Friday, 15 July 2022

माझ्या डायरीतून- ६८

तरी बधीरता कशी?

१.१.२०१५

नवीन वर्षाची सुरुवात धामधुमीत झाली. भाच्याच्या लग्नानिमित्त काढलेलं रंगकाम पूर्ण झालं.. मग खरेदी.. केळवण.. पाहुणे.. भाऊ मुंबईला आणि लग्न पुण्यात. त्यामुळं आमचं घर लग्नघर झालंय..

ठरल्याप्रमाणे बोनडेन्सिटी टेस्ट झाली. रिपोर्ट गोडबोले डॉ.ना दाखवला एक्सलंट आहे म्हणाले. इंजेक्शनचा उपयोग होतोय. काही दिवस चालू ठेवा असं म्हणाले. आता आशा गोष्टी रूटीनमधे सामिल झाल्यायत..

१.२.२०१५

ठरल्याप्रमाणे लग्नासाठी आई आली. सर्व लग्नविधी वगैरे यथासांग आनंदात पार पडले. तिची प्रकृती बरी नव्हती. ढासळत चालली होती. तीनदा डॉक्टरला दाखवून झालं. दिलेल्या औषधानं तिला बरं वाटलं. काल रोजच्यासारखे उठलो. सगळी येणार म्हणून जेवणाची तयारी करायची होती. फिरणं, नाश्ता झाला. आई उठली. तिचं रोजच्यासारखं सगळं आवरून दूध, बिस्किटं, औषधं सगळं घेऊन झालं. आणि ती परत झोपली. पण थोड्या वेळानं तिला श्वासाचा त्रास व्हायला लागला. ५-७ मिनिटं तळमळली. सहन होत नाही आता.. मी चालले.. असं काही बोलली. मग थकून झोपली. मी जवळच बसले होते... हळूहळू मंदावत श्वास बंद झाला. बघता बघता डोळ्यादेखत आई गेली...! सगळी येईपर्यंत आम्ही तिला थांबवू शकलो नाही... डॉक्टरना बोलवून तिला थोपवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. ते येईपर्यंत ती गेलीच...!  

कळवल्याबरोबर सगळे भराभर जमले. ३ - ३.३० ला तिला नेलं. सगळे हळूहळू पांगले. तिला कोल्हापूरला घेऊन जायला आलेला भाऊ तिच्या अस्थी घेऊन गेला. एवढाच बदल. बाकी सर्व पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे झाले...

खितपत न पडता, परावलंबी न होता आई गेली..! तिचं सोनं झालं.. पुण्यवान.. इच्छामरण.. किती योग्य वेळ साधली... असं बोललं जातंय. अपूर्वाई वाटावी असं मरण आलं तिला...

१८.२.२०१५

आई आठवडाभर इथं होती. नेहमीसारख्या गप्पा झाल्या नाहीत. दमली होती ती. तरी मी दोन तीनदा चिडले तिच्यावर.... मला माफ केलं असेल तिनं. पण माझा पराभव मी नाकारू शकत नाहीए..

काल महाशिवरात्रीच्या दिवशी ‘तू लिही कविता’ या अनुवादित संग्रहाच्या प्रती हातात आल्या... पुस्तक छान झालेय... ‘ईशावस्यम्‍ इदं सर्वम्‍..’ची दुसरी आवृत्ती निघाली. त्याच्याही प्रती हातात आल्या.. ते दाखवायला आता आई नाही...!

२६.२.२०१५

नवीन लेखन सुचत नाहीए. वाचनात लक्ष लागत नाहीए... अंतर्मुख विचारही थांबलेत.... कशाचं फार काही वाटेनासं झालंय. माणूस म्हणून ‘घडण्या’तली असोशीही पूर्वीसारखी नाही राहिली. स्वतःला माफ + हात टेकणं = शांतता...!

२०.४.२०१५

आईशी संवाद करणार्‍या कविता लिहिल्यायत. आईच्या कवितांनी बरेच दिवस बंद असलेलं दार उघडून दिलंय. कुंपण उचलून नेलंय.. बरं वाटतंय.. पण आईच्या आठवणीनं अस्वस्थ होतेय सारखी. क्षणाक्षणाला आठवण येतेय... आपण प्रेमानं काही केलं नाही अशी रुखरुख वाटतेय... आता काय उपयोग..! स्वभावाच्या मर्यादा ओलांडता आलेल्या नाहीएत.... स्वतः आवराआवरी करायच्या तयारीत असूनही स्वतःला ओलांडता येत नाहीए....

.....

२५.६.२०१५

छायाचित्र कविता हा अभिव्यक्तीचा नवा मार्ग सापडलाय... वंदना बोकीलकडे या कवितांचं वाचन झालं... सगळ्यांना खूप आवडल्या. वंदनानं तिच्या ‘सृजनसेतू’ या दिवाळीअंकात स्वतंत्र विभाग करून त्यात प्रकाशित केल्या... या छंदाला पालवी फुटत राहिली...

.....

८.७.२०१५

मधे दोन दिवस एकदम हातातून काहीतरी निसटल्यासारखं वाटलं. रितेपणाचं फिलींग आलं. ब्रह्मकमळाच्या कळीचा फोटो काढल्यावर एकदम असं वाटलं की ‘केवल असण्या’ला रितेपणाचं ओझं झालं... कंटाळा आला.. ते रितेपण भरून काढण्यासाठी ही कळी उमललीय... त्यासाठीच सगळी सृष्टी प्रकटलीय... आणि मग एकदम वाटून गेलं रितेपण कुठं आहे? ‘आहेपण’ सर्वत्र आहेच की...!

२२.७.२०१५

मी बनवलेलं ‘छायाचित्र चौकटी आणि दृश्यं’ हे ई-पुस्तक ‘आकलनाच्या नव्या तिठ्यावर’ या नावानं ई साहित्य प्रतिष्ठानने कालिदास दिनाला प्रकाशित केलं. छान झालंय. आता सलग बघता येतंय..

पण अशा गोष्टींचं छान वाटणं शेअर करायाला आई नाहीए...!

......

२८.८, १६.९. २०१५

ज्ञानेश्वरी वाचन चालू आहे. पूर्वीपेक्षा जास्तच शंका येतायत. आणि बर्‍याच गोष्टी पटत नाहीएत. श्रद्धा भक्तीभाव राहिला दूरच. सगळं काही मोक्षासाठी. जन्म, जगणं इतकं भयंकर आहे की ते पुन्हा पुन्हा नको यायला.. त्यासाठी सर्व उपदेश... हे काही पटत नाहीए. हे सर्व तर आपल्या गतीनं चालूच राहणार. आपण त्या गतीतले काही क्षण... वर्णनंही अतिशयोक्त आणि पाल्हाळिक वाटताहेत....

तरी वाचन चालू ठेवलंय. त्यातल्या काही उपमा छायाचित्रांच्या दृश्य माध्यमातून सादर कराव्या असं सुचलंय.. ‘ज्ञानेश्वरीतील उपमा’ असा एक ब्लॉग तयार करतेय.. आप्पांच्या (माझे वडील) Thoughts in a Nutshell’ मधली वाक्यं छायाचित्रावर घेऊन त्याचं मराठी पद्यरूपांतर करणं चालू आहे. त्याचाही ब्लॉग केलाय...

५.१०.२०१५

हो नाही करत कोल्हापूरला आठ दिवस जाऊन आलो. आईचं भरणी श्राद्ध हे निमित्त होतं... प्रवास आणि राहाणं छान झालं. दोन आक्टोबरला आप्पांचा जन्मदिवस असतो. त्या दिवशी आप्पांच्या ब्लॉगचं प्रकाशन केलं. सगळी जमलेली असल्यामुळं हा इव्हेंट छान साजरा झाला. आईशिवाय...!

२९.१२.२०१५

या वर्षी डायरीलेखन नेहमीच्या उत्कटतेनं झालं नाही. आईच्या जाण्यानं इतकं खोलवर हलवलं तरी बधीरता कशी?

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment