Thursday, 2 June 2022

माझ्या डायरीतून- ४४

२५.१०.२००८

‘मी’ एक आपल्याच गतीनं चालणारं जहाज...  कुणाला ते सामान्य वकुबाचं वाटतं.. कुणाला थोर वगैरे वाटतं. जहाज सामान्यही आहे आणि थोरही आहे... पण ते इतरांच्या नजरेतून.. स्वतः जहाज काय आहे? ते चालतं आहे...!

.....

३०.११.२००८

दोन दिवस एस पी कॉलेजात चर्चासत्र झालं. संगीत आणि नाटक हे विषय होते. नवं काय काय समजलं. कोण कोण भेटलं.. छान वाटलं...

मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. त्याचं सावट सगळ्यावर आहे. या वेळच्या मुंबईवरच्या हल्ल्यानं सामान्य माणूस जागा व्हायला लागलाय. त्यानं वेगवेगळ्या प्रकारे आवाज उठवलाय. राजकारण्यांना धक्के दिलेत. केंद्रात गृहमंत्री बदलले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदलले... लोक आता अशा गोष्टी खपवून घेणार नाहीत... सामान्य माणूस जागा होणं ही गरज आहे.

.....

८.१२.२००८

Myth of Sisyphus’ या पुस्तकातला पहिला निबंध वाचून झाला. थोडं काही कळलं ते छान वाटलं. हे जग absurd आहे.. निरर्थक आहे. यात जगण्यासाठी कोणतंच समर्थन नाही. का जगायचं? याला उत्तर नाही. म्हणून मग मरायचं... पण आत्महत्या हाच absurdityचा तार्किक परिणाम / परिणती आहे का? याचा दीर्घ विचार करून निष्कर्ष काढलाय की नाही.. मरायचं नाही. उलट म्हणूनच जगायचं. जगण्याचा अर्थ ठरवण्यासाठी. जगण्याला अर्थपूर्णता देण्यासाठी.... निबंधाच्या शेवटी म्हटलंय, हा सर्व एका प्रकारानं, एका दिशेनं चाललेला विचार आहे. एवढ्यावरच थांबणं बरं नाही. But the point is to live..!

हे वाचताना ‘कर्म’ करतच शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरावी. याहून वेगळा मार्ग नाही. हा ‘ईशावास्य’मधला निष्कर्ष आठवला...

या निबंधातला आशय समजून घेताना एका टप्प्यावर मनात आलेले विचार नोंदवले आणि पुढचं वाचताना तसंच काहीसं सांगितलंय असं लक्षात आलं... या विषयी विचार करताना वाटलं की ही आतून येणारी उमज आहे. पुढे passionate understanding असा शब्दप्रयोग आलाय..! पॅशनेट म्हणजे ज्याची तीव्र आस आहे अशी समज?... यावर विचार होत राहिला.

.......

२२.१२.२००८

‘काव्यशिल्प’च्या स्नेहसंमेलनात ‘आजच्या कवितेत वास्तव-दर्शन घडतं का? या विषयावर बोलायचं आहे....

काल एका कार्यक्रमात कवितेविषयी बोलता बोलता म्हटलं कवितेसाठी स्वतःचा शब्द शोधणं म्हणजे एकप्रकारे स्वतःचं अनावरण करणंच... स्वतःचा शब्द म्हणजे स्वतःचा अनुभव, भावना... त्याच्या मूळ ऊर्जेसह व्यक्त करणारा शब्द. आणि असा शब्द शोधणं म्हणजे स्वतःचं वाटणं, भावना पकडता येणं. नेमकं काय वाटतंय ते समजून घेणं.... हे समजून घेणं म्हणजेच स्वतःचा शोध....

सामाजिक वास्तव, नाती, घटना, समोरच्या व्यक्तीचं म्हणणं... इत्यादी ‘योग्य’ पर्स्पेक्टिव्ह मधून बघणं, समजून घेणं यासाठी सुद्धा या पातळीवरचा emotional intelligence आवश्यक आहे... पण अगदी अभ्यासपूर्ण संवेदनशीलतेनं ‘वास्तव’ समजून घेतलं तरी ते शेवटी आपल्या क्षमतेच्या दर्शनबिंदूतून घेतलेलं असतं. वास्तवाचा आपल्याला दिसलेला भागच आपण समजून घेत असतो. ‘Thing in itself’ आपल्याला समजतच नाही. प्रत्येकाचं ‘वर्णन’ हे सातापैकी एका आंधळ्यानं केलेलं वर्णन असतं.... वास्तव समग्रतेनं समजून घ्यायचं असेल, कोणत्याही वास्तवाच्या, समस्येच्या पोटात शिरायला हवं. वास्तव घटनेचा इतिहास भूगोल माहीती असयला हवा...

आजच्या कवितेत वास्तवदर्शन घडतं का हे शोधायचं असेल तर त्याला एक उपाय आहे. आणि तो म्हणजे कवीजवळ जाणीवनिष्ठा आहे का हे पाहणं. वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांमधून ओसंडणारी खरी-खोटी विधानं आणखी आक्रमकतेनं मांडणं म्हणजे वास्तव लेखन नाही. वास्तववादी कविता ही आधी खरी, चांगली कविता असली पाहिजे आणि जाणीवनिष्ठेच्या कसाला उतरलेली कविताच चांगली कविता असू शकते. अर्थात जाणिवांचा पैस विस्तारत ठेवणं हे चांगला कवी आणि चांगला माणूस असण्यासाठी गरजेचं आहे.

.....

३१.१२.२००८

हे वर्षही तसं भरगच्च गेलं.... बरेच कार्यक्रम झाले. त्यातले बरेच असमाधानकारक झाले... कदाचित माझी स्वतःकडून / इतरांकडूनची अपेक्षा वाढलीय...!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment