Friday, 1 July 2022

माझ्या डायरीतून- ५६

३.४.२०१३

थर्ड डिग्री थर्ड स्टेज कॅन्सर होता असं रिपोर्टमधे आलं. मग पुन्हा त्या बायप्सी सॅम्पलची टेस्ट आणि माझी पेट स्कॅन अशा टेस्ट झाल्या. पेट स्कॅनची भीती आणि करावं लागतंय याचा त्रास, दुःख, चिडचिड... सगळे टप्पे पार करत, प्रत्येक उपचारापूर्वीच्या टेस्टस देत पहिली केमो पार पडली. तरी कॅन्सर शब्द लिहवत नाहीए. भीतीनं नाही, तसं नसेलच या विश्वासाचा असर अजून असेल म्हणून...

केमोचा त्रास असह्य असा काही झाला नाही. फक्त उजवा हात सलाइनला अडकल्यामुळे जेवण भरवून घ्यावं लागलं. सारखं पाणी आणि सलाईनमुळे झोपल्याजागी ‘पॉट’ घ्यावं लागलं. तोंडाची चव पार म्हणजे पार गेली... आतून कसलं तरी कोटिंग केल्यासारखं वाटत होतं. मळमळ.. गरगर होत होती. सगळ्यांची मदत घ्यावी लागत होती. २-३ दिवस एका बाजूला ड्रेन ट्यूब आणि दुसर्‍या बाजूला सलाईनमधून केमो ड्रग्ज चालू अशा अवस्थेत बेडवर उताणं पडून राहावं लागलं.... आणि हसरा चेहरा ठेवत काही त्रास नाही असं म्हणावं लागलं.

यातली प्रत्येक गोष्ट म्हटलं तर आकांत करावा अशी, असं सोसण्यापेक्षा आता ‘बास’ म्हणावं अशी... म्हटलं तर स्वाभाविक.. स्वीकारलं तर कुठे काय असं म्हणावं अशी....

सात तारखेपासून कुणाकुणाची हार्दिक सोबत आहे. ‘संकट’ सगळ्यांनी मिळून झेललंय. भोवतीच्या त्या ‘सगळ्या’त मी सामिल व्हायचा प्रयत्न करतेय. देह संकटाचा वाहक आहे. अनेकांबरोबर मी पण त्याच्यासोबत आहे... सगळ्यांनी मिळून त्याच्यावरचं ओझं उतरवायचं आहे. वेदनेत विसावा, कुरुपतेत सौंदर्य भरायचंय.. त्याचं त्रेसष्ठ वर्षांचं ऋण मला फेडायचंय.... किती बरं की ते करायाला इतक्या जणांची हार्दिक मदत मिळतेय....

‘होण्या’कडे, त्याला कसलंही नाव न देता, उपाधी न लावता मी तटस्थपणे पहावं... तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते पाहावे..! खरंतर या शहाणपणाला पर्याय नाहीच आहे. पण ते मिळवण्याच्या आणि आचरण्याच्या संधीचा लाभ घेता यायला हवा....

बुद्धी आहे तर अशा युक्त्या सुचतात रोज सकाळी. पण शहाणपणाचा झेंडा फडकत नाही सतत... दिवसाबरोबर उतरत राहतो खाली आणि रात्री ‘सगळ्यां’मधे सामिल झालेली मी देहात कोसळते तेव्हा बेंबीच्या देठापासून निघालेला हुंदका माघारी परतवणं फार जड जातं...

‘फानूस बनके जिसकी हिफाजत हवा करे / वो शम्मा क्या बुझे जिसको रोशन खुदा करे..! ... ‘संकट’च जर ज्योत सांभाळणारा आडोसा झालं तर ज्योत कशी विझेल? (संकटाकडे ‘आडोसा’ म्हणून पाहण्याच्या या कल्पनेनं तेव्हा मला बराच दिलासा दिला होता.)

.......

मिलिंद बोकील यांची ‘गवत्या’ ही कादंबरी वाचायला घेतली होती. ती वाचून झाली. एका पट्टीवर तंबोरा लावून ठेवावा तसं ४१० पानी एकसुरी वर्णन आहे... एका गावाचं, त्यातल्या विविधरंगी माणसांचं, मनाचं आणि मधून मधून समजत गेलेल्या तत्त्वज्ञानाचं.... कुठलाच ‘मुद्दा’ नवा वाटला नाही. शैलीही साधीच. ‘नुसतं असणं’.. अनुभवणं, त्यासाठी डोंगरावर गुहेत.. एकटं बसणं, गुरुजींचं शिकवणं.. हे यातलं महत्त्वाचं वर्णन तसं प्रभावी, नवं वाटलं नाही. त्यानं भारावून जाऊन अमेरिकेत एखादी संस्था काढण्याच्या प्रक्रियेत त्याला निमंत्रण मिळणं हे काहीच्या काहीच वाटतं..!

......

४.४.२०१३

काल कसबेकर डॉक्टरनी भेटायल बोलावलं होतं. गेलो... डॉ.नी तपासलं आणि काही कळायच्या आत टाके आणि ड्रेन ट्यूब सुद्धा काढली. इतकं अनपेक्षित झालं हे की हुश्श फील यायला वेळ लागला. जरा वेळ बसते म्हटलं. मग डॉ.शी गप्पा झाल्या. त्यांना ‘ईशावास्यम्‍...’ पुस्तक दिलं होतं. अप्रतिम लिहिलंय असं म्हणाले. मग स्वतःच्या अध्यात्मिक असण्याविषयी सांगितलं.... स्वतःच्या इनकम मधलं अर्धं ते भटक्या कुत्र्यांवर खर्च करतात. स्वतः साधं राहतात... पेशंटला आधीपासून टाके, ट्यूब काढणार असल्याचं सांगत नाहीत कारण पेशंट आधीपासूनच कल्पना करत राहतो.... इ. खरंच आहे.. ट्यूब कशी काढणार याची तर मी कल्पनाच करू शकत नव्हते.. ती कधी काढली कळलंही नाही. फारच थोडं दुखलं त्या मानानं.. आता हुश्श वाटतं आहे..

....

१०.४.२०१३

हुश्श वाटणं जुनं झालं... मग केसांची मुळं दुखणं सुरू झालं. केसांचा स्पर्श निर्जीव वाटायला लागला. कपडे काढताना केसांना लागणारा धक्काही दुखायला लागला. सोबत भीती की कपड्यांबरोबर केसही निघून येतील की काय... केसांचं दुखणं आणि गळणं अपेक्षित होतं तरी रडू यायला लागलं. राहून राहून पुन्हा पुन्हा वाईट वाटत राहिलं... अशा वाईट वाटण्याचं आश्चर्यही... कारण चाळीस वर्षांपूर्वी (ब्रेनच्या ऑपरेशनसाठी..) वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी दाट, काळीभोर, लांबसडक वेणी कापून टाकून गोटा केला होता एका दमात... ते मी किती सहज स्वीकारलं... रुमाल बांधून फिरताना कसलीही फिकीर वाटली नाही... नोकरीत असूनही..! आणि आता वयाच्या ६४ व्या वर्षी केस गळण्याचं दुःख..? वाईट दिसण्याची भीती? कमाल आहे..! असो.. पण आता स्वीकाराची तयारी झाली. गळणार्‍या केसांसाठी एक पिशवी केलीय आणि केस दुखू नयेत कपडे काढताना म्हणून रुमाल बांधण्याचा उपाय शोधलाय...! दाताच्या वर हिरडीला गालाच्या सापटीत फोड आलाय. त्यानंही रडवलं केसांबरोबर... त्यासाठी औषध लिहून दिलंय डॉक्टरानी.

काहीही होऊदे ‘उपाय’ सज्ज असतात सेवेसाठी. उपायांचा अपाय व्हायला लागला तर त्यावर नवा उपाय असतोच..!

काल केंद्रीय हिंदी निदेशालयाचं पत्र आलं. अहिंदी भाषी लेखकांच्या हिंदी साहित्यासाठी असलेल्या एक लाख रूपयांच्या पुरस्कारासाठी ‘इसीलिए शायद’ या हिंदी कवितासंग्रहाची निवड झाली म्हणून. पत्र पाहून खूप आनंद झाला... हे पत्र यायच्या नुकतंच आधी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या ‘गोविलकर’ पुरस्कारासाठी ‘ईशावास्यम्‍...’ची निवड झाल्याचं समजलं..! आनंद फेसबुकवर शेअर केला... अनेकांनी अभिनंदन केलं. छान वाटलं...

त्रास.. दुःख.. वेदना.. याची दुसरी बाजू..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment