१९ एप्रिल १९९७
दिवस फार व्यग्रतेत जातायत. आज फिरायला गेले
तेव्हा आकाशात ढग होते. काळे पांढरे तुरळक. सूर्य उगवून वर आला होता. ढगाना न
जुमानता किरणांबरोबर आलेलं सूर्यतेज मिळेल त्या फटीतून घूसुन बाहेर येत होतं.
किरणांबरोबर ढगही विरून फाकले होते. ते दृश्य बघत राहिले क्षणभर. I
wonder….. म्हणत डोळे भरून आले. या दृश्याच्या जरा खाली लगेच भाजीची
टपरी, रिक्शा, बस स्टॉप, सार्वजनिक नळ, त्यावर पाण्यासाठी लागलेली प्लॅस्टीकच्या
कॅनसची रांग, वाहणारं पाणी, घाण... पुढं रस्ता, रहदारी, ...... वरच्या अनुपम
सौंदर्याला छेद देणार्या या घटकांकडे बघून मनांत अरेरे असे उद्गार आले. आणि लगेच
एक विचार- हे सर्व तिथे तिथे आहे म्हणून मी इथे आहे. I owe all of them...
१) प्रत्येक
क्षण, प्रत्येक कण काही देत असतो. काही वसूल करून घेत असतो. हे अखंड चलन वलन,
देवघेव माहीत नाही कधीपासून.... कधीपर्यंत.... आणि कां?.... एक फिजुल प्रश्न !
२) प्रत्येक
क्षण,
प्रत्येक कण... सर्व काही नुसतं आहे. आपण मुक्त, रिक्त....
स्वागतशील let go अवस्थेत असावं. आरपार होऊ द्यावं सगळं
सगळं.. भलं.. बुरं कोणतंच लेबल न लावता.
काल मेडिटेशनच्या वेळी प्रकाशाचं पिक पाहिलं.
प्रकाशाचे देठ, त्याला प्रकाशाचे तुरे प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर डोलणारे.
कालचा दिवस मैत्रीण डे झाला.
संध्याकाळी संस्थेतल्या
कार्यक्रमाला गेले. तिथे पुष्पा रोडे भेटल्या. त्यांच्याबरोबर तिथल्या हॉस्टेलवर
गेले. त्यानी नोकरीला लावलेल्या एका बाईना भेटायला. तिची अवस्था पाहून, तिची हकिगत
ऐकून अस्वस्थ व्हायला झालं. अशा आणखी किती असतील? अन्याय अत्याचाराची किती भेसूर
रुपं असतील.. अशा विचारांनी थकायला झालं. मी माझ्या जागी अगदी सुखात असताना,
भोवतीच्या अनंत प्रश्नांनी आतल्या आत माझं खचून जाणं ही कदाचित माझ्या सुखाची
किंमत असेल. पण ती त्यांच्यापर्यंत पोचती होत नाहीए. या फ्रॉडला काय म्हणावं ?
***
खरं आहे प्रत्येक क्षण काही ना काही वसूलत असतो आपल्याकडून फ़क्त ते आपलं होतं अशी जाणीव असली की वेदना देऊन जाते
ReplyDeleteखरं आहे प्रत्येक क्षण काही ना काही वसूलत असतो आपल्याकडून फ़क्त ते आपलं होतं अशी जाणीव असली की वेदना देऊन जाते
ReplyDelete