१७.२.१९९७
आज उगीचच असं वाटून
गेलं की ईश्वरचिंतनात मग्न होणं, त्या निमित्तानं अधिकाधिक प्रगल्भ होत विस्तारत
जाणं समजण्यासारखं आहे. आजच वाचलेल्या पुस्तकात ( तुकारामदर्शन ) ‘देवासाठी झाले
ब्रह्मांड सोइरे’ अशी ओळ आलीय. तिचा अर्थ मला खगोलशास्त्रीय दृष्टीनं जाणवला.
म्हणजे देवाविषयीच्या चिंतनातून विश्वाचा, अनंतत्वाचा विचार केला जातो, त्याचं
तार्किक आकलन होतं, व्हावं असं वाटतं, ब्रह्मांड ‘सोइरे’ होतं. ईश्वर चिंतनाच्या
निमित्तानं हे सगळं समजणं महत्त्वाचं आहे. पण ईश्वर भजनात रंगून जाणं, कीर्तनात
तल्लीन होणं, ईश्वर साक्षात्कार.. त्याची ओढ हे सगळं काय आहे? अशी काही अलौकिक
समजूत मिळवणं की केवळ क्लेषकारक लौकिकाकडे पाठ फिरवणं? अधिक तरल, सूक्ष्म, सर्वभर होणं
की गुंगीत राहाणं? बधीर होणं?
१९.२.१९९७
काल मंजूशी गप्पा
मारल्या. आपलं काम समजून, समरसून, स्वतःतलं त्यात ओतून करणार्यांपैकी ती एक वाटते.
तिचं कौतुक वाटतं नेहमी. ज्ञान असणं आणि ते जगण्यातून व्यक्त होणं यात महद अंतर
आहे. जाणीव विस्तारून ज्ञान होते. समजूत वाढवते. ही समजूत रक्तात मिसळून रोजच्या
जगण्यातून अभिव्यक्त व्हायला हवी. ती केवळ शब्दांतून व्यक्त होऊन विरून जाते. जगणं
मागेच राहातं. पराभूतासारखं भेलकांडत राहातं समजूतीच्या मागे.! समजूतीचा, ज्ञानाचा
प्रवास जगण्यातून शब्दात असा व्हायला हवा. ‘आधी केले मग सांगितले’ असं घडायला हवं.
ही समजूत कधी कधी वागण्यातून झिरपतेही..! पण ती कुठल्या क्षणी हातावर तुरी देऊन
निसटून जाईल आणि आपल्याला उघडं पाडेल ते सांगता येत नाही. याला काय म्हणावं? हेच
ते जन्म-मरणाचे फेरे असणार. असा प्रत्येक पराभव म्हणजे एक मृत्यू! मात्र
त्यानंतरचा प्रत्येक जन्म वरच्या श्रेणीतला असतो. प्रत्येक पराभवानं दिलेला धक्का
आपल्याला कणभर तरी पुढे ढकलत असतो..!
अशा जन्म-मरणाच्या मार्गावरून
सजगपणे, सातत्याने जाणारा प्रत्येकजण अधिक चांगला माणूस.. महामानव.. वासूदेव..
पूर्ण पुरुष होऊ शकतो. यासाठी कुणी ईश्वर-कल्पनेचा आधार घेतात तर कुणी ईश्वर नाहीए
या समजूतीचा. चालणे महत्त्वाचे. आधार कुठला ही गौण गोष्ट. कित्येकजण मात्र जन्मतात
जगतात आणि मरतात एकेकदाच... जन्म-मरण फेरे या अर्थानं समजून घेतले तर ‘तुका म्हणे
गर्भवासी सुखे घालावे आम्हासी’ या म्हणण्यातला वाच्यार्थापलिकडला अर्थ समजू शकेल.
आज सकाळी फिरायला
गेले तेव्हा जाणवलं की निसर्ग.. सृष्टी... विश्व.. ईश्वर.. स्वतःच कुठे
श्रद्धावान.. आशादायी.. positive thinking करणारा आहे? तो तर
पुरता वस्तुनिष्ठ.. स्थितप्रज्ञ आहे. नुसता आहे..!
No comments:
Post a Comment