Saturday, 18 June 2022

माझ्या डायरीतून-५०

२७.३.२०११

पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनातर्फे नामदेवांचे कार्यक्षेत्र असलेल्या घुमान (पंजाब) येथे स्टडी टूर जाणार आहे. त्यात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळालीय. तिथे नामदेवांचा हरिपाठ पारायण, भजन इ. आहे. त्यात म्हणण्याची नामदेवांची आरती आणि नामदेवांचे पसायदान.. दोन्हीचा हिंदी अनुवाद प्रा. नि. ना. रेळेकर सरांच्या सांगण्यावरून करून दिला. तिथल्या वातावरणात मिसळून तिथला आनंद / भक्तीभावाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचाय... भक्ती अभ्यासाच्या ‘रेसिपी’ज बर्‍याच वाचून लिहून झाल्यायत. आता प्रत्यक्ष स्वयंपाक बनवायचा अनुभव घेण्याची संधी या दृष्टीनं घुमानला जायचं आहे...

४.४.२०११

घुमानला जाऊन आलो. एक धावती ट्रीप झाली. खर्‍या भक्तीभावाची प्रचिती एकदाच आली. आमच्या बरोबर आलेल्या वनारसे पती-पत्नीच्या भजनाला एक शिख भक्त तबल्यावर साथ करत होता तेव्हा... त्याला मराठी भजनं कळतही नसतील पण त्याच्याकडे पाहून तो भक्तीभावानं वाजवत होता असं जाणवलं.. त्याच्या रूपात भक्तीचं दुरून दर्शन झालं..!

एकूण ट्रीपमधे घरी येईपर्यंत बर्‍याच अडचणी आल्या..... सुवर्ण मंदीर, वाघाबॉर्डर, जालियनवाला बाग, राधास्वामी मंदीर, जालंधर येथील वैष्णवीदेवी मंदीर.. यांना भोज्याला शिवून आल्यासारखी धावती भेट झाली. दोन ठिकाणी ग्रुपमधली माणसं हरवली. त्यांची शोधाशोध.. पोलीस कंप्लेट.. यात सगळ्यांचाच खोळंबा झाला. वाट पाहण्याच्या कसोटीच्या वेळात सर्वांनी हास्य-विनोद गाणी गप्पा करून मजा आणली...

पहिल्या दिवशी (३० मार्च) सकाळी नामदेवांच्या पाच मंदिरांचे दर्शन झाले. आणि दुपारी सर्वांनी मिळून भारत-पाक सेमी फायनल मॅच बघितली. फटाके वाजवून विजय जल्लोषात साजरा केला. परतीच्या रेल्वे-प्रवासात फायनल मॅच मोबाईलवर स्कोअर विचारत ऐकली आणि जिंकल्यावर हल्लागुल्ला केला. बाहेर, समूहात मॅचचा असा आनंद घेण्याचा अनुभव संस्मरणीय झाला.

जालंधरला गाडी पाचच मिनिटं थांबणार होती तेवढ्यात सगळ्यांनी कसं चढायचं याचं टेन्शन होतं. गाडी वेळेवर आली पण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर.. मग धावाधाव.. आमची स्वतंत्र बोगी होती. ती सापडली. पण आतून बंद केलेली. ती टीसीला सांगून उघडून घेतली. पण आत लाइट नव्हते. रात्री २-२.३० ची वेळ. अंधारात घुसाघुशी.. सामान खिडकीतून टाकणं... सगळं झालं. मग टीसीनं आत येऊन दिवे चालू केले. हळू हळू स्थिर स्थावर झालं. ... आमच्याच मुळे गाडी लेट होत गेली. पण पाणी संपलं मग स्टेशनवर पाणी भरण्यासाठी दोनदा चेन ओढून गाडी थांबवली. त्यावरून भांडणं.. तक्रारी.. पोलीस.. इ. झालं.

गाडी दोन अडीच तास लेट झाली. वंदनाचे मिस्टर गाडी घेऊन आले होते. पण गाडीपर्यंत येण्यात दमछाक झाली. त्यांनी नो पार्किंगमधे गाडी लावली होती. पुन्हा पोलीस.. वाद.. अखेर निघालो. गप्पा हसणं करत. वाटेत पुढच्या गाडीला धडक होता होता वाचली. जोरात ब्रेक लावला.. मागे कुणी नव्हतं लगेच त्यामुळं मागून धडक बसायचंही वाचलं...

एकूण ट्रीपमधे तब्येत चांगली राहिली. ऊन.. थंडी.. चालण्याची दगदग, वेगळं खाणं पिणं.. सगळ्याशी जमवून घेता आलं. सगळ्या हास्य-विनोद गप्पांमधे थोडा थोडा भाग घेतला... थोडी थोडी चिडचिड झाली. माणसांशी वागताना खुली उदारता दाखवता आली नाही. स्व पलिकडे डोकावता आलं नाही...

संत नामदेव पायी चालत इतक्या दूर पोचले... तिथं जाऊन त्यांचं कार्य समजून घेताना मला स्व पलिकडेही डोकावता आलं नाही...! भक्तीभावाची अनुभूती तर दूरच...

......

२४.८.२०११

अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस. देशभरातून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे. भ्रष्टाचार-विरोधी आंदोलनाचा ‘विजय’ होऊ घातला आहे.... नीतीमूल्यांची घसरण होते आहे तरी प्रत्येकाच्या अंतर्मनात नीतीमूल्यांविषयी आदर आहे... निस्वार्थी, नैतिक वर्तन करणाराला अजून मान मिळतो आहे याचं दर्शन या आंदोलनानं दिलं.

भ्रष्टाचाराची झळ प्रत्येकाला बसते आहे. प्रत्येकाच्या मनात त्याविषयी चीड आहे. त्याची छोटी छोटी स्फुरणं एकत्र आलीयत.... त्यांना अण्णांच्या रूपात नेता मिळालाय. आंदोलन कर्त्यांवर आक्षेपही घेतले जातायत की ते सरकारला वेठीस धरतायत.. आडमुठेपणा करतायत... पण कुणी तरी केव्हातरी असं लावून धरायला हवंच.. कुणी याला केवळ एक वावटळ म्हणून भारावलेपणातली हवाही काढून घेत होतं...

निदर्शनं करत, घोषणा देत निघालेल्या एका मोर्चाबरोबर थोडं चालून त्यात सहभागी झाल्याचं क्षीण समाधान मिळवलं. अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून एक वेळचा चहा / कॉफी बंद करावी असं ठरवत होते. पण एकदाही जमलं नाही. तेवढा निर्धार केला गेला नाही....

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment