मी माझ्या ‘असण्या’ची भूमिका बदलली आहे.
२३.५.२०२१
व्हॉट्सॅपवर
एक व्हिडिओ पाहिला. त्यातला संवाद-
“तुम्हे गरमी
नहीं लगती? कितनी धूप है बाहर..’..
‘सोचता हूँ तो
लगती है...!”
गरमी
प्रत्यक्षात असली तरी ती आपल्या जाणिवेचा भाग होत नाही तोपर्यंत जाणवत नाही...
त्याचा त्रास होत नाही. प्रत्येक बाबतीत हे लागू होऊ शकतं...
.....
८-२६.६.२०२१
मागे एकदा मारामारी
करत भांडणार्या मुलांना म्हटलं, ‘अरे भांडू नका’ तर मुलं म्हणाली, ‘का पण आम्ही
खेळतोय’... ही आठवण मनात घर करून आहे. वेगवेगळ्या संदर्भात ती आठवते. आज वाटलं
जगण्यातल्या सगळ्या भांडण मारामारीकडे ‘आम्ही खेळतोय’ असं पाहता येईल.. शारीरिक
दुखण्या-खुपण्यांकडेही असं बघता येईल... देहाच्या मैदानावर देहातल्या अगणित
पेशींचे वेगवेगळे युद्ध चालू असते.. कित्येक लढाया आपल्या नकळतच समाप्त होतात.
काहींची दखल घ्यावी लागते.. काहींकडे ‘खेळ’ म्हणून पाहता येते. दखल घेणं हाही एक
खेळ म्हणता येईल.. देहाकडे दुरून पाहता आलं तरच त्यातल्या घडामोडींना खेळ म्हणता
येईल... एकेका अवयवावर राज्य येतं.. बाकीचे लपून बसतात....
माझा देह...
माझ्या आईचं बाळ... तिनं माझ्या हातात सोपवलं होतं... त्याला मोठं होत जाताना मी
पाहात होते. त्याच्या भरवशावर मी कुठे कुठे फिरत राहिले. आता ते थकलंय आणि माझं
लक्ष वेधून घेतंय तर मी त्याच्याजवळ असायला हवं.. ‘तो मी नव्हेच’ म्हणून नाळ तोडू
नये..! मी देहात्मभाव सर्जक बनवीन. आमच्यातलं नातं फुलवत ठेवीन. उमेदीचं बळ देईन..
....
लॉकडाऊनच्या
अस्थिर वातावरणाची सर्वांना सवय झालीय. रूटीन चेक अपसाठी अपॉइंटमेंट घेतली आणि
जायचंय याचा फार विचार न करता सहज जाऊन आलो. तपासण्यादरम्यानही अगदी निवांत होते.
वेटिंग करताना दिसणार्या हॉस्पिटलमधल्या नेहमीच्या दृश्यांकडे बघताना अस्वस्थ
व्हायला झालं नाही. मी बसले होते तिथे जवळच एका माणसाला स्ट्रेचवर झोपवून आणलं
होतं. तोही सोनोग्राफीच्या रांगेत होता बहुधा. दया, हतबलता, नाइलाज, काय हे..
कशाला अट्टहास.. असं काही मनात आलं नाही..!
रिपोर्ट्स
नॉर्मल आले. आता एक वर्ष काही काळजी नाही..!
‘पहाट पावलं’
लेखांचं ‘विचारांचे कवडसे’ नावानं ईपुस्तक प्रकाशित झालं... आता ‘विचारार्थ’
उपक्रमातील लेखांचं स्क्रिप्ट केलंय..
कामं हातवेगळी
झाली की छान वाटतंय तोपर्यंत रिकामपण येतं.. आनंदी राहायचं ठरवून चेहरा हसरा
करतेय... लोकांनी छान म्हटलं की आपल्याला छान वाटतं. तसं आपणच आपल्याला छान
म्हणायचं आणि खुश व्हायचं. आपल्याला आनंद
हवा तर आपणच आनंदरूप व्हायचं. बाह्य, वरवरचा, कृत्रिम कृतीरूप आनंद घेता घेता
आपल्याला जन्मजात स्वयंभू आनंदमय कोषात शिरत येईल..! छान आहे ना कल्पनाविलास..?
.....
१९.७.२०२१
नवीन कविता
सुचताहेत. ‘भेटे नवी राई’ संग्रहानंतरच्या या कविता ‘नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत’
शीर्षकाखाली सेव्ह करून ठेवतेय.
मी माझ्या
‘असण्या’ची भूमिका बदलली आहे. ‘एक्झिटच्या प्रतीक्षेत बसलेली’ हे तिचं जुनं नाव
बदलून ‘नाट्यात रमलेली’ हे नाव दिलं आहे. नवी भूमिका निभावताना छान वाटतं आहे....
घरात थोडं रीनोव्हेशन करून घ्यायचा विचार चालू झालाय... ‘जिजीविषेत शतं समः’चं बोट
धरल्यामुळे आता पंचाहत्तरी साजरी करण्याचा विचार अशक्य वाटत नाहीए... माझं कुंपण
मृगजळासारखं दूर जात आपला पैस वाढवून घेतं आहे...!
४-३०.८.२०२१
‘विचारार्थ’
ईपुस्तक तयार झालं. फेसबुकवर झळकलं... मुखपृष्ठासह पूर्ण निर्मिती माझी आहे..
त्यामुळे समाधान वाटतं आहे..
‘विचारांचे
कवडसे’ आणि ‘विचारार्थ’ या दोन्ही ईपुस्तकांचं मंदा खांडगे यांच्या हस्ते ऑनलाईन
प्रकाशन झालं.. आश्लेषा महाजन आणि निलीमा गुंडी छान बोलल्या.. एकूण कार्यक्रम
सुटसुटीत, छान झाला.
....
४.१०.२०२१
‘ज्ञानेश्वरीतील
उपमा’ आणि ‘Thoughts in a
Nutshell’ या दोन ब्लॉगचं ईपुस्तक करण्याची
कल्पना सुचलीय... कल्पना सुचल्यावर लगेच कामाला लागले आणि महिनाअखेर पर्यंत दोन्ही
ईपुस्तकं प्रकाशितही झाली. डॉ. सदानंद मोरे सरांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन झालं..
सर खूप छान बोलले. हुरूप वाढला...
या वर्षानं
ईपुस्तक निर्मितीचं नवं दालन उघडून दिलं..! पेरलेल्यातून नवं उगवायला सुरुवात
झाली..!
***
मीही आहे त्या खेळातभोवती कशाकशाचा
हाहाकार माजलेला असताना
आयुष्याच्या तिन्हीसांजेला
मी शांत बसले आहे
खिडकीच्या चौकटीतून दिसणार्या
आपल्या वाटच्या
एक तुकडा आकाशाकडे पाहत...
मन प्रसन्न आहे
त्याला उमगलंय
आनंद.. संताप.. वेदना.. क्लेष.....
हे सर्व भिडू आहेत
एका विराट खेळातले
मीही आहे त्या खेळात
आता भोज्या बनून पाहते आहे
बाहेर सगळं पूर्ववत चालू आहे
अधिकच भयकारी..
खचवणारं झालंय आता
पण दुरून पाहताना वाटतंय
सृष्टीच्या आरंभापासून सुरू आहे
हे नवरसांचं संमेलन..
आणि आपला जन्म म्हणजे
जीवनाच्या या संमेलनात
सहभागी होण्यासाठी
मिळालेलं निमंत्रण आहे..!
मी आता रंगमंचावर नाही
नवनवीन खेळ पाहात
श्रोत्यात बसले आहे..
समोरच्या नाट्याला आणि
माझ्या इथं असण्याला दाद देत..!
***
(‘नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत’मधून)
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment