आता परतीचा मार्ग नाही...
१-१५.४.२०२०
सकाळी
उठल्यापासून ‘बाहेर पडू नका.. काळजी घ्या.. हात धुवा.. अंतर ठेवा..’ अशा सूचना
दिल्या जातायत लाउडस्पिकरवर.. फोन लावला कुणाला तर रिंग व्हायच्या आधी या सूचना
ऐकू येतायत... या घाबरवणार्या पार्श्वसंगीतावर दिनचर्या चालू आहे.... रामायण
महाभारत मालिका चालू केल्या आहेत टीव्हीवर. सकाळ संध्याकाळ एकेक भाग दाखवतायत. वेळ
छान जातोय..
व्हॉट्सॅपवरच्या
गुड मॉर्निंग उपक्रमात आता चांगदेवपासष्टी हा विषय घ्यायचा ठरवलंय.. चांगले स्वागत
झाले आहे.
पाच तारखेला
रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे इलेक्ट्रिक दिवे बंद करून साधे दिवे लावायचेत
प्रार्थनेचा एक भाग म्हणून.. पंतप्रधानांचं आवाहन आहे....
संपूर्ण
लॉकडाऊन अनुभवत आहोत. घरात सर्व वस्तूंची रेलचेल असायची. आता एकेका वस्तूसाठी
अवलंबून राहावं लागतंय.. वस्तू मिळतही नाहीएत... १४ तारखेला पहिले २१ दिवसांचे
लॉकडाऊन संपले. तीन मे पर्यंत परत वाढवलेय. काही भाग सील केले आहेत. बातम्यांमधे
सतत कोरोना बाधितांची, मृतांची संख्या किती वाढतेय ते सांगतायत...!
हे वातावरण हळूहळू
अंगवळणी पडायला लागलंय.... ही लाट किती वर उसळून खाली येणार आहे कोणजाणे...
ओळखीचे लोक
एकमेकांना फोन करतायत. ‘काळजी घ्या’ हे जगण्याच्या गाण्याचं ध्रुवपद झालंय. जवळची
सगळी ओके आहेत. बाळं जन्माला येतायत. आई-वडील सुखावतायत. सूर्य उगवतोय.. मावळतोय.
फुलं फुलतायत खुशाल.. आकाश रंगाकार बदलत सुखरूप आहे वर.... पक्षी किलबिल करतायत. मुलं
खेळतायत... वॉचमन गस्त घालतोय रात्री... कुत्री भुंकतायत.. आपापल्या घरात
सर्वांचे चहा- नाश्ते- जेवणं- झोपणं.. सर्व चालू आहे....
घरातून बाहेर
न पडता स्वतःची काळजी घेणं हे समाजकार्य आहे सध्या. या भयंकर साथीला पुरून उरायचं
आहे. कुणीही यावं उचलून न्यावं हे नाही चालणार...!
पण ज्यांना
घरंच नाहीत, जे काम नसल्यामुळे बेकार झालेत त्यांचे हाल चालले आहेत. सरकार,
समाजकार्य करणार्या संस्था त्यांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत आहेत.
डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, पोलीस यांची कामं वाढलीयत....
कसं असेल जग
या साथीच्या भयंकर त्सुनामीतून बाहेर पडलेलं? ‘माझ्यासारखं जैसे थे’? की अमूलाग्र
परिवर्तन होईल?.. थोडं तरी बदलेलंच जग... बदलावं..!
.....
१८.५.२०२०
लॉडाऊन अजून
चालू आहे. विषाणूंविषयीच्या अतिरिक्त माहितीमुळे समजुतीचा गोंधळही अजून चालू आहे.
व्यक्तीशः मला, शेजार्या-पाजार्यांना, नातेवाईकांना विशेष त्रास नाही. पण बातम्यांमुळे
बाहेर वातावरण तंग आहे ते कळतेय. आता परिस्थितीशी जुळवून घेत जगणं भाग आहे. अमुक
दिवसात हे संपेल आणि सर्व सुरळीत होईल याची शाश्वती नाही. हे नाही तर ते सोबत
असणारच आहे. नव्या बदलत गेलेल्या राहाणीचे, ‘विकासाचे’ साइड इफेक्ट्स सोसावे
लागणार.. तंत्रज्ञान, जागतिकीकरण, विकास.. हे एक आकर्षक पॅकेज आहे, ‘अटी लागू’
असलेले. अटी न पाहता मान्य केलेले, करावे लागलेले. अशिक्षित माणसाने न वाचता
कागदावर अंगठा उठवावा तसं वागतो आहोत आपण... पण आता परतीचा मार्ग नाही. कुणीतरी
आपल्या सर्वांसाठी हे पॅकेज स्वीकारून टाकले आहे.... त्याच्या फायद्यांचा लाभ घेत
आनंदात जगताना ‘घेतलेल्या कर्जा’चे मजबूत हप्ते फेडावे लागणं अपरिहार्य आहे.
.....
१०, १२.६.२०२०
मास्क,
सॅनिटायझर, अंतर ठेऊन बसणे.. अशी सर्व सावधगिरी बाळगत आज जोशी हॉस्पिटलला रुटीन
चेक अप टेस्ट झाल्या... डॉ भट यांना
रिपोर्ट दाखवून आलो. सर्व ओके आहे. पण तिथलं वातावरण अस्वस्थ करणारं होतं. डॉक्टर,
असिस्टंट्स, रिसेप्शनिस्ट... सर्व पूर्ण ‘युनिफॉर्म’मधे.. गाऊन, मास्क, डोक्याला
कव्हर, हँड ग्लोव्हज, चेहर्यावर शिल्ड.... गोंधळलेली अस्वस्थता सगळीकडे भरून
राहिलेली वाटली. आलेल्या प्रत्येकाचं टेंपरेचर बघून बसायला देत होते. दारात
सॅनिटझरची बाटली.. अशी सर्व यंत्रणा ठेवून काम चालले होते.. असं वातावरण.. तरी पेशंटसची
गर्दी नेहमीसारखीच...!!
आता बाहेर
सर्व पूर्ववत चालू झालंय. पण कार्यक्रमांना अजून परवानगी नाही. त्यामुळे ऑनलाईन
कार्यक्रम चालू झाले आहेत... मला बाहेर गावी कार्यक्रमांना जाता येत नव्हतं..
ऑनलाईन सुविधेमुळे तेही शक्य झालं. त्यामुळे उसंत मिळू नये इतके कार्यक्रम सुरू
झाले.. ‘भेटे नवी राई’ कवितासंग्रहाचंही ऑनलाईन प्रकाशन झालं. कवीसंमेलन, मुलाखत,
भाषण, मार्गदर्शन, ‘लेखक आपल्या भेटीला’ अंतर्गत विविध शाळांमधे विद्यार्थ्यांशी
संवाद.. असे बरेच कार्यक्रम होत राहिले. दीपक चोप्रा यांनी तयार केलेला २१
दिवसांचा ऑनलाईन मेडीटेशन कोर्सही केला...!
.....
२७.११, ३१.१२.२०२०
कोरोना साथ
आटोक्यात आली म्हणता म्हणता आता दुसरी लाट आलीय म्हणे परदेशात. इकडे येऊ नये
म्हणून ‘काळजी घ्या’ असं सांगायला सुरुवात झालीय..
कोरोना
संकटानं पूर्ण जग हदरवलं. स्वतःला सांभाळणं हे आव्हान प्रत्येकासमोर होतं. बघता
बघता एकेक लॉकडाऊन पार करत नववर्षात पदार्पणाच्या दाराशी पोचलं आहे जग. या सर्व
काळात दिनचर्येच्या पार्श्वभूमीवर भोवतीच्या अस्वस्थतेचे सावट राहिले..!
***
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment