१७.९.२०११
मुंबई विद्यापीठात मंगेश पाडगावकर यांच्या अनुवादांवर चर्चासत्र
आयोजित केलंय. त्यात मला त्यांच्या ‘मीरा’ या अनुवादावर निबंध सादर करायचा आहे.
त्या निमित्तानं मीरेविषयी कुठून कुठून माहिती मिळवतेय. त्यात आशा साठे यांनी किरण
नगरकर यांच्या ककल्ड ( Cuckold ) कादंबरीचं नाव
सांगितलं. या मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद ‘प्रतिस्पर्धी’ या सौम्य नावानं
रेखा सबनीस यांनी केला आहे. ती कादंबरी मिळवली... मीरेची भक्ती ही काय चीज आहे? हे
समजून घेणं अवघड आहे. त्या दिशेनं विचार... वाचन घडू लागलं आहे. या कादंबरीत
त्याचा शोध लागतोय का बघतेय...
‘जीवनात रंगीत तालमीला वाव नसतो..’
‘तिला आपली उत्कटता काव्यात व्यक्त करायला आवडायची. तिचं नाच, गाणं
म्हणजे फक्त तिच्या कवितेचं वेगळं आणि विस्तृत स्वरूप..’
‘माझ्या बायकोने शांत हळूवारपणे आपल्या मनाचा शोध घेत संगीताची
सुरुवात केली. हा वेगळाच विस्तार होता. प्रमाणबद्ध नसूनही अस्ताव्यस्त नसलेला.
तिचं संगीत म्हणजे शुद्ध आनंद...’
अशी टिपून घेण्यासारखी बरीच वाक्यं या कादंबरीत आहेत. वाचताना ती आपली
पकड घेते. पूर्ण केल्याशिवाय ठेवता येत नाही. विशेष म्हणजे अनुवाद असूनही लेखनातला
प्रवाहीपणा कुठेही कमी वाटत नाही की भाषेत कृत्रिमता जाणवत नाही.
मीरेचा पती- युवराज भोजराजाविषयी ऐतिहासिक माहिती फारशी उपलब्ध नसताना
६०० पानी कादंबरी लिहिणं म्हणजे कमाल आहे. युद्धनीती, राजघराण्यातलं वातावरण,
कटकारस्थानं, वेगवेगळ्या व्यक्तीरेखा, निसर्ग वर्णन, संगीताविषयीचं भाष्य,
स्त्रियांशी आलेल्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या संबंधांची सूक्ष्म तपशिलासह वर्णनं,
मीराबाईशी असलेलं नातं (पूर्ण कादंबरीत मीरा हे नाव एकदाही येत नाही. मेरठच्या
राजाची कन्या, राजकुमारी, राजकन्या, बायको, हिरवे डोळेवाली, छोटी संतमाई.. असे
तिचे उल्लेख आहेत.) हे सर्व खरंखुरं वाटावं इतकं प्रभावी लेखन झालं आहे.
मीराबाईच्या भक्तीचं स्वरूप नक्की काय असेल ? या प्रश्नाचं उत्तर
प्रश्न स्वरूपातच मिळतं. पण तिच्या निस्सिमतेचा प्रभाव भोजराजावरही होता आणि
घरातील व समाजातील सर्वांवर होता. तिला छोटी संतमाई म्हटलं जाऊ लागलं होतं....
भोजराजा तिचं ‘प्रेम’ समजून घेतो, तिचा आदर करतो पण व्देषही करतो, राग राग करतो.
पण शेवटी (कादंबरीत तरी) तिचाच मार्ग अनुसरतो.... शेवटी बन्सीबाजाला मारायला धावणं
आणि त्याच्याशी एकरूप होणं यातून त्याची व्दिधा मनःस्थिती परिसीमा गाठते.
वाचताना मनात येत राहिलं, मीराबाईनं कृष्ण-प्रेमात स्वतःला बुडवून
घेतलं, त्यात ‘भक्ती’खेरीज आणखी कुठली प्रेरणा असेल काय?... म्हणजे पहिल्याच
‘रात्री’चा अनुभव लक्षात घेऊन, चितोडचं कौटुंबिक.. राजकीय वातावरण बघून मीरा
सगळ्यापासून अलिप्त झाली असेल काय?... एक प्रकारे स्वतः अलिप्त होऊन भोजराजाची
झाकली मूठ ठेवली असेल का? की मीराबाईनं भोजराजाचं नुकसान केलं... त्याला सतत व्देष
करायला लावून विचलित करून? सगळी सूत्र हातात घेऊन कर्मावतीचं कारस्थान मोडून काढून
भोजराजाला गादीवर बसवण्यात मीरेनं पुढाकार घेतला असता तर बाबराशी झालेल्या
युद्धाला.. इतिहासाला... वेगळं वळण मिळालं असतं का?
पूर्ण कादंबरीभर भोजराजाचं परोपरीचं मनोगत वाचूनही भोजराजाचं एकच एक
रूप साकारत नाही... इतिहासात गडप झालेल्या त्याच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या
प्रतिमा साकारता येण्याच्या शक्यता सूचित करून ठेवल्यायत. मीराबाईच्या जनमानसातील
प्रतिमेला धक्का लावलेला नाही. उलट ती तिच्या काळातच छोटी संतमाई म्हणून मान्यता
पावली.. तिचा छळ झाला तो सावत्र सासू आणि दिराकडून.. पती- सासू-सासर्याकडून
नाही...
‘ती एक व संपूर्ण, बंदिस्त वर्तुळ झाली होती. ज्यात त्याला जागा
नव्हती. ती आणि बन्सीबाज एकमेकात परिपूर्ण गुंतले होते. त्या वर्तुळात शिरकाव
अशक्य. त्याला वगळण्यात आलं होतं...’
‘आजूबाजूच्या जगाचं भान विसरायला लावणारा हा सर्वव्यापी अत्यानंद एका
साधारण मानवाला कसा शक्य होता?’
मीराबाईचं व्यक्तित्व आणि तिच्या भक्तीचं स्वरूप कादंबरीतील अशा काही
जागांमधून समजून घेता येतं...
.....
३.१०.२०११
मुंबई विद्यपिठातल्या चर्चासत्रात सहभागी होण्याचा अनुभव बरच काही
शिकवणारा झाला. अनुवादासंदर्भात नवीन विचार, दृष्टिकोन मिळाला. अनुवादाचं
मूल्यमापन करताना फक्त अनुवादित पुस्तकाच्या संहितेचा विचार करून चालत नाही.
अनुवादकाचा जीवनविषयक दृष्टिकोन, त्याचा वर्ल्ड व्ह्यू या बाजूही महत्त्वाच्या
असतात.. असे काही मननीय मुद्दे मिळाले.
.....
२३.१०.२०११
फोटो काढण्याची सुविधा असलेला मोबाईल मिळाल्यापासून भरपूर फोटो काढले.
ते काढण्याच्या अनुभवाच्या कविता ‘छायाचित्र चौकटी आणि दृश्य : मालिका-कविता’ या
शीर्षकाखाली लिहून ठेवलेल्या... दिलीपशी (भाऊ) सहज बोलण्यातून इ-बुकची कल्पना
निघाली आणि आठ दिवसात पुस्तक प्रकाशितही झाले. काढलेल्या फोटोंमधला साधारण जुळणारा
फोटो एकेका कवितेवर टाकलाय आणि बॅकग्राउंडला फोटोला साजेसा रंग टाकलाय. लॅपटॉपमधे
हे तयार करून अपलोड करण्यापर्यंतची ही पूर्ण निर्मिती भावानं फोनवर सांगितल्यानुसार
मी केली... मस्त वाटतंय पाहायला- वाचायला. मजा आली करतानाही आणि आता भरभरून येणारे
अभिप्राय ऐकतानाही...! कवितांचं असं सादरीकरण हा अनुभव नवीन आहे. आतून सुखावणारा....
***
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment