कामात व्यस्त राहाण्याचा उपचार प्रभावी ठरला..!
१, १५, ३०.१.२०११७
‘कोहं’ – सुरेश व्दादशीवार आणि ‘आनंदी
गोपाळ’- श्री ज जोशी ही दोन पुस्तकं वाचायला घेतलीयत.
सध्या कविता
सुचतायत. ‘भेटे नवी राई’ या कवितेच्या ब्लॉगमधे छान भर पडतेय.. पण दाखवायला आई
नाहीए..!
वाचन होत
नाहीए. सगळा वेळ मोबाईलवर, व्हॉट्सॅप उपक्रमात चाललाय.. पण त्याचमुळे घरबसल्या
अनेकांच्या संपर्कात राहता येतंय. कवितेला प्रेरणा मिळतेय. वेगवेगळ्या साहित्यिक
ग्रुपमधे प्रत्यक्ष भेटून जे साध्य होत होतं ते काम व्हॉट्सॅप ग्रुपमुळे होतंय.
माझ्या स्वभावाला आणि तब्येतीच्या दृष्टीनं हे चांगलंच आहे..!
२१.५,
४.६.२०१७
अनिल मोहरीर
यांनी ‘Soul’ नावाचं एक पुस्तक लिहिलंय- आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांचं
वैज्ञानिक आकलन अशी त्यांची भूमिका आहे त्यात. मी त्याचा मराठी अनुवाद करावा असं त्यांनी
सुचवलंय. करावा असं मनात आलं आहे. विषय आवडता आहे. आणि मत जुळणारे वाटतेय. वाचून
ठरवीन.
‘सोल’ वाचन
चालू आहे. पण ग्रीप येत नाहीए. ‘आनंदी गोपाळ संक्षिप्तीकरणाच्या कामाला नाही
सांगितलं. आणि तेवढ्यात विलास खोले सरांचा अचानक फोन आला. बोलता बोलता त्यांना सहज
या बाबतीत सल्ला विचारला तर त्यांनी हे काम मी करावं असं पटवून दिलं. आणि मला
पटलं. मंदाताईना लगेच फोन करून तसं कळवलंही. पुस्तक शोधून वाचायला सुरुवात केलीय.
जमेल असं वाटतंय. सरांनी अंजली कीर्तने यांनी लिहिलेलं आनंदी जोशी चरित्र वाचायला
दिलंय. तेही वाचतेय.
२४, २९.६.२०१७
बोन डेन्सिटी
टेस्ट झाली. सुधारणा आहे. पण कंबर दुखतेच आहे... आता वाटायला लागलंय की दुखण्याला
मीच धरून ठेवलंय खांबासारखं. काय काय टाळायला निमित्त म्हणून.. सुटका हवी असेल तर
मीच सोडायला हवी मिठी लेट इट बी म्हणत, दुखण्याच्या कारणांमागे, परिणामांमगे
धावणार्या कल्पनांना दुखण्याच्या वर्तमान रूपात पाहायला लावत... हातातला सुसह्य
क्षण अशा कल्पनांनी क्लेषकारक होतो...
एकदा मीच मला
विचारलं, काय होतंय?, कंबर दुखतेय... केव्हा? उभं राहून काम करताना.. एरव्हीही मधे
मधे लक्ष वेधतेय.. हं.. आणखी?, पोट डब्ब झालंय.. त्याचा जोर पडत असेल.. बाकी?
अं... आणखी काही नाही... विचार करता करता ‘जमतंय, ठीक आहे..’ याची यादी मोठी
झाली... एवढं दुःख तर अनेकांच्या वाट्याला आहे... मी का धरून बसलेय त्याला?
२४.७.२०१७
‘गौहरजान
म्हणतात मला’- सुजाता देशमुख, ‘पाथेर पांचाली’- नीलिमा भावे ही पुस्तकं वाचली..
त्याविषयी नेहमीप्रमाणे डायरीत काही लिहिलं नाही.. फोनवर बोलणं झालं..
१८, ३०.८.२०१७
वंदनाच्या
‘सृजनसेतू’ अंकासाठी ‘कुसुमाग्रजांच्या कवितेतील ईश्वर-शोध’ या विषयावर लेख
लिहिण्याच्या निमित्तानं कुसुमाग्रजांचे सगळे कवितासंग्रह वाचले. के रं शिरवाडकर
यांचं ‘तो प्रवास सुंदर होता’ हे पुस्तकही वाचलं.. त्यात पार्श्वभूमीसह संग्रहांची
सलग माहिती मिळाली. लेख लिहिता लिहिता विषयात घुसत गेले. २० पानी लेख झाला. माझा
विचारही त्यातून स्पष्ट झाला.
समतोल
अंकासाठी लिहिलेला ‘विश्वकुटुंब’ लेखही मोठा झालाय. लेखांच्या निमित्तानं अभ्यास,
वाचन, विचार झाला... तो लेखापुरता राहिला.
८, १५.११.२०१७
राजेश्वरी
कोठाण्डम यांनी ‘मेरे हिस्से की यात्रा’ या माझ्या कवितासंग्रहाचा तामिळ अनुवाद
केलाय. तो प्रकाशित झाल्याचं समजलं. पाठोपाठ दोन प्रतीही हातात आल्या. उघडून
पाहिलं पुस्तक. काही समजत नाहीए... अक्षरं म्हणजे मला आनंद देणारी नक्षी वाटली..!
‘आनंदी
गोपाळ’च्या संक्षिप्तीकरण कामाला सुरुवात झाली. तीन प्रकरणं झाली.
‘पहाट पावलं’
या सकाळ पेपरमधल्या सदरात लिहिण्याबद्दल संतोष शेणई यांचा फोन होता. लिहीन म्हटलं.
दोन लेख लिहून पाठवलेत.
२१.११,
२१.१२.२०१७
आनंदी जोशी
यांच्यावर अंजली कीर्तने यांनी बनवलेली फिल्म पाहिली. त्रोटक वाटली. मात्र त्यांच्या
५०० पानी पुस्तकातून बरीच माहिती, त्या काळची पार्श्वभूमी समजली. संक्षिप्तीकरण
करताना या माहितीचा उपयोग झाला.
‘अथाह’चा
अनुवाद केलेली ‘अथांग’ कादंबरी प्रुफं तपासायला आलीय. हे काम वाटलं त्या मानानं
जिकीरीचं झालं. पण पूर्ण करून पाठवलं...
मधे मधे
डॉक्टर... कार्यक्रम आणि वेगवेगळ्या प्रकारचं लेखन यात वर्ष भरकन गेलं...
डॉक्टरांच्या औषधांइतकाच वेगवेगळ्या कामात व्यस्त राहाण्याचा उपचारही प्रभावी ठरला..!
***
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment