Thursday, 21 July 2022

माझ्या डायरीतून- ७४

अंतर्मुख विचार ही पण एक साधनाच?

१४, २१.७, १७, २५.८.२०१९

‘आनंदघन’ दिवाळीअंकासाठी ‘भगवद्‍गीता आणि मी’ या विषयावर लेख लिहिण्याच्या निमित्तानं गीता मुळातून वाचावी अशी प्रेरणा झाली. गीताई, ज्ञानेश्वरी अशा वाचनामुळे गीतेचा विषय माहिती होता. पण संस्कृत भाषा समजत नाही म्हणून मूळ संस्कृत गीता वाचलीच नव्हती. आमच्या शेजारी राहणारी श्रीकांत सरीता गीता धर्म मंडळात गीता म्हणायला शिकलीय. तिच्याकडून शिकून रोज दहा श्लोक म्हणायला लागले.

तस्मात गीता – रमेश सप्रे हे पुस्तक मिळालंय. त्यात २२ श्लोक आहेत. ते पाठ करून म्हणायचं ठरवलं. पण अर्थ समजून घेतल्यावर ते संकलन महत्त्वाचं वाटलं नाही. त्यापेक्षा गीता वाचताना मला जे महत्त्वाचे वाटतील ते ओळीनी लिहून घेऊन पाठ करावेत असं वाटलं.

सर्दीचे जंतू आणि माझ्यातल्या पांढर्‍या पेशी यांचे युद्ध चालू आहे. आवाज फुटत नाही म्हणजे काय ते अनुभवतेय. एक दोन दिवसात आवाज ठीक झाल्यावर गीता पठण चालू झालं... स्पष्ट शब्दोच्चार येण्यावर भर दिला जातोय. अर्थ आधी समजून घेतला तरी म्हणताना समजून म्हटलं जात नाहीए...

‘विचारार्थ’ उपक्रम छान चाललाय.  

उत्साह टिकला. गीता पठण पूर्ण झाले. पण त्याच्या जोडीनं आशयात रमता आलं नाही. आधिक आकलन, निष्ठा, भक्ती असं काही झालं नाही....

.....

२५.९.२०१९

मधे एकदा सांगलीहून श्री जगदाळे यांचा फोन होता. सांगलीत पूर परिस्थिती असताना बारा दिवस घरात अडकले होते. तेव्हा ‘ईशावास्य..’ हे माझं पुस्तक वाचत होते. पुस्तक आवडल्याचे सांगत होते. परवा फोन करून भेटायला आले... आता वाचन बास. अंतरंग साधना करायला हवी असं त्यांना वाटत होतं. त्या संदर्भात बोलायला आले होते. पण मी काही साधना करत नाही असं सांगितलं... मग त्यावर फारसा संवाद झाला नाही. नंतर वाटलं की अंतर्मुख विचार ही पण एक साधनाच असेल तर ती मी करते आहे..!

काल आनंद नाडकर्णी यांचा फोन होता. तेही ‘ईशावास्य..’ वाचतायत. ते ठाण्यात वेदान्त आणि व्यक्तिमत्वविकास यावर तीन दिवस शिबीर घेणार आहेत. त्याच्या तयारीत त्यांना माझ्या पुस्तकाचा उपयोग झाला असं सांगत होते. समाधान वाटलं..

.....

२७.१०, १६.१२.२०१९

‘भेटे नवी राई’ कवितासंग्रहाचं स्क्रिप्ट नीतीन मोरे यांच्या सुखायन प्रकाशनाकडे दिले आहे. आदरानं काढताहेत.

म्हातारपण हे दुसरं बालपण असं म्हणतात. पण ते शारीरिक  पातळीवरच राहातं. मनही तसं मूल व्हायला हवं.... काही दुखत असेल तर त्या दुखण्याच्या आकाराइतकंच नाही दुखत मन. त्याच्या मागे पुढे धावते आणि दुखणे विस्तारून टाकते... पाय, गुढगा, कंबर दुखणं चालू आहे. त्याला सामोरं जायचा कमी त्रासाचा मार्ग शोधतेय..

आरतीच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला गेले होते. मी ब्लर्ब लिहिले म्हणून सत्कार केला. नको वाटत होतं पण गेले. स्टेजवर चढताना उतरताना आधार घ्यावा लागला... पूर्वी असं कुणी कार्यक्रमात दिसलं की ‘या वयात, त्रास होत असताना कशाला यायचं?’ असा विचार मनात यायचा.. मी आता तेच करते आहे...! याला काय म्हणावं?... आपल्यावर वेळ आली की समजते त्या वेळची मानसिकता..!

‘भेटे नवी राई’ तयार होत आलं. चांगलं होईल असं वाटतं... ‘विचारार्थ’ उपक्रम वर्षभर राबवला याचं समाधान आहे....

बघता बघता वर्ष संपत आलं... वय वाढलं. अनुभवलेल्या पावसाळ्यांच्या संख्येत भर पडली..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment