Friday, 8 July 2022

माझ्या डायरीतून- ६१

मला विचारांनी आधार दिला...

८.७.२०१३

परवा पेटकर आजींनी मुलाबरोबर फुलं पाठवली होती देवाला वाहण्यासाठी. त्यांच्या भावना समजून घेताना गहिवरून आलं. कोण कोण कशा कशा तर्‍हेनं आपल्यासाठी शुभचिंतन करत असतं ना? किती असंख्य प्रभाव एकाच वेळी कार्यरत असतात. सगळ्या घडामोडी घडत असताना अशा प्रभावांनी थरथरत असतील.... एखादी घटना घडली.. पूर्ण झाली असं कुठं होतं? ती सतत घडतच असते. घडण्याच्या प्रक्रियेतच असते... दिवस उलटला की वाटतं त्या दिवसाच्या घटनांना पूर्णविराम मिळाला.. पण खरंतर त्या मागील पानावरून पुढे चालूच राहतात....

......

१२.७.२०१३

काल ललिता ताम्हणेशी ‘लम्हा लम्हा’ बद्दल सविस्तर बोलणं झालं. वीस वर्षांपूर्वी करून ठेवलेलं, पडून राहिलेलं अनुवादाचं काम अचानक समोर आलं. ‘लम्हा लम्हा’च्या नवीन आवृत्तीनुसार पूर्वीचा अनुवाद आताच्या जाणकार नजरेतून तपासायचाय.... ही पूर्ण प्रक्रिया घरबसल्या होण्यासारखी आहे. दीप्ती नवल, ललिता ताम्हणे, डिंपल पब्लिकेशन सर्व यात सक्रिय आहेत. मी फक्त अनुवाद पूर्ण करून द्यायचा आहे... एखाद्या गोष्टीचा जबरदस्त योग जुळून येतो म्हणजे काय त्याचं हे उदाहरणच झालं...

आकाशवाणीसाठी एका नाटकाचा अनुवाद करून द्यायचा आहे... ‘तरीही काही बाकी राहील’ या अनुवादित कवितासंग्रहाची प्रुफं तपासून नुकतीच पद्मगंधाकडे दिली.

.....

१७, २३.७.२०१३

अशा कामात गुंतल्यामुळे काल सहावी केमो बर्‍यापैकी हसत-खेळत पार पडली...

काल एका मैत्रिणीशी फोनवर बोलत होते. ती सध्या अडचणींना तोंड देते आहे. काय काय सांगत होती. तिची देवावर खूप श्रद्धा आहे. तिला त्याचा आधार वाटतो.... बोलताना मी म्हणून गेले की या काळात मला विचारांनी आधार दिला... खरंच आहे हे..!

.....

२७.७.२०१३

माईकडून भीमरूपी स्तोत्र लिहून घेतलंय. रोज मोठ्यानं म्हणायचं ठरवलंय. भय्यामामानी सांगितलं की हे म्हणत जा. श्रद्धेनं म्हटल्यावर कुणाला कसा फायदा झाला हे पण सांगितलं.... हे पटून किंवा त्यावर भुलून ते करावं असं वाटलं नाही. पण त्याच्या भावनांचा मान करावा असं वाटलं. पण प्रत्यक्ष म्हटलं जाईना. माई आली होती राहायला. अंघोळ झाल्यावर ती पठणात शिकलेली बरीच स्तोत्रं म्हणत होती. ते ऐकल्यावर वाटलं, आपणही ‘ईशावास्य’ मनात म्हणतो ते मोठ्यानं म्हणावं. प्रतिभा पण म्हणाली होती, जे काही वाचशील ते मोठ्यानं वाच. पुस्तक असो, स्तोत्र असो.. त्यामुळे श्वासाचा व्यायाम होतो. ते पटलं. तसं करावसं वाटलं... आता असं ठरलंय, ईशावास्य आणि भीमरूपी रोज मोठ्यानं म्हणायचं....

विवेकाची कास धरणार्‍या माझा हा पराभव आहे काय? पूर्वी मला हा पराभव वाटला असता... नाईलाजानं, रोजचं एक काम म्हणून पूजा करताना चुकतंय असं वाटून रडूच आलं होतं. आता हे म्हणताना माझी भूमिका मला माहिती आहे. मी हे मोठ्यानं का म्हणणार आहे आणि त्यामुळं काय होऊ शकतं... हे मला स्पष्ट झालेलं आहे. आणि विवेकाच्या गटातून काही वेळ श्रद्धेच्या गटात गेलं तर परतीचा रस्ता राहात नाही असं काही नाही. इकडून-तिकडे करण्याचा खुलेपणा आपण आपल्याला देण्यात सवडीशास्त्र आहे असं मला वाटत नाहीए...

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment