रेकी घेताना जी व्हायब्रेशन्स जाणवतात (असं
म्हणतात) ती आतील रक्तप्रवाहाची असतील. हवा वाहते त्याचा फील एकाग्रतेमुळे येत
असेल. रेडिओच्या स्पिकरवर हात ठेवला की जशी कंपनं जाणवतात, स्पर्शाला कळतात तशी
शरीरावर हात ठेवल्यावर आतल्या जिवंतपणाचा नाद स्पर्शाला कळत असेल. ही अंतर्चना,
अंतर्व्यवहार स्वयंचलीत यंत्राप्रमाणे होतच असतील.
कधी कधी
प्रतिक्षिप्तपणे होणार्या क्रिया अधिक सहज होतात. त्यात लुडबुड नसावी म्हणून तर
सर्व त्वचेच्या अपारदर्शक आवरणाखाली सर्व व्यवहार चाललेले असतात ना ? ते तसेच
बेदखल होत रहावेत ? जाणीवपूर्वकता त्यात आली तर ते अधिक चांगले होतील ? परवा एकदा
मनात आलं की मालक सजग, सावध लक्ष देणारा असेल तर हाताखालची सर्व मंडळीही
जागरूकतेनी चांगलं काम करतील. तसा नसेल तर तीही कसंतरी उरकून टाकतील. आपल्या
अंतर्व्यवहारांवर आपलं लक्ष असावं त्यात त्यामुळे हार्दिकता (लगन) आत्मियता येईल.
आपलं लक्ष असावं, लुडबुड असू नये. एकाग्रतेनं relaxed
होण्यामुळे
अंतर्व्यवहाराना आपण एकप्रकारे सहकार्य करतो, त्यांच्यामधले अडथळे दूर करतो.
विखुरललेली शक्ती एकवटते.
आज मनात आलं की हे
सर्व सूक्ष्म खुलासे, उगवणे समजून घ्यावेत, अनुभवावेत पण त्यातून निष्कर्ष काढू
नयेत. त्यामुळे विचलीत होऊ नये. निष्ठापूर्वक अनुभवत रहावं. अनुभवताना असंही वाटलं
की एकाग्रतेनं फील घेताना अनुभव मेंदूपर्यंत आपोआप जावा. मेंदूनी, मनानी
सांकेतिकपणे आधी कल्पना करू नये. अलिप्तपणे पहात राहावं. येईल त्या अनुभवाशी
हस्तांदोलन करून (without judgment)
पुढे जावं.
प्रार्थना
म्हणतानाही असं जाणवलं (वाटलं) की त्यातला (सर्वांसी सुख लाभावे) आशय, भाव आतून
उगवण्यात, उफाळून वर येण्यात या शब्दांचा अडसर होतोय. हे शब्द उच्चारणं म्हणजे
फक्त त्यातल्या भावनेची आठवण काढणं. ती भावना मनात निर्माण होणं आणि मग तिला
शब्दांचा आकार मिळणं ही मूळ क्रिया. प्रार्थना म्हणताना किमान या शब्दांपूर्वीच्या
करूणेत शिरायला हवं. आत सूप्तावस्थेत असलेली करूणा, माया, प्रेम जागृत व्हायला
हवं. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले..... असं काहीसं.
नवीन वर्षातला
संकल्प म्हणून अशा सूक्ष्म जाणवण्याचा लेखनाशिवाय फारसा उच्चार करायचा नाही. तो
सूक्ष्म होत होत बुद्धीत विलीन होईल तेव्हा कदाचित कृतीत प्रगटू शकेल.
***
No comments:
Post a Comment