Monday, 27 June 2022

माझ्या डायरीतून- ५४

२५.७.२०१२

आज ‘ईशावास्यम् इदं सर्वम्....’ पुस्तक तयार होऊन हातात आलं. छान झालंय. आनंद हर्डीकरांनी प्रकाशकीय मनोगत लिहिलंय आणि पुस्तकाबरोबर एक छान पत्रही दिलंय. या पुस्तकाबाबत ते समाधानी आहेत याचं समाधान झालं. पुस्तकाच्या प्रतींसोबत मानधनाचा चेकही मिळाला. पुस्तक छान झालं या बरोबरच ते आदरानं झालं याचंही समाधान वाटलंय.

......

९.८.२०१२ / २१.८.२०१२ / १.९.२०१२

सुधानं घरी बोलवून ईशावस्यम्..’चं प्रकाशन साजरं केलं... भागवत मॅडम, बेलसरे मॅडम, सुषमा. अंजली आल्या होत्या... गप्पा.. खाणं पिणं.. कौतुक झालं...

चंद्रशेखर बर्वे सरांनी पुस्तक विकत घेतलेय. वाचताहेत. फोन करून आवडत असल्याचं सविस्तर सांगितलं.... अनिरुद्ध कवीश्वरांची मेल आलीय. चांगला सविस्तर अभिप्राय दिलाय... काही पत्र अंतर्मुख करणारी, विचारात पाडणारीही आलीयत.

कोल्हापूरला गेलो. आईनं कौतुक केलं...

पुस्तकाच्या प्रकाशनाची वाट पाहणं संपलं. उत्सुकता संपली. काही पुस्तकं भेट पाठवून झाली. अनेक वर्षांच्या जिज्ञासेचं समाधान करणारं सगळं पुस्तकरूपात साकारलं हा आनंद, मोठा कार्यक्रम करून साजरा करण्याची कल्पना होती. पण ती मावळली. हातातली इतर कामं हातावेगळी झाली...

रिकामपण आलं. लगेच अस्वस्थता आत शिरली... तिचा पाहुणचार करायला हवा खरंतर. लगेच पिटाळून लावायचे प्रयत्न कशाला?

......

२१.९.२०१२

आनंद हर्डीकरांचा फोन होता की ‘अस्तित्वनो उत्सव’ (‘ईशावास्यम्...’ मधे मी अनेक पुस्तकांतील विचारांचे संदर्भ घेतले आहेत. त्यातलं हे एक गुजराती पुस्तक...) पुस्तकाच्या प्रकाशकाचं त्यांना पत्र आलंय की ‘ईशावास्यम्...’ मधे मी त्या पुस्तकातला पानंच्या पानं मजकूर वापरला आहे... या कम्प्लेंटला लगेच उत्तर द्यायचं आहे. त्यांनी मेल तयार केलीय... या निमित्तानं पुस्तक पुन्हा पाहून घेतलं. तीन ठीकाणी (लेखक-पुस्तकाच्या) नावासह त्यातील विचारांचा उल्लेख आहे... अनपेक्षित कारणासाठी आलेला हा फोन धक्का देणारा होता...

२७.९.२०१२

या पत्रासंदर्भात काल ‘राजहंस’ मधे मिटिंग झाली. हर्डीकरांनी त्या पत्राला व्यवस्थित उत्तर दिलं आहे... एखाद्या पुस्तकातील थोडा मजकूर (३०० शब्दांपर्यंत- जसाच्या तसा) कोट करण्याकरता परवानगी लागत नाही. नावासह, योग्य ते क्रेडीट लेखकाला देऊन घेतलेली कोटेशन्स ‘वांग्मय चौर्य’ ठरत नाहीत. त्यानुसार ‘आमची’ काहीही चूक नाही. त्यामुळं माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही... अशी प्रत्येक वेळी परवानगी घेत बसलं तर संशोधनपर लेखनाची कामंच होणार नाहीत... कालच्या मिटिंगमधे ही माहिती मिळाली. हर्डीकरांनी पाठवलेल्या पत्राची प्रत मेलवर मला आली आहे.... यातून शिकायला मिळालं. काहीही कोट करताना सावध राहायला हवं....

या प्रकरणानं पुन्हा बरंच अस्वस्थ केलं....

......

३१.१२.२०१२

आज वर्षाचा शेवटचा दिवस... या वर्षात गद्य लेखन बरंच झालं. पण वाचन फारसं झालं नाही. डायरीत विचारांच्या नाही घटनांच्या नोंदी जास्त झाल्या... दोन महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित झाली... दोन कवितासंग्रहांचे मी केलेले अनुवाद- ‘तरीही काही बाकी राहील’ पद्मगंधा प्रकाशनाकडे आणि ‘तू लिही कविता’ दिलीपराज प्रकाशनाकडे सुपूर्द केले. माझ्या दोन कवितासंग्रहांचे अनुवाद- ‘मेरे हिस्से की यात्रा’ (तमिल) आणि ‘स्त्री असण्याचा अर्थ’ (कोंकणी) अनुवादकांच्या प्रकाशकांकडे सुपूर्द झाल्याचं समजलं...  वैयक्तिक जीवनात अशा बर्‍याच जमेच्या गोष्टी घडल्या. पण राज्यात... देशात अस्वस्थ करणारं बरंच काही घडतंय.. डोकं चालेनासं व्हावं असं...

***

आसावरी काकडे 

No comments:

Post a Comment