१५ एप्रील १९९७
परवा फिरून येताना एक दृश्य दिसलं. एका चिमणीनं एक झुरळ पकडलं
होतं. ते तिच्या चोचीतून निसटल. जीव घेऊन धावायला लागलं तर ती उडून त्याच्याजवळ
आली त्याला पुन्हा चोचीत धरलं, आणि उडून गेली. हे दृश्य पाहून वाटलं, की चिमणीनं
तिच्या कुवतीप्रमाणं झुरळ पकडलं. तिला कुणी कधी दुष्ट, क्रूर म्हणत नाहीत. वाघाची,
सिंहाची क्षमता अधिक, ते अधिक मोठ्या प्राण्यांवर झडप घालतात. त्याना क्रूर म्हटलं
जातं. आणि माणसं? त्यांची क्षमता तर बहूअंगी. त्यांच्या काही करण्याला लेबलं का ?
निसर्गापासून माणूस दुरावतोय असं खंतावून म्हटलं जातं. पण निसर्गाचा एक भाग
म्हणून, नैसर्गिक वागणं तर आपल्या कितीतरी मूल्यांच्या विरोधातच होईल ना ? की माणसं खर्या अर्थानं नैसर्गिक वागतंच नाहीत?
नैसर्गिक अंतःप्रेरणांच्या विरोधी, त्यांना डावलून वेगळं वागतं ते कोण? त्या
प्रेरणा कुठून येतात? कोण देतं? का देतं? या दोन प्रेरणांमधला भेद कसा ओळखायचा?
१६ एप्रील १९९७
मन – अंतर्मन, कॉन्शस – सबकॉन्शस, यापैकी अंतर्मन, सबकॉन्शसमधून
येतात त्या खर्या नैसर्गिक प्रेरणा असतील का? जाणिवपूर्वक केलेल्या कृतिपेक्षा
प्रतिक्षिप्तपणे होणार्या किंवा अचानक होणार्या कृती अधिक नैसर्गिक असतात के?
तसं असेल तर जाणिव अधिक प्रगल्भ करण्याचा अट्टहास कशासाठी? कि तिचं पुरेसं प्रगल्भ
होणं, विस्तारणं म्हणजे कॉन्शस – सबकॉन्शस एक होणं ? शून्याचं infinite
पर्यंत विस्तारणं ? ‘तुकोबा ते विठोबा’ हा प्रवास पूर्ण होणं ?
अशा कितीतरी मुलभूत प्रश्नांची उत्तरं शोधताना
बीजगणितात जसं, जे उत्तर शोधयचं आहे त्याच्या जागी ‘क्ष’ मानतात, तसं या सर्व उत्तरांच्या
जागी आपण ईश्वर कल्पना मानली आहे. पाण्यासारखी ही कल्पना प्रवाही आणि निराकार,
निरंग आहे. प्रत्येक प्रश्नाचा खड्डा बुजवत ती वहात राहाते. कोणताही रंग धारण
करते, कुठल्याही आकारात सामावते, आणि त्याच्या बाहेरही उरते ! गंमत म्हणजे या
मानलेल्या ‘क्ष’लाच उत्तर माणून आपण निवांत होतो. या ‘क्ष’चं उत्तर कोण शोधणार?
कसं? कधी? हा प्रश्न ऑप्शनला टाकूनही कित्येकजण पास होतच असतात म्हणा.
***
No comments:
Post a Comment