१ जानेवारी १९९७
या वर्षाची सुरवात चांगली झाली. गेल्या वर्षभर
डायरी लिहिली याचं समाधान वाटलं. हे लेखन म्हणजे केवळ भावनीक आलेख नाही. ते बोट
धरून पुढं नेतं. मनात आलेला प्रश्न लिहिता लिहिता उत्तर समोर येतं. कितीतरी
सूक्ष्म गोष्टी आतून उलगडतात, हे वाटणं या लेखनात टिपलं जातं.
तरी याही वर्षी
डायरी लिहावी की नको असा विकल्प मनात आला. लिहिण्यामुळे relaxation मिळतं हे खरंच पण
त्याचमुळे expression ची
गरज भागून जाते. काही तीव्र वाटण्यांच्या कविता होत नाहीत. मनात काही खदखदत असलं
की कधी कधी अनावरपणे कविता लिहिली जाते. या लेखनामुळे तपशील लिहिण्याची, एकाच
गोष्टीच्या अनेक बाजू उकलण्याची, त्या मांडण्याची सवय होतेय. कवितेला हे पोषक आहे
की नाही कोण जाणे.
परवा वर्षभरात काय
कमावलं त्याचा आढावा घेतला तेव्हा, छान वाटतंय, Positive
thinking जमतंय असं वाटलं पण काल संध्याकाळ पर्यंत दमायला
झालं. अनुराधा आली होती तिच्याशी बोलताना हे त्यातून डोकावत होतं. तिचा आवाका आणि
रुटीन ऐकून थक्क व्हायला होतं नेहमीच. काल तिच्याविषयी विचार करताना लक्षात आलं की
ती मेडीटेशन, प्राणायाम, योगासनं इ. निष्ठेनं करते आणि कामाला लागते. आपला विचार
करण्यातच बराच वेळ जातो. हे बरं की वाईट असं फारसं वाटलं नाही. तरी तसं काहीसं मनात
आलंच. रात्री झोपताना अंघोळ केली. तेव्हाच रेकी घेतली. तेव्हा मनात आलं काही विचार
न करता आयुष्यभर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन कुणी कुणी काढलेले निष्कर्ष आपण
मानून टाकावेत आणि कामाला लागावं उगीच शिणू नये... पण मग माझं काम कोणतं ? कदाचित
असा मूलभूत विचार करणं हेच. कारण मी ते थांबवू शकत नाहीय.
No comments:
Post a Comment