Tuesday, 29 March 2016

आपलं मन म्हणजे अजबच आहे ना?

१३ जून १९९७

      काल विमला ठकार यांचं ‘ध्यानमय दैनंदिन जीवन’ हे छोटसं पुस्तक वाचलं. आवडीचा विषय असल्यामुळे सध्याच्या वेगळ्या मूडमधेही वाचता आलं. मूळ इंग्रजी मिळवून वाचावसं वाटलं. त्यात एके ठिकाणी म्हटलंय, आपलं मन काही केवळ मेंदूत स्थानबद्ध झालेले नसते तर संपूर्ण, अगदी नखशिखांत आपण म्हणजेच आपलं मन असते. हे वाचताना क्लोनिंग पद्धतीनं मेंढी बनवली त्या संदर्भातली नुकतीच वाचलेली सगळी माहिती आठवली. आपली प्रत्येक पेशी एक पूर्ण अस्तित्व असते. बीजात वृक्ष लपलेला असावा तसं प्रत्येक पेशीत एक पूर्ण अस्तित्व असणार..! (गझलेचा प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असतो.. हे कशाला आठवलं इथे? मजाच आहे मनाची.. असो.)
     
      ध्यान साधनेनं निरीक्षण करण्याची कला आत्मसात केली जाते तेव्हा आपण आपल्याला समोर ठेवून आपलं निरीक्षण करू शकतो. आपल्या चांगलेपणाबरोबर आपल्या क्षूद्रपणाचेही दर्शन आपल्याला घडते. या संदर्भात या पुस्तकात खूप छान लिहीलंय- अशा निरीक्षणानंतर तुम्ही तुमच्या क्षूद्रपणाचे बेगुमान समर्थन करणार नाही. तेव्हा तुम्ही एका विलोभनीय अशा असहाय अवस्थेत उभे असता. अशी निव्वळ असहायता अथवा असुरक्षितता म्हणजेच खरी निरागसता.. इनोसन्स..!
***  

१८ जून १९९७

      मी रोज लिहायला बसते त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघितलं की झाडं दिसतात. मोठी झालीयत आता ती. पानांनी गच्च भरलीयत. त्यांच्या पलिकडे एक इमारत आहे. अर्धवट बांधकाम झालेली. झाडांच्या आड झाकली गेलीय. पण मधल्या फटींमधून दिसते ती. त्यात एक खोली बांधली असावी. दार (?) आमच्या बाजूला. बाकीच्या बाजू पूर्ण बंद असाव्यात. कारण इथून फक्त अंधार दिसतो. त्या अंधाराचा आकार वेड्यावाकड्या त्रिकोणासारखा आहे. तो रोज दिसतो मला आणि उगीचंच बर्म्युडा ट्रँगलची आठवण होते. आपलं मन म्हणजे अजबच आहे ना? कशाशी काय रिलेट करेल सांगता येत नाही. इतकंच नाही तर त्यानं अशीही कल्पना करून टाकली की आपल्या प्रत्येकात असा एक बर्म्युडा ट्रँगल असतो. त्याचा कुणालाही, अगदी आपल्यालाही तपास लागत नाही. त्याच्या जवळपास गेलेले आपले प्रश्न उत्तर घेऊन कधीच परत येत नाहीत. आतल्या आत गडप होऊन जातात..!

***

Monday, 28 March 2016

अंतर फक्त स्थळाचं नाही काळाचंही...

२७ मे १९९७

      ‘एकविसाव्या शतकातील मराठी साहित्याचे भवितव्य’ या विषयावर काल चर्चासत्र झालं. सरोजिनी वैद्य चांगलं बोलल्या. त्या म्हणाल्या मी दुरून आले याचं इथं कौतुक झालं. पण इथं ९१ वर्षांचे द.न. गोखले आलेत... हे ऐकताना गावाच्या अंतरासारखं वयाचंही अंतर असतं (म्हणजे लहान मोठा असं नव्हे) असा काहीसा फील आला. ९१ वर्षांपूर्वी एक जन्म झाला तेव्हापासून ९१ वर्षे सतत तो काळासमोरून सरकतो आहे. हे सरकणं हे अंतर..

      क्ष आणि य हे दोघं अ या ठिकाणी आलेत. क्ष ९१ वर्षांचा आणि य ६१ वर्षांचा. क्ष पुण्याचा रहिवासी य मुंबईचा. क्ष हा केव्हापासून प्रवास करतोय.. पहिल्या वर्षापासून आज ९१ वर्षापर्यंत. किती दुरून आलाय तो. किती पाहिलंय, अनुभवलंय त्यानं.. पोचल्याचा बिंदू एक पण प्रवासाला निघाल्याच्या बिंदूंमधे केवढं अंतर..!  अंतर फक्त स्थळाचं नाही काळाचंही...
***

३ जून १९९७

      कुठलीही व्यक्ती, घटना तिची अवस्था सगळं काही ‘एक’ एवढं असतं. एका अर्थी पूर्ण असतं. झाडाला वर एक पान फुटतं तेव्हा खाली मुळं वरच्या पानांच्या वाढीला तोलणार्‍या दिशेनं वाढत असतात. म्हणूनच तर वर तिरकं, वाकडं कसंही वाढलेलं झाड आपला तोल सावरत ऊन पाऊस वार्‍यात उभं असतं. एखाद्या व्यक्तिमत्वातल्या एखाद्या उणीवेला तोलणारी दुसरी एखादी धन बाजू त्याच व्यक्तिमत्वात असते. असं समग्र आकलन हाच खरा आपल्या स्थैर्याचा आधार होऊ शकेल.
*** 

Thursday, 24 March 2016

वादळ कोंबून भरलेली पिशवी आहे मी..

९ मे १९९७

सई,
आज थोडं काठावर येता आलंय. इथं आल्यावर कळतंय की धुमसणारं एक वादळ (कसलं कोणजाणे. वादळाला कुठं नाव असतं? वादळ वादळ असतं फक्त.) कोंबून भरलेली पिशवी आहे मी. वादळालाच मिठी मारून बसलेय. नि त्यालाच घाबरतेय. ते निघून गेलं तर उरणार्‍या पोकळीची अधिक भीती वाटतेय का मला?
     
     
१६ मे १९९७

सई,
      तुझ्यापर्यंत पोचायला एखादी फट शोधणंही किती कठीण जातंय..! तब्येतीची कुरकुर किती दिवस चालणार कोणजाणे. सगळं तर करतेय. पण नंतर उरत नाहीए तुझ्यासाठी माझ्यातलं काही.. असूदे. कदाचित ही तडफड, ही अनावर ओढ सगळ्यातून मोकळी होईन तेव्हा असेल की नाही कोणजाणे. किंवा ही ओढ म्हणजे ‘ट्रॅफिक जॅम’चा करसपाँडिंग इफेक्ट असेल..!
     
      दिवस दिवसाएवढे असत नाहीत कधी. ते कधी क्षण असतात तर कधी युगं असतात..!

१८ मे १९९७

सई,
      काल ‘भावपेशी’ या अरूण गद्रे यांच्या पुस्तकावरील चर्चेला गेले होते.. हे समीक्षेवरचं पुस्तक आहे. एका डॉक्टरच्या चिंतनातून आलेले मौलिक विचार आहेत त्यात. मेंदूत अनेक पेशी असतात. कोsहं? हा प्रश्न जिला पडतो ती भावपेशी..! विकत घेऊन वाचावसं वाटलं… एकानी आपल्या भाषणात एक कविता कोट केली- 

      Stone suffers
      From its stoneness
Light suffers
From its lightness
Word suffers
From its windness
I suffer
From my whoness..!


२० मे १९९७

सई,
ही घुसळण आता अनावर झालीय. धावत्या गाडीत बसलेले असलो की गाडीचा वेग गाडीत स्थीर असलेल्या आपल्याला येतो म्हणतात. सध्या मी अनुभवतेय तो वेग कुठल्या चक्रीवादळाचा? अलगद उचलून घे वर मला यातून. प्रत्येक निर्माणाच्यामागे एक वेदनांचे वादळ असते. पण प्रत्येक वादळाच्या निवळण्यातून काही जन्मते का?.. हो म्हण सई.. मग सोपं जाईल घुमत राहाणं..

***

Wednesday, 23 March 2016

या फ्रॉडला काय म्हणावं?

१९ एप्रिल १९९७

दिवस फार व्यग्रतेत जातायत. आज फिरायला गेले तेव्हा आकाशात ढग होते. काळे पांढरे तुरळक. सूर्य उगवून वर आला होता. ढगाना न जुमानता किरणांबरोबर आलेलं सूर्यतेज मिळेल त्या फटीतून घूसुन बाहेर येत होतं. किरणांबरोबर ढगही विरून फाकले होते. ते दृश्य बघत राहिले क्षणभर. I wonder….. म्हणत डोळे भरून आले. या दृश्याच्या जरा खाली लगेच भाजीची टपरी, रिक्शा, बस स्टॉप, सार्वजनिक नळ, त्यावर पाण्यासाठी लागलेली प्लॅस्टीकच्या कॅनसची रांग, वाहणारं पाणी, घाण... पुढं रस्ता, रहदारी, ...... वरच्या अनुपम सौंदर्याला छेद देणार्‍या या घटकांकडे बघून मनांत अरेरे असे उद्गार आले. आणि लगेच एक विचार- हे सर्व तिथे तिथे आहे म्हणून मी इथे आहे. I owe all of them...

१)  प्रत्येक क्षण, प्रत्येक कण काही देत असतो. काही वसूल करून घेत असतो. हे अखंड चलन वलन, देवघेव माहीत नाही कधीपासून.... कधीपर्यंत.... आणि कां?.... एक फिजुल प्रश्न !
२)  प्रत्येक क्षण, प्रत्येक कण... सर्व काही नुसतं आहे. आपण मुक्त, रिक्त.... स्वागतशील let go अवस्थेत असावं. आरपार होऊ द्यावं सगळं सगळं.. भलं.. बुरं कोणतंच लेबल न लावता.

काल मेडिटेशनच्या वेळी प्रकाशाचं पिक पाहिलं. प्रकाशाचे देठ, त्याला प्रकाशाचे तुरे प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर डोलणारे.

कालचा दिवस मैत्रीण डे झाला.

      संध्याकाळी संस्थेतल्या कार्यक्रमाला गेले. तिथे पुष्पा रोडे भेटल्या. त्यांच्याबरोबर तिथल्या हॉस्टेलवर गेले. त्यानी नोकरीला लावलेल्या एका बाईना भेटायला. तिची अवस्था पाहून, तिची हकिगत ऐकून अस्वस्थ व्हायला झालं. अशा आणखी किती असतील? अन्याय अत्याचाराची किती भेसूर रुपं असतील.. अशा विचारांनी थकायला झालं. मी माझ्या जागी अगदी सुखात असताना, भोवतीच्या अनंत प्रश्नांनी आतल्या आत माझं खचून जाणं ही कदाचित माझ्या सुखाची किंमत असेल. पण ती त्यांच्यापर्यंत पोचती होत नाहीए. या फ्रॉडला काय म्हणावं ? 

***

Saturday, 19 March 2016

‘क्ष’चं उत्तर कोण शोधणार?

१५ एप्रील १९९७

    परवा फिरून येताना एक दृश्य दिसलं. एका चिमणीनं एक झुरळ पकडलं होतं. ते तिच्या चोचीतून निसटल. जीव घेऊन धावायला लागलं तर ती उडून त्याच्याजवळ आली त्याला पुन्हा चोचीत धरलं, आणि उडून गेली. हे दृश्य पाहून वाटलं, की चिमणीनं तिच्या कुवतीप्रमाणं झुरळ पकडलं. तिला कुणी कधी दुष्ट, क्रूर म्हणत नाहीत. वाघाची, सिंहाची क्षमता अधिक, ते अधिक मोठ्या प्राण्यांवर झडप घालतात. त्याना क्रूर म्हटलं जातं. आणि माणसं? त्यांची क्षमता तर बहूअंगी. त्यांच्या काही करण्याला लेबलं का ? निसर्गापासून माणूस दुरावतोय असं खंतावून म्हटलं जातं. पण निसर्गाचा एक भाग म्हणून, नैसर्गिक वागणं तर आपल्या कितीतरी मूल्यांच्या विरोधातच होईल ना ?  की माणसं खर्‍या अर्थानं नैसर्गिक वागतंच नाहीत? नैसर्गिक अंतःप्रेरणांच्या विरोधी, त्यांना डावलून वेगळं वागतं ते कोण? त्या प्रेरणा कुठून येतात? कोण देतं? का देतं? या दोन प्रेरणांमधला भेद कसा ओळखायचा?

१६ एप्रील १९९७

     मन – अंतर्मन, कॉन्शस – सबकॉन्शस, यापैकी अंतर्मन, सबकॉन्शसमधून येतात त्या खर्‍या नैसर्गिक प्रेरणा असतील का? जाणिवपूर्वक केलेल्या कृतिपेक्षा प्रतिक्षिप्तपणे होणार्‍या किंवा अचानक होणार्‍या कृती अधिक नैसर्गिक असतात के? तसं असेल तर जाणिव अधिक प्रगल्भ करण्याचा अट्टहास कशासाठी? कि तिचं पुरेसं प्रगल्भ होणं, विस्तारणं म्हणजे कॉन्शस – सबकॉन्शस एक होणं ? शून्याचं infinite पर्यंत विस्तारणं ? ‘तुकोबा ते विठोबा’ हा प्रवास पूर्ण होणं ?

अशा कितीतरी मुलभूत प्रश्नांची उत्तरं शोधताना बीजगणितात जसं, जे उत्तर शोधयचं आहे त्याच्या जागी ‘क्ष’ मानतात, तसं या सर्व उत्तरांच्या जागी आपण ईश्वर कल्पना मानली आहे. पाण्यासारखी ही कल्पना प्रवाही आणि निराकार, निरंग आहे. प्रत्येक प्रश्नाचा खड्डा बुजवत ती वहात राहाते. कोणताही रंग धारण करते, कुठल्याही आकारात सामावते, आणि त्याच्या बाहेरही उरते ! गंमत म्हणजे या मानलेल्या ‘क्ष’लाच उत्तर माणून आपण निवांत होतो. या ‘क्ष’चं उत्तर कोण शोधणार? कसं? कधी? हा प्रश्न ऑप्शनला टाकूनही कित्येकजण पास होतच असतात म्हणा.

***

Friday, 18 March 2016

विद्ध कबुतर आणि मी

९ मार्च १९९७

ऋतुचक्रासारखे पुन्हा पुन्हा आरुन फिरून पराभवांच्या त्याच त्याच खड्ड्यांत कोसळायला होतंय..! ...खड्ड्यातून उठून बाहेर पडेन तेव्हा कुठे असेन?..

डायरी-लेखनातला खंड पुरेसा बोलका आहे...

      आज रोजच्या सारखी फिरायला गेले. गळून पडलेल्या पानांचा वाढता थर मनावर परिणाम करतच होता. तोवर पक्षांचा कोलाहल वाढलाय हे लक्षात आलं. काय घडलं असेल यांच्या जगात ? असा प्रश्न घेऊन चालत राहिले. ग्राऊंड्च्या मध्यभागी एक जखमी कबुतर उडता येत नाही म्हणून आपल्या दोन छोट्या पायानी चालत होतं. आणि एक लंगडं कुत्रं त्याच्या भोवती घोटाळत होतं. कावळ्यांचा थवा काव काव करीत जमीनीवरच्या या दृश्यापर्यंत खाली झेपावत वर उडून जात होता. कोकीळाही आपलं गाणं, नेहमीची जुगलबंदी विसरून कोलाहलात आपला आवाज मिसळवत होत्या. मी आवाक होऊन समजून घेत होते घटना... 

      त्या कुत्र्याला कबुतरापासून दूर करावं असं वाटलं आणि चार पावलं पुढे गेले तोपर्यंत ग्राऊंडवर अभ्यास करणार्‍या मुलीही तिथं पोचल्या. एकीनं दगड मारून कुत्र्याला पळवून लावलं. कावळ्यांची झुंड खाली झेपावली नि त्याच गतीनं वर गेली. उडण्याच्या त्या गतीनं किंवा त्यांंच्या सोबतीनं कबुतरही आपली जखम विसरून ग्राउंडच्या कडेपर्यंत उडत गेलं. मुली त्याच्या भोवती गोळा झाल्या. मी दुरून अनुभवत होते सगळं. सगळ्याच्या मुळाशी असलेली ती वैश्विक चैतन्यशक्ती कुणाकुणाला कशा प्रेरणा देते आहे तो खेळ तिच्याच अलिप्तपणे पाहात होते... 

     त्या विद्ध कबुतराला अभय देण्याची प्रेरणा एकमतानं काम करत असलेली पाहून वाटून गेलं की ते कुत्रंही कदाचित त्याच्या त्याच्या पद्धतीनं कबुतराला मदत करायचा प्रयत्न करत असेल. 

     पक्ष्यांना वाटत होतं कुत्र आणि माणसांपासून याला वाचवावं. मुलींना वाटत होतं कुत्र्यापासून याला वाचवावं. आणि कुत्र्याला वाटत असेल याला बाजूला नेऊन इतरांपासून वाचवावं. फार दूरून विचार केल्यामुळे, घटनेच्या अधिक बाजू लक्षात आल्यामुळे हातून कृती काहीच घडली नाही. ‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा’ ही म्हण अशासाठीच पडली असेल ! 

     असंही वाटलं की, ‘ती’ शक्ति किती विविध प्रकारे अवतरत असते वेगवेगळ्या कृतींमधून ! शेवटी एका मुलीनं त्या कबूतराला उचलून घेतलं. त्याची जखम शोधली. त्याला घेऊन माझ्या जवळ आली. मला जखम दाखवली, म्हणाली मी याला माझ्या खोलीत नेते. मी तिच्या पाठीवर हात ठेवला. जे मला विचारात करावसं वाटलं, ते ती प्रत्यक्ष करत होती. या समाधान-असमाधानाचे अश्रू जमले डोळ्यात. हा अनुभव घेऊन घरी येईपर्यंत मनात रेंगाळलेला पक्ष्यांचा कोलाहल थांबला होता. 

Thursday, 17 March 2016

कोई भी चीज बेवजह नहीं होती

28.2.1997

      शांततेच्या पाटीवर गिरगटलं जातंय सतत काहीतरी.. त्या विषयीची नोंद घेतली जातेय. पण उमेद खचवण्याइतकी खंत करत नाहीए. उमटूदेना काहीही. पुसलही जाईल आपोआप..! माझ्यात येऊन धडकूदे काहीही. मी त्याच्यात गेले नाही की झालं!
     
      काल फिरायला गेले तेव्हा रस्त्यात जागोजाग पडलेल्या खड्ड्यात पाणी साठलेलं दिसलं. कावळे.. कुत्री पाणी पीत होती. ते बघून मनात आलं की या विश्वाच्या अस्तित्वातल्या प्रत्येक लहानातल्या लहान घटकाचाही काही उपयोग आहे. त्याचं असं काही कार्य आहे. प्रत्येक घटना, कृती कधीच व्यर्थ जात नाही. ती आपलं काम करतच असते. प्रश्न आपण ती जमेत धरतो की नाही याचाच असतो फक्त..!

हा आशय मनात घोळत राहिला... कवितेच्या वहीत लिहिलं गेलं-

‘कोई भी जगह खाली नहीं होती    
कोई भी चीज बेवजह नहीं होती
हर चीज का कुछ न कुछ मकसद होता है
जीने का अपना अपना अंदाज होता है..!’ 

Wednesday, 16 March 2016

जन्म-मरणाचे फेरे

१७.२.१९९७
     
      आज उगीचच असं वाटून गेलं की ईश्वरचिंतनात मग्न होणं, त्या निमित्तानं अधिकाधिक प्रगल्भ होत विस्तारत जाणं समजण्यासारखं आहे. आजच वाचलेल्या पुस्तकात ( तुकारामदर्शन ) ‘देवासाठी झाले ब्रह्मांड सोइरे’ अशी ओळ आलीय. तिचा अर्थ मला खगोलशास्त्रीय दृष्टीनं जाणवला. म्हणजे देवाविषयीच्या चिंतनातून विश्वाचा, अनंतत्वाचा विचार केला जातो, त्याचं तार्किक आकलन होतं, व्हावं असं वाटतं, ब्रह्मांड ‘सोइरे’ होतं. ईश्वर चिंतनाच्या निमित्तानं हे सगळं समजणं महत्त्वाचं आहे. पण ईश्वर भजनात रंगून जाणं, कीर्तनात तल्लीन होणं, ईश्वर साक्षात्कार.. त्याची ओढ हे सगळं काय आहे? अशी काही अलौकिक समजूत मिळवणं की केवळ क्लेषकारक लौकिकाकडे पाठ फिरवणं? अधिक तरल, सूक्ष्म, सर्वभर होणं की गुंगीत राहाणं? बधीर होणं?

१९.२.१९९७

      काल मंजूशी गप्पा मारल्या. आपलं काम समजून, समरसून, स्वतःतलं त्यात ओतून करणार्‍यांपैकी ती एक वाटते. तिचं कौतुक वाटतं नेहमी. ज्ञान असणं आणि ते जगण्यातून व्यक्त होणं यात महद अंतर आहे. जाणीव विस्तारून ज्ञान होते. समजूत वाढवते. ही समजूत रक्तात मिसळून रोजच्या जगण्यातून अभिव्यक्त व्हायला हवी. ती केवळ शब्दांतून व्यक्त होऊन विरून जाते. जगणं मागेच राहातं. पराभूतासारखं भेलकांडत राहातं समजूतीच्या मागे.! समजूतीचा, ज्ञानाचा प्रवास जगण्यातून शब्दात असा व्हायला हवा. ‘आधी केले मग सांगितले’ असं घडायला हवं. ही समजूत कधी कधी वागण्यातून झिरपतेही..! पण ती कुठल्या क्षणी हातावर तुरी देऊन निसटून जाईल आणि आपल्याला उघडं पाडेल ते सांगता येत नाही. याला काय म्हणावं? हेच ते जन्म-मरणाचे फेरे असणार. असा प्रत्येक पराभव म्हणजे एक मृत्यू! मात्र त्यानंतरचा प्रत्येक जन्म वरच्या श्रेणीतला असतो. प्रत्येक पराभवानं दिलेला धक्का आपल्याला कणभर तरी पुढे ढकलत असतो..!

      अशा जन्म-मरणाच्या मार्गावरून सजगपणे, सातत्याने जाणारा प्रत्येकजण अधिक चांगला माणूस.. महामानव.. वासूदेव.. पूर्ण पुरुष होऊ शकतो. यासाठी कुणी ईश्वर-कल्पनेचा आधार घेतात तर कुणी ईश्वर नाहीए या समजूतीचा. चालणे महत्त्वाचे. आधार कुठला ही गौण गोष्ट. कित्येकजण मात्र जन्मतात जगतात आणि मरतात एकेकदाच... जन्म-मरण फेरे या अर्थानं समजून घेतले तर ‘तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी’ या म्हणण्यातला वाच्यार्थापलिकडला अर्थ समजू शकेल.

      आज सकाळी फिरायला गेले तेव्हा जाणवलं की निसर्ग.. सृष्टी... विश्व.. ईश्वर.. स्वतःच कुठे श्रद्धावान.. आशादायी.. positive thinking करणारा आहे? तो तर पुरता वस्तुनिष्ठ.. स्थितप्रज्ञ आहे. नुसता आहे..!

      ‘सा’ आणि ‘रे’ या दोन स्वरांच्या मध्ये जे अवकाश असते तिथे खरं सौंदर्य आहे. ते अमूर्त सौंदर्य जाणवायला हवं. उद्‍गाराच्या आधिचा निर्मितीक्षम अवकाश, उचललेलं पाऊल टेकवण्याच्या मधला अवकाश, शून्य आणि infinity यांच्यामधल्या अवकाशाइतका अनंत, अमूर्त, अनाकलनीय, गूढ, सुंदर, हवाहवासा..!  

Tuesday, 15 March 2016

अनेकात एक असतो आपण

१५.२.९७

      आज धूमकेतू दिसणार असं कळलं म्हणून सकाळी अगदी लवकर डोंगरावर गेलो. धूमकेतू दिसला नाही. पण इतक्या लवकर टेकडीवरचं वातावरण अनुभवताना छान वाटलं.

      कितीही लवकर आपण उठलो तरी आपल्या आधी कुणीतरी उठलेलं असतं! कितीही उशीर केला आपण तरी आपल्या मागे कुणीतरी असतंच. आपण अनेकात एक असतो नेहमी..


      आपली क्षमता पूर्ण ताणून इप्सित ठिकाणी पोचल्यावर पुढं काय? तसं आपण पोचत पोचतच नाही कधी पण पोचलोच तर ( नाथाघरच्या उलट्या खुणा ) पुढे काय? याचं एक छान उत्तर ज्ञानेश्वरीत दिलंय... ‘म्हणौनि कर्म न संडावे । विशेषे आचरावे । लागे संती॥ संतपदाला पोचल्यावरही सर्वसामान्यांची दिनचर्याच नव्या दृष्टीतून जगणं, सर्वांमधे, सर्वांबरोबर असणं ही खूप कसोटी लागणारी गोष्ट आहे. इथे जोनाथन सीगलचं परत आपल्या भावंडात येणं आठवतंय.

       हे मोठं स्केल आपल्या जगण्यासाठी एक प्रतिक आहे..!

Monday, 14 March 2016

आकलन किती अनंत आहे..

11.2.1997

आकलन किती अनंत आहे. Infinite. आणि आपण एवढेसे.. finite..! सगळं एकत्र एकावेळी नाहीच कळणार आपल्याला. एक कळून दुसरं कळेपर्यंत पहिलं कळलेलं बदललेलं असतं. आपण आपल्या एवढ्याशा विश्वात मस्त राहावं. पायरीवर चढून खेळ करणार्‍या मुलासारखं. त्याच्या दृष्टीनं ती पायरी आणि उडी मारणं एवढंच अस्तित्वात असतं..!

      आज एक वाक्य वाचलं- ‘In order to raise your standard you must keep Agni, the Soul’s flame of transformation burning in you.’ Agni ला Agony हा शब्द किती जवळचा आहे ना? 
  
***
     
13.2.1997

आज लवकर जाग आली. नीट आवरून झालं. फिरायला गेले तेव्हा मनात आलं, प्रत्येक कणाचं, प्रत्येक क्षणाचं काही ना काही विहीत कार्य आहे, त्याची अशी काही एक भूमिका आहेच या विश्वनाट्यात. या फिरत्या रंगमंचावर सूक्ष्मपणे अव्याहत बदलतंय सगळं. रंगमंच सुद्धा..

      असंही वाटून गेलं की चिरंजीव सत्य दोन आहेत. एक- मृत्यु आणि दुसरं- जगण्याची इच्छा..! 

Friday, 11 March 2016

सूक्ष्म खुलासे

रेकी घेताना जी व्हायब्रेशन्स जाणवतात (असं म्हणतात) ती आतील रक्तप्रवाहाची असतील. हवा वाहते त्याचा फील एकाग्रतेमुळे येत असेल. रेडिओच्या स्पिकरवर हात ठेवला की जशी कंपनं जाणवतात, स्पर्शाला कळतात तशी शरीरावर हात ठेवल्यावर आतल्या जिवंतपणाचा नाद स्पर्शाला कळत असेल. ही अंतर्चना, अंतर्व्यवहार स्वयंचलीत यंत्राप्रमाणे होतच असतील.

      कधी कधी प्रतिक्षिप्तपणे होणार्‍या क्रिया अधिक सहज होतात. त्यात लुडबुड नसावी म्हणून तर सर्व त्वचेच्या अपारदर्शक आवरणाखाली सर्व व्यवहार चाललेले असतात ना ? ते तसेच बेदखल होत रहावेत ? जाणीवपूर्वकता त्यात आली तर ते अधिक चांगले होतील ? परवा एकदा मनात आलं की मालक सजग, सावध लक्ष देणारा असेल तर हाताखालची सर्व मंडळीही जागरूकतेनी चांगलं काम करतील. तसा नसेल तर तीही कसंतरी उरकून टाकतील. आपल्या अंतर्व्यवहारांवर आपलं लक्ष असावं त्यात त्यामुळे हार्दिकता (लगन) आत्मियता येईल. आपलं लक्ष असावं, लुडबुड असू नये. एकाग्रतेनं relaxed होण्यामुळे अंतर्व्यवहाराना आपण एकप्रकारे सहकार्य करतो, त्यांच्यामधले अडथळे दूर करतो. विखुरललेली शक्ती एकवटते.

      आज मनात आलं की हे सर्व सूक्ष्म खुलासे, उगवणे समजून घ्यावेत, अनुभवावेत पण त्यातून निष्कर्ष काढू नयेत. त्यामुळे विचलीत होऊ नये. निष्ठापूर्वक अनुभवत रहावं. अनुभवताना असंही वाटलं की एकाग्रतेनं फील घेताना अनुभव मेंदूपर्यंत आपोआप जावा. मेंदूनी, मनानी सांकेतिकपणे आधी कल्पना करू नये. अलिप्तपणे पहात राहावं. येईल त्या अनुभवाशी हस्तांदोलन करून (without judgment) पुढे जावं.

      प्रार्थना म्हणतानाही असं जाणवलं (वाटलं) की त्यातला (सर्वांसी सुख लाभावे) आशय, भाव आतून उगवण्यात, उफाळून वर येण्यात या शब्दांचा अडसर होतोय. हे शब्द उच्चारणं म्हणजे फक्त त्यातल्या भावनेची आठवण काढणं. ती भावना मनात निर्माण होणं आणि मग तिला शब्दांचा आकार मिळणं ही मूळ क्रिया. प्रार्थना म्हणताना किमान या शब्दांपूर्वीच्या करूणेत शिरायला हवं. आत सूप्तावस्थेत असलेली करूणा, माया, प्रेम जागृत व्हायला हवं. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले..... असं काहीसं.

      नवीन वर्षातला संकल्प म्हणून अशा सूक्ष्म जाणवण्याचा लेखनाशिवाय फारसा उच्चार करायचा नाही. तो सूक्ष्म होत होत बुद्धीत विलीन होईल तेव्हा कदाचित कृतीत प्रगटू शकेल.


***   

Thursday, 10 March 2016

Let it be..

छान वाटतंय, पॉझिटिव्ह थिंकींग जमतंय असं म्हटलं, तेव्हाच कसोटीच्या वेळी ते टिकायला हवं हे लक्षात आलं. पण काल जरा तब्बेत बिघडली तर मूड गेला. कदाचित मूड जाणं हाही तब्बेत बरी नसण्याचाच भाग असेल. Let it be म्हणून पुढे जायला हवंय. ‘रेकी’ पुस्तकात एक वाक्य मिळालं.

      .....disease, though apparently so cruel is in itself beneficent and for our good and, if rightly interpreted … will guide us to our essential faults. If properly treated it will be the course of the removal of those faults and leave us better and greater than before. Suffering is a corrective to point out a lesson which by other means we have failed to grasp, and never can be eradicated until that lesson is learnt.”

          असा अनुभव तर पूर्वी आलेलाच आहे ! संकट, अडचण इ. बाबतही हा विचार लागू पडण्यासारखा आहे.

***

Wednesday, 9 March 2016

माझं काम कोणतं?

१ जानेवारी १९९७

या वर्षाची सुरवात चांगली झाली. गेल्या वर्षभर डायरी लिहिली याचं समाधान वाटलं. हे लेखन म्हणजे केवळ भावनीक आलेख नाही. ते बोट धरून पुढं नेतं. मनात आलेला प्रश्न लिहिता लिहिता उत्तर समोर येतं. कितीतरी सूक्ष्म गोष्टी आतून उलगडतात, हे वाटणं या लेखनात टिपलं जातं.

      तरी याही वर्षी डायरी लिहावी की नको असा विकल्प मनात आला. लिहिण्यामुळे relaxation मिळतं हे खरंच पण त्याचमुळे expression ची गरज भागून जाते. काही तीव्र वाटण्यांच्या कविता होत नाहीत. मनात काही खदखदत असलं की कधी कधी अनावरपणे कविता लिहिली जाते. या लेखनामुळे तपशील लिहिण्याची, एकाच गोष्टीच्या अनेक बाजू उकलण्याची, त्या मांडण्याची सवय होतेय. कवितेला हे पोषक आहे की नाही कोण जाणे.

      परवा वर्षभरात काय कमावलं त्याचा आढावा घेतला तेव्हा, छान वाटतंय, Positive thinking जमतंय असं वाटलं पण काल संध्याकाळ पर्यंत दमायला झालं. अनुराधा आली होती तिच्याशी बोलताना हे त्यातून डोकावत होतं. तिचा आवाका आणि रुटीन ऐकून थक्क व्हायला होतं नेहमीच. काल तिच्याविषयी विचार करताना लक्षात आलं की ती मेडीटेशन, प्राणायाम, योगासनं इ. निष्ठेनं करते आणि कामाला लागते. आपला विचार करण्यातच बराच वेळ जातो. हे बरं की वाईट असं फारसं वाटलं नाही. तरी तसं काहीसं मनात आलंच. रात्री झोपताना अंघोळ केली. तेव्हाच रेकी घेतली. तेव्हा मनात आलं काही विचार न करता आयुष्यभर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन कुणी कुणी काढलेले निष्कर्ष आपण मानून टाकावेत आणि कामाला लागावं उगीच शिणू नये... पण मग माझं काम कोणतं ? कदाचित असा मूलभूत विचार करणं हेच. कारण मी ते थांबवू शकत नाहीय.