Wednesday, 29 June 2022

माझ्या डायरीतून- ५५

७.२.२०१३

बघता बघता नव्या वर्षाचा पहिला महिना संपत आला. कार्यक्रम, प्रवास, वाचन असं काय काय चालू आहे. पण गुंतवून ठेवणारं मोठं प्रोजेक्ट हातात नाहीए... तब्येतीकडे लक्ष जातंय. काहीतरी होत असतंच. मूड डाऊन होतोय... म्हणून अलिकडे लिहिलेल्या नवीन कविता एकत्र करून ‘आगामी’ संग्रहाचं स्क्रिप्ट बनवण्याचं काम चालू केलंय. पुस्तक छापील स्वरूपात येईपर्यंत इ-बुक रूपात करावं असा विचार आहे...

१७.२.२०१३ / २४ २. २०१३

स्क्रिप्ट तयार झालं. ‘जगण्याचा बेहिशोबी तपशील’ या नावानं त्याचं इ-पुस्तक बनवलं. १३ फेब्रुवारी (गणेशजयंती) तारीख टाकून हे आणि आधीचं.. दोन्ही ईपुस्तकं माझ्या वेबसाइटवर अपलोड केली. ठरवल्याप्रमाणे करता आलं याचा खूप आनंद झाला. इतका की तब्येतीच्या तक्रारीकडे, त्यातलं गांभिर्य जाणवूनही सहज पाहता आलं. डॉ. कसबेकरांकडे जावं लागलं. त्यांनी बर्‍याच टेस्ट्स करायला सांगितल्या. केल्या. सगळ्या नॉर्मल आल्या आहेत.

पण पी एफ टी टेस्ट नॉर्मल आली नाही. या टेस्टमधे फुफ्फुसांची आकुंचन-प्रसरण होण्याची क्षमता तपासली जाते. ती माझी ९७ वयाची आहे असं निघालं.... कारण काय असावं? पुरेसा वापर न केल्यामुळे यंत्र बिघडतात तसं झालं असावं. थोडक्यात समाधान, भागवून घेणं... ही वृत्ती श्वास घेण्यातही असावी? मी ‘घुसमट’ स्वीकारत राहिले की काय?

माझ्या बायोडाटात दोन ई-पुस्तकांची छान भर पडली.. या दमदार बायोडाटाचा कणभरही संदर्भ उपयोगास आला नाही जोशी हॉस्पिटलमधे....

खूप सार्‍या तपासण्या झाल्या. देहाचा एकेक भाग सुटा तपासला यंत्रांनी... शरीरशास्त्राने ठरवलेले अद्ययावत निकष लावले गेलेत... मी जन्मतारखेनुसार ६४ वर्षांची आहे. पण माझ्या हाडांचं, हृदयाचं, फुफ्फुसाचं... पेशीपेशीचं वय वेगवेगळं आहे..! त्वचेच्या खोळीत सगळं नांदतंय आपापल्या मगदुराप्रमाणे.....

......

२६.२.२०१३

या सगळ्या टेस्ट्समुळे जरा विचलित झाले होते. त्या अस्वस्थतेतून एक कविता लिहिली गेली. कुणाकुणाला मेलनं पाठवली... फेसबुकवर शेअर केली. कविता आवडल्याच्या बर्‍याच प्रतिक्रिया मिळाल्या... फ्रेश व्हायला झालं. उत्साहाचा प्राणवायू मिळाला... आता माझी फुफ्फुसं हळूहळू तरुण होणार..!

१२.३.२०१३

डॉक्टरांनी सर्व कल्पना दिली होती. त्यानुसार सात मार्चला बायप्सी टेस्ट झाली ब्रेस्टची. रिपोर्ट येईपर्यंत भूल दिलेल्या अवस्थेत ठेवलं होतं. टेस्ट पॉझिटिव्ह आली. लेगेच ऑपरेशन झालं. आजार होता आणि आता तो काढून टाकला दोन्ही एकदमच समजलं. विश्वास वाटत होता खूप निर्विवाद की काही निघणार नाही. पण तसं झालं नाही. मी फसले गेले... शुद्धीवर आल्यावर नक्की काय ऑपरेशन केलंय हे कुणी स्पष्ट सांगत नव्हतं.... जरी अंदाज आला होता तरी स्पष्ट ऐकायचं होतं... ते कळल्यावर विशेष काही वाटलं नाही...

वेदनांपेक्षा ऑपरेशनमुळे आलेल्या पोकळीकडे बघवत नाहीए.... जगाजवळ इतक्या भयंकर गोष्टींची रेलचेल आहे की माझ्या प्रत्येक तक्रारीला तरी बरं म्हणून गप्प करता येईल...!

कितीही ज्ञान मिळवलं तरी गर्व करायला जागा असत नाही... कितीही उंच गेलं तरी आकाश तितकंच दूर राहातं... तसं प्रत्येक वेदनेसमोर काढता येतील अशा असंख्य मोठ्या रेघा असतातच....

***

आसावरी काकडे


No comments:

Post a Comment