९ मार्च १९९७
ऋतुचक्रासारखे
पुन्हा पुन्हा आरुन फिरून पराभवांच्या त्याच त्याच खड्ड्यांत कोसळायला होतंय..! ...खड्ड्यातून
उठून बाहेर पडेन तेव्हा कुठे असेन?..
डायरी-लेखनातला
खंड पुरेसा बोलका आहे...
आज रोजच्या सारखी फिरायला गेले. गळून पडलेल्या पानांचा वाढता थर मनावर परिणाम
करतच होता. तोवर पक्षांचा कोलाहल वाढलाय हे लक्षात आलं. काय घडलं असेल यांच्या
जगात ? असा प्रश्न घेऊन चालत राहिले. ग्राऊंड्च्या मध्यभागी एक जखमी कबुतर उडता
येत नाही म्हणून आपल्या दोन छोट्या पायानी चालत होतं. आणि एक लंगडं कुत्रं
त्याच्या भोवती घोटाळत होतं. कावळ्यांचा थवा काव काव करीत जमीनीवरच्या या
दृश्यापर्यंत खाली झेपावत वर उडून जात होता. कोकीळाही आपलं गाणं, नेहमीची जुगलबंदी
विसरून कोलाहलात आपला आवाज मिसळवत होत्या. मी आवाक होऊन समजून घेत होते घटना...
त्या
कुत्र्याला कबुतरापासून दूर करावं असं वाटलं आणि चार पावलं पुढे गेले तोपर्यंत
ग्राऊंडवर अभ्यास करणार्या मुलीही तिथं पोचल्या. एकीनं दगड मारून कुत्र्याला पळवून लावलं. कावळ्यांची
झुंड खाली झेपावली नि त्याच गतीनं वर गेली. उडण्याच्या त्या गतीनं किंवा त्यांंच्या सोबतीनं कबुतरही आपली
जखम विसरून ग्राउंडच्या कडेपर्यंत उडत गेलं. मुली त्याच्या भोवती गोळा झाल्या. मी
दुरून अनुभवत होते सगळं. सगळ्याच्या मुळाशी असलेली ती वैश्विक चैतन्यशक्ती
कुणाकुणाला कशा प्रेरणा देते आहे तो खेळ तिच्याच अलिप्तपणे पाहात होते...
त्या विद्ध
कबुतराला अभय देण्याची प्रेरणा एकमतानं काम करत असलेली पाहून वाटून गेलं की ते
कुत्रंही कदाचित त्याच्या त्याच्या पद्धतीनं कबुतराला मदत करायचा प्रयत्न करत असेल.
पक्ष्यांना वाटत होतं कुत्र आणि माणसांपासून याला वाचवावं. मुलींना वाटत होतं
कुत्र्यापासून याला वाचवावं. आणि कुत्र्याला वाटत असेल याला बाजूला नेऊन
इतरांपासून वाचवावं. फार दूरून विचार केल्यामुळे, घटनेच्या अधिक बाजू लक्षात
आल्यामुळे हातून कृती काहीच घडली नाही. ‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण अशासाठीच पडली असेल !
असंही वाटलं की, ‘ती’ शक्ति किती विविध प्रकारे अवतरत असते वेगवेगळ्या कृतींमधून ! शेवटी एका मुलीनं त्या कबूतराला उचलून घेतलं. त्याची जखम शोधली. त्याला
घेऊन माझ्या जवळ आली. मला जखम दाखवली, म्हणाली मी याला माझ्या खोलीत नेते. मी
तिच्या पाठीवर हात ठेवला. जे मला विचारात करावसं वाटलं, ते ती प्रत्यक्ष करत होती.
या समाधान-असमाधानाचे अश्रू जमले डोळ्यात. हा अनुभव घेऊन घरी येईपर्यंत मनात
रेंगाळलेला पक्ष्यांचा कोलाहल थांबला होता.
No comments:
Post a Comment