६.२.२००९
काल बारामती ट्रीप झाली. Agro tourism. सकाळी एकदा बैलगाडीनं, एकदा ट्रॅक्टरमधून आणि एकदा बांधावरून चालत शेती बघितली. चिंचा गोळा केल्या.... गव्हाच्या शेतात गव्हाचे तुरे आले होते. ते तोडून त्यातला कोवळा गहू खावा म्हणून उघडून पाहिला. वरचं साल काढत गेले तर सालाखाली सालच होतं. सर्व सालं काढून टाकल्यावर आत अजून गहू झालेलाच नाही असं लक्षात आलं. खरं तर गहू म्हणून आत वेगळं काही होणार नसेलंच. हीच आवरणं पुष्ट होत होत घट्ट होत जात असतील... उन्ह त्यातले अनावश्यक द्राव शोषून घेत असेल आणि सगळी आवरणं एकमेकाला बिलगून राहता राहता एकरूपच होऊन जात असतील. तेव्हा टणक गहू तयार झाला असं आपल्याला वाटतं, कळतं, दिसतं प्रत्यक्ष..!
मनात आलं प्रत्येकच वस्तूवरची, घटनांवरची
अशी आवरणं काढत गेलं तर आत वस्तू, घटना म्हणून काहीच मिळणार नाही. प्रत्येक वस्तू,
घटना, व्यक्ती म्हणजे असंख्य आवरणांची भेंडोळी... एकेका आवरणाकडेच आपलं लक्ष जातं.
ज्याला जे आवरण दिसतं, कळतं ते आवरण म्हणजेच ती व्यक्ती, घटना, वस्तू असं त्याला
वाटतं.... सगळी आवरणं सगळ्यांना कळू शकणारच नाहीत. पण तशी ती आहेत, असतात.. हे
‘असण्या’चं स्वरूप कळलं तरी आपण आपल्या दृष्टिकोनाबद्दल दूराग्रही राहणार नाही..!
एकूण ट्रीप छान झाली. मजा आली.
.....
१४.२.२००९
बंगलोरला सखी मंडळाच्या मेळाव्याला गेले
होते. मेळावा झाल्यावर नेहाकडे गेले. तिथं Ayn Rand या लेखिकेचं ‘Atlas Shrugged’ हे पुस्तक पाहायला मिळालं. जरा वेळ चाळलं. सुरुवातीला आयन रँड यांची
लेखनाबद्दलची मतं दिलीयत. त्यातली एक दोन अशी-
Art is a recreation
of reality according to artist’s metaphysical value judgements.
Creative fiction
writing is a process of translating an abstraction into concrete.
अशा लेखनाच्या तीन पातळ्या.. तर्हा
असतात. १- जुन्या, सर्वपरिचित कल्पना, विचार जुन्या पात्रांच्या, मिथकांच्या
माध्यमातून मांडणे. २- जुन्या, सर्वपरिचित कल्पना, विचार नवनिर्मित पात्रांच्या
माध्यमातून मांडणे. आणि ३- नवे विचार, कल्पना, नव्या पर्यावरणात, नवनिर्मित
पत्रांच्या माध्यमातून मांडणे.
‘Atlas Shrugged’ या पैकी तिसर्या प्रकारचं लेखन असलेली दीर्घ कादंबरी आहे.
‘विचार’ जगण्यात उतरले पाहिजेत. अनुवादित
झाले पाहिजेत. जगण्यात उतरणं म्हणजे ते ‘विचार’ कुणीतरी जगून दाखवतंय हे लेखनातून
पटवून देता येणं. मंडलेले ‘वेगळे विचार’ व्यवहार्य आहेत असं दाखवता येणं. म्हणजे
फक्त थेअरी नाही लिहायची तर ती जगण्यात apply करून दाखवायची हे आयन रँडचं ध्येय होतं....
‘विचार’ जगण्यात उतरणं म्हणजे पात्रांच्या नाही, स्वतःच्या खर्या जगण्यात उतरणं
असं मला वाटायचं... आयन रँडनी या वाटण्याला एक वेगळा आयाम दिला..!
......
१९.३.२००९
डॉ. आनंद यादव यांनी त्यांच्या ‘संतसूर्य
तुकाराम’ या कादंबरीत भावना दुखवणारं, चुकीचं लेखन केलं म्हणून जोरदार आक्षेप
घेतले गेले. त्यांनी माफी मागूनही वारकर्यांसारख्या समूहाने त्यांना साहित्य
संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं... यात विरोध करणारे वारकरी
आणि त्यांचे समर्थन करणारे या दोघांविषयी आदर असल्यामुळे हा टोकाचा विरोध समजून
घेणं अवघड जातंय. माफी मागून, पुस्तक मागे घेऊनही ‘शिक्षा’ पुरेशी झाली नाही...
मनात आलं, डॉ. यादव अधक्ष म्हणून निवडून
आले नसते तर मग त्यांना कोणती शिक्षा दिली गेली असती? पुस्तक प्रसिद्ध होऊन इतके
दिवस झाल्यावर आताच त्यातल्या ‘आक्षेपार्ह’ मजकुराकडे लक्ष कसे गेले?
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? यापूर्वी कितीतरी प्रसंगात अभिव्यक्तीला विरोध करणार्यांच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणार्यांनी ठाम भूमिका घेतली. आता मात्र या चुकीला क्षमा का नाही?
हे समजून घेण्यासाठी ती कादंबरी मिळवून
वाचली. ज्याला आक्षेप घेतला गेला तो मजकूर अनावश्यक, चीप आणि फालतू वाटला. पण
पूर्वग्रह न ठेवता कादंबरी वाचली तर पुढील सर्व मांडणीमुळे तुकारामांविषयी वाईट मत
होणार नाही. आदरच वाटेल. आक्षेपार्ह मजकूर
विसरूनच जाईल... कादंबरीत शेवटी अधोरेखित करावेत असे काही विचार आले आहेत. तरी ही
कादंबरी फारशी आवडली नाही. पण न आवडणं आणि इतक्या टोकाचा विरोध करणं यात खूपच फरक
आहे. यादवांनी राजिनामा दिल्यावर तो स्थगित ठेवला गेला. पण त्यांची खूर्ची रिकामी
ठेवली नाही. लेखी भाषण हातात असून वाचून दाखवले नाही. स्मरणिकेत फोटो छापला गेला
नाही... (खरं तर स्मरणिका केव्हाच तयार असणार) हे सर्व अनाकलनीय आहे.
पण सध्याच्या गतिमान युगात ही घटना आता
केव्हाच जुनी, बिन महत्त्वाची झाली. याबद्दल कुणाला काही देणं घेणं नाही....
***
No comments:
Post a Comment