विसरण्यासाठी. त्यातून मुक्त, दूर होण्यासाठी. असं होता यावं ही पण एक इच्छा धरायला हवी.

हे वर्ष कसं गेलं कळलं नाही. ज्यात रमावं, चवीचवीनं आनंद घ्यावा अशा घटनाही पटकन दृष्टिआड झाल्या.

आता एम. ए. करायचं डोक्यात आहे. त्याचा ताण घ्यायचा नाही असं ठरवलं तरी पुन्हा पुन्हा येतोच आहे. येऊदे. त्याला त्याच्या जागी बसवून मी आत जाईन. आत आणखी एक खोली असतेच. आतल्या खोल्यांचा शोध लागत जाईल अशामुळे..!


***  

No comments:

Post a Comment