Monday, 11 July 2022

माझ्या डायरीतून- ६४

so.. let it be...!

२१, २२.९.२०१३

दोन रेडीएशन्स घेऊन झाली.... काल घरातून दुपारी तीनला निघालो. यायला साडेआठ वाजले. साडेतीनला पोचल्यावर माझा नंबर ६.३०-७ ला लागला. आतमधे गेल्यावर प्रत्यक्ष रेडीएशन घेताना काही कळतही नाही. पण त्यासाठी दिलेली पोज आणि त्या पोजमधे जराही न हालता पंधरा मिनिटं झोपणं त्रासाचं वाटलं. दोन्ही हात शिक्षा केल्यासारखे वर... वर धरायला इलॅस्टिक सारख्या कड्या... मान पार उजवीकडे करायची. अंग उघडं. ए सी चालू... हुडहुडी भरेल की काय वाटलं.. आज वेळ कमी लागेल असं सगळ्यांच्या सांगण्यावरून गृहीत धरलं. पण प्रत्यक्षात वेळ कमी लागला असं वाटलं नाही. सवयीनं वाटेल कमी. त्रासही कमी वाटेल. रुबी हॉल पर्यंत जाण्या-येण्याची सवय होईल. आणि या अनुभवापासून दूर दूर होत जाईन तसं मीही सांगीन नवागतांना की काही त्रास होत नाही...

.....

रेडीएशन संपेपर्यंत कोणत्याही कारणानं विचलित व्हायचं नाही असं आज सकाळी शरीराच्या सर्व पेशींना सांगून ठेवलंय. कधी ‘पोर्ट’, कधी गळ्याची शीर, कधी डावा हात कधी मान-पाठ यांना पुढं करून उपचाराला मनःपूर्वक सामोरं जायला त्या घाबरतायत. टाळतायत. कंटाळा करतायत... त्यांना आज समजावलंय. धीर धरण्याचं प्रोग्रॅमिंग रीन्यू केलंय... आता ‘रेडीएशन समाप्त’ हे स्टेशन येईपर्यंत उतरायची घाई करायची नाही. समजलं?

.....

२८.१०.२०१३

आज रेडीएशन ट्रीटमेंट संपली. डॉ. मैय्या आणि प्रत्यक्ष रेडीएशन देणार्‍या सर्वांना, काउंटरवरच्या सर्वांना धन्यवाद म्हणून आले. तीन आठवडे रोज भेटणार्‍या दोघी तिघींचे नंबर लिहून घेतले. संपर्कात राहू म्हटलं. हे सगळं करून येताना थकायला झालं. हुश्श वाटण्याचा आनंद व्हायला उशीर लागला...

.....

३१.१०, २.११.२०१३

ऑपरेशन... केमो... रेडीएशन एवढे टप्पे ओलांडून आता फक्त गोळ्या या टप्प्यावर आलेय. केमोपोर्ट प्रकरण अणखी एक-दोन महिने चालू राहील असं दिसतं. डिसेंबर पहिल्या आठवड्यात पेट स्कॅन करायचं आहे. त्यानंतर पोर्ट निघेल.. पेशन्सची कसोटी चालू आहे.

मूड ठिकाणावरून सारखा घसरतोय. सध्या त्याला जायला काही ठोस कारणं तरी आहेत. या सगळ्यातून बाहेर आल्यावरही काही ना काही निमित्त शोधेलच तो.

आता काळजी करायला ‘पोर्ट’चं निमित्त आहे. ते एका अर्थी बरंच आहे. नाहीतर काळजी करायला मनानं आणखी वेगळ्या कल्पना लढवल्या असत्या.... काळजी करणं / मूड जाणं हे चालूच राहणार. आपण त्याच्या तात्कालिक निमित्तांचा विचार करत राहातो. काळजी वाढवतो.. मूड घालवतो... प्रत्येक वेळा फक्त इतकं लक्षात घ्यायचं की काळजी करण्याचं सध्याचं हे एक केवळ निमित्त आहे. मिळेल तेवढा मनाचा पैस ते आडवणार. मनात इतर गोष्टींना येऊ दिलं, मनाला त्यात रमता आलं तर ते ‘निमित्त’ आक्रसून स्वतःच्या आकाराएवढं राहील फार तर.. so.. let it be...!

.....

१३, २०, २५. १२.२०१३

आज केमोपोर्ट काढायचं छोटंसं ऑपरेशन आहे. सगळं झटपट ठरलं. देशमुख हॉस्पिटलमधे सकाळी नऊला बोलवलंय... गेलो...

पोर्ट काढून झाला. जेवेपर्यंत घरी आलो सुद्धा. लोकल भूल देऊन केलं. त्यामुळं सगळं कळत होतं. ऑक्सिजनचा मास्क लावून सगळं तोंड झाकलं होतं. पायाखाली काहीतरी गार पट्ट्या ठेवल्या होत्या. हाताला बी पी चं मशीन आणि बोटाला पीन लावून ठेवलेली. ऑपरेशन सुरू झालं. कापताना, बसवलेला पोर्ट ओढून काढताना, टाके घालताना.. त्या त्या कृती कळत होत्या. पण काही त्रास झाला नाही. रूममधे आल्यावर खूप थंडी वाजली. ऑपरेशनची जागा दुखायला लागली. पण थोड्या वेळात उठावसं वाटलं. चहा प्यावासा वाटला. चहा पिऊन घरी आलो....

......

वर्ष संपत आलं... सध्या मूड शांत आहे. कसली कासाविशी नाही. काळजी.. दुखणं सहज मॅनेज केलं जातंय. लेखन.. त्या संदर्भातला प्रतिसाद ह्यामुळं सुखावतेय. आम्ही दोघं खुश आहोत एकमेकांवर... ह्यांच्या अथक सहकार्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. उठताना आधार देणं असो, वाकायला नको म्हणून गरजेच्या सर्व वस्तू वेळोवेळी हतात देणं असो, दवाखान्यात जाणं असो की बाहेरून काही आणणं असो... त्याचा उच्चार होण्याचा अवकाश की लगेच जराही न कंटाळता करतात.... भावंडांचंही या आजारात असंच प्रेम अनुभवायला मिळालं.... सीतेला वनवास सुखाचा वाटला तसा आजाराचा हा सर्व अनुभव त्रासाचा तरी प्रेम अनुभवायला मिळण्याचा झाला..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment