Sunday 15 May 2016

पूर्ण विकल्परहित अवस्था म्हणजे श्रद्धा..!

२० १२ १९९७

काळजी, दोलायमानता, होईल की नाही.. काय होईल.. असा कोणताही विकल्प नसलेली पूर्ण विकल्परहित अवस्था म्हणजे श्रद्धा..! पण अशी अवस्था प्राप्त होणं अवघड आहे. म्हणून विकल्पांच्या जागी काही तरी नेमलं जातं. त्यावर श्रद्धा ठेवली जाते. पण ही एक तात्पुरती सोय आहे हे लक्षात घ्यायला हवं...!

*
झाडं धुक्यात बुडली होती. दूर डोंगरांवरची झाडं अंधुक दिसतात तशी अगदी जवळचीही दिसत होती. पारंब्या जमिनीत घुसून खोड होता होता दोन वटवृक्ष एकच असल्यासारखे सलग झालेयत. त्या वटवृक्षाच्या पलिकडे दूर एक दिवा लागला होता. धुक्यातून दिवेही विस्कटलेला प्रकाश संभाळत असल्यासारखे दिसत होते. त्या एक झालेल्या वटवृक्षाच्या दाट फांद्यांमधे छोट्या खिडकीएवढा भाग मोकळा होता. तिथून तो दिवा दिसत होता. दुरून तो त्या झाडाचाच प्रकाशित अवयव असल्यासारखा दिसत होता. जाता जाता दिसलेले ते दृश्य स्मरणात राहिले...
***

२२ १२ १९९७

अजूनही खूप दाट धुकं आहे. खिडकीतून दिसतंय. धावत जावंसं वाटलं धुक्यात. का वाटते त्यात मजा? निघाले. उशीर झाला होता तरी. घरातल्याच कपड्यात होते तरी. दार उघडलं. बाहेर पाऊल टाकणार तर खाली जिण्यात एक कुत्र दिसलं. वर बघत होतं. मी त्याच्याकडे बघितलं तर तोंड वळवून जिण्यात बसून राहिलं. मी जाऊ नये असं वाटत असल्यासारखं. मग घरात आले. बाल्कनीचं ग्रील उघडून बघितलं डोकावून. पुन्हा दाट धुकं दिसलं. पुन्हा जावंसं वाटलं. पण न जाता आतच आले... कधी कधी सौंदर्य न अनुभवणं हाही एक अधिक तरल अनुभव असू शकतो...!
***

२६ १२ १९९७

आजही खूप धुकं होतं. या धुक्याला क्षणभर आकाश मानून ‘आले दारात आकाश’ हा आनंद निःसंकोच का घेऊ नये? साध्या योगायोगाला ‘विठ्ठलाची कृपा’ मनण्यात केवळ एक रीत, सवय असेल. पण याची सुरुवात ज्याने केली, ज्याच्या तोंडून हे प्रथम उमटले त्याच्या मनात तेव्हा कोणते भाव असतील? नम्रता भक्ती अंहकारविरहितता.. असेलच. पण योगायोगातल्या अश्चर्य-भावनेला कृपेचा अमूर्त रंग देण्यात काव्यही आहे... काल बोलता बोलता विचार करण्याचा हा एक दर्शनबिंदू सापडला.

तुकारामांचे भक्तीचे तत्त्वज्ञान समजून घ्यायचेय. ‘बोलविता धनी वेगळाची’ ही अवस्था तर कुठल्याही कलाकाराची असते. पूर्ण निर्मिती-प्रक्रियाच अबोधपणे होत असते. शास्त्रीय चिकित्सा करून त्याचे भलेही कुणी विश्लेषण करोत पण त्या प्रक्रियेवर आपले नियंत्रण नसते. ती प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून काही करता येत नाही कुणाला. शिवाय त्याची शास्त्रीय चिकित्सा एका बाजूला आपलं बौद्धिक काम करत असली तरी अशा अनुभवाचे ‘बोलविता धनी वेगळाची’ असे काव्यात्म वर्णन भावनिक पातळीवर वेगळ्या स्तरावरचे आकलन करून देणारे असते..!

*** 

No comments:

Post a Comment