१.२.२०११
लहानपणापासूनचा अस्वस्थ ध्यास आणि २००६ पासूनचा प्रत्यक्ष अभ्यास याच्या घुसळणीतून ‘ईशावास्यम् इदं सर्वम् : एक आकलन-प्रवास’ या पुस्तकाचं हस्तलिखित तयार झालं. हे काम व्हावं अशी त्या कामाचीच इच्छा असल्यासारख्या काही गोष्टी घडल्या. पुन्हा पुन्हा तपासून फायनल केलेलं स्क्रिप्ट राजहंस प्रकाशनाकडे सुपूर्द केलं. राजहंसचे संपादक आनंद हर्डीकर चांगलं बोलले. लवकरच करू म्हणाले.
४.२. २०११
‘ईशावास्यम् इदं सर्वम्..’चं मनोगत वाचून माजगावकर यांचा फोन आला अभिनंदन करण्यासाठी. ‘या विषयावर जसं पुस्तक असायला हवं होतं तसं हे असेल असं वाटतंय’ असं म्हणाले. स्क्रिप्ट देताना लेखनाबद्दल मी समाधानी होतेच. त्यांचा फोन आल्यावर आणखी समाधान झालं..!
......
२६.२.२०११
मंगला आठल्येकरचं ‘जगायचीही सक्ती आहे’ हे पुस्तक वाचतेय. बरीच पुनरावृत्ती वाटतेय... त्यातले मुद्दे खोडता येण्यासारखे नाहीत. तरी पटत नाहीए. इच्छामरण हा गुन्हाच आहे असं म्हणण्याकडे कल होतोय... सर्वांसाठी एक नियम / कायदा करावा असा हा विषय नाही. हा निर्णय ज्याचा त्यानं घ्यावा....
१.३.२०११
‘जगायचीही सक्ती आहे’ हे पुस्तक वाचताना बरेच विचार मनात येत आहेत....
ज्या अनेक सामाजिक प्रश्नांसंदर्भात शहरांमधून बुद्धिवाद्यांमधे चर्चा होतात, त्याला चळवळींचं रूप येतं त्या प्रश्नांना ‘सामान्य’ माणसं सहज सामोरी जातात, गवगवा न करता त्याचा स्वीकार करतात.... त्यापैकी स्वेच्छामरण / दयामरणाचा प्रश्न सर्वात सहजपणे हाताळला जातो. ‘अनावश्यक’ उपचार त्यांना बंद करावेच लागतात. परवडतच नाहीत... घरी आलेल्या पेशंटची ते यथाशक्ती सेवा करतात आणि त्याला सुखाने मरू देतात....
अगदी शेवटच्या अवस्थेतही स्वेच्छामरण / दयामारण हा गुन्हाच आहे. कारण ती ‘ऋत’ (निसर्ग-नियम... विश्वाचा कायदा) च्या विरोधातील कृती आहे.
कृत्रिम साधनांच्या आधारे जगणं हेही ‘ऋत’विरोधी नाही का? असं वाटू शकेल. पण तशा जगण्याची सुरुवात चाळीशीपासूनच होते.... चष्मा, कृत्रिम दात, व्हिटॅमिन्स.. बी पी डायबेटिस औषधांच्या गोळ्या, श्रवणयंत्र... अशा अनेक टेकूंनी शरीराची गुढी उभी ठेवली जाते.
पूर्णतः परावलंबी झालेल्या / शरीरावर मेंदूचं नियंत्रण नसलेल्या म्हणजे समजतंय की नाही हे कोणत्याही प्रतिक्रियांनी दुसर्यांपर्यंत पोचवता येत नसलेल्या अवस्थेचा स्तर कोणता? व्यक्तिगत जगण्याच्या संदर्भातल्या निरुपयोगी अवस्थेला ‘ऋत’ संदर्भातही निरुपयोगी म्हणता येईल का?
मला भावनिक दृष्ट्या वैयक्तिक दृष्टिकोनातून, विवेक दृष्ट्याही दयामरण / स्वेच्छामरण स्वीकार्य वाटतं. पण तत्त्वतः तो गुन्हाच आहे. त्याला कायद्याने सार्वत्रिक संरक्षण मिळू नये असं वाटतं.... केवळ कायद्याचा दुरुपयोग होईल म्हणून नव्हे. तर कायदा असो नसो लोकांना जे जसं जेव्हा करायचं तसंच ते करतात आणि माणसाच्या कायद्यापलिकडल्या कायद्यात ते बसणारं नाही म्हणून..!
२.३.२०११
कुटुंब-नियोजन म्हणजे जिवांची जन्माला येण्याची संधीच हिरावून घेणं आणि फाशीची शिक्षा म्हणजे जगणं हिरावून घेणं.. पण माणसानं माणसाच्या भल्यासाठी हे स्वीकारलं, कायदे केले. तसंच काही दिवसांनी लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी ‘निरुपयोगी’ ठरलेल्यांना जगण्याचा अधिकार नाही असा कायदा केला जाणं शक्य आहे....
.....
२०.३.२०११
पिंपरीला दादांना भेटून आलो. ८०च्या पुढे वय. आय सी यु मधे ठेवलं होतं. आता बाहेर आणलंय. भेटल्यावर त्यांनीच आमचे हसत स्वागत केले. कसे आहात विचारले. सगळीकडे नळ्या लावलेल्या. खाण्यावर नियंत्रण... श्वास घ्यायला त्रास... युरीनचा त्रास.. पण तोंडानं म्हणत होते आनंदी आनंद आहे. सगळं छान होणार आहे... काही अडचण नाही. श्वासासाठी तोंडावर व्हेंटिलेटर लावलेला तरी ओम नमः शिवाय म्हणत होते. त्यांच्या या प्रतिक्रियांचं, इतकं प्रसन्न असण्याचं आश्चर्य आणि कौतुक वाटलं...!
शेवटच्या अवस्थेला असं सामोरं जाता येणंही शक्य आहे..!
***
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment