१६
वाढण्याचा क्षण टिपता येत नाही.
२६.३.९८
काल कमावलेलं आज छोटं वाटतं
आहे....
वाढण्याचा क्षण
टिपता येत नाही. पण काल रात्री सगळ्याच्या पार होताना हा ‘तो क्षण’ असं जाणवून
गेलं.. अर्घ्य द्यावीत तसे अश्रू
ओघळत होते. माझं सगळं सगळं हवं असणं, सगळ्या इच्छा एक एक करत सोडत होते मी ‘ओम नमः
शिवाय’ या नामोच्चारामधे.... त्या अवस्थेचं वर्णन आणखी करवत नाहीए..!
......
२८.३.१९९८
लाल रसरशित
सूर्य.... पाणी भरण्यासाठी सामूहिक नळावर कॅनची रांग... लंगडत येणारा भिकारी...
अखेरचं, वाळून काळं पडत आलेलं पान सांभाळत उभा असलेला भणंग नग्न वृक्ष... मरून
पडलेल्या कुत्र्याच्या एका पिल्लाशेजारी दुसर्या पिल्लाला पाजत असलेली कुत्री....
गळून पडलेल्या पानांचा पसारा सर्वत्र.. अभ्यास करणार्या मुली इथे..तिथे..
कोणत्याही ऋतूत तसाच डेरेदार स्वस्थ राहाणारा वृक्ष... आज सकाळी फिरायला गेले
तेव्हा ही मंडळी भेटली.... आज साळुंक्या भेटल्या नाहीत. ते दूध पिणारं पिल्लू मरून
पडलेल्या पिल्लाच्या जवळ आलं. मीही मान फिरवून निघून न जाता पाहिलं ते दृश्य....
मृत्यू तिथं येऊन गेला होता. ते पिल्लू म्हणजे मृत्यूच्या स्मृतीचं दृश्य रूप
होतं. दूध पिऊन आलेल्या पिल्लाने या पिल्लाच्या अंगाचा वास घेतला आणि निघून गेले
हळू हळू.. मीही..!
(अशा दृश्यांचा
विचार आता वेगळ्या प्रकारे होतो आहे... एम. ए. (मराठी) एक्सटर्नल करते आहे. अभ्यास चालू आहे...
त्यामुळे विचारांना नवी चालना मिळते आहे....)
या सर्वाचे यथातथ्य,
दिसले तसे वर्णन म्हणजे वास्तववादी लेखन आणि त्यावर आपल्या भावनांचे, कल्पनांचे
आरोपण, म्हणजे रोमँटिसिझम? दिसले तसे वर्णन करण्यातून ‘माहिती’शिवाय आणखी काय
कळेल? की कल्पना करायला वाचकांना मोकळीक ठेवायची? एखाद्या दृश्यामुळे मनात उमटणारे
कल्पना तरंग, भावना प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. प्रतिभावंत लेखकाला अगदी वेगळं
वाटू शकेल. त्याच्या त्या संदर्भातल्या अभिव्यक्तीतून कलात्मक सत्याचा बोध होऊ
शकतो. वाचकावर दृश्याकडे बघण्याचे संस्कार होतात तेही म्हत्त्वाचेच ना?
घटनांचं यथातथ्य
वर्णन करताना प्रतिभावंत लेखकानं केलेली ‘घटनांची निवड’ हीच असामान्य असते.
सर्वसामान्य लोकांना ज्या घटनांबद्दल विशेष काही वाटत नाही आणि म्हणून ज्या सहजपणे
विसरल्या जातात अशा घटनांत एखाद्या कवीला महत्त्वाचं काही जाणवतं. तो त्या घटना
फक्त शेजारी शेजारी ठेवतो. आणि आपलं जाणवणं सूचित करतो. घटनांमधून घटनांपलिकडचं
व्यक्त न करता व्यक्त होतं. जे सूचित होतं ती कविता..!
.....
३१ ३ १९९८
साहित्याचा,
संप्रदायांचा इतिहास पाहिला की अनेक ‘का?’ चे उत्तर मिळते. प्रत्येक वर्तमान
स्थिती ही आधीच्या पगड्यातून बाहेर पडण्याचा केलेला प्रयत्न असते. प्रत्येक टप्पा
हा इतिहासाच्या साखळीतला एक दुवा असतो. आणि तो कितीही वेगळा म्हटला तरी आधीच्या
टप्प्याच्या हतात हात घालूनच उभा असतो. त्यामुळे आधीचे काही अवशेष (प्रतिक्रिया
म्हणून दुसरे टोक गाठलेले असले तरीही) नव्या अवस्थेत येतातच.
नाथपंथपूर्व काळात
ज्या समजुती, प्रथा होत्या त्या अधःपतनाच्या टोकाशी आलेल्या होत्या. नाथ
संप्रदायाने प्रस्थापित अधःपतीत स्थितीविरुद्ध बंड करून नवे वळण दिले. अव्दैत
तत्त्वज्ञान, लोकभाषेचा वापर, लोकाभिमुखता, समाजाकडे बघण्याचा उदार.. सर्वसमावेशक
दृष्टिकोन, योगमार्ग, गुरूभक्ती, कृष्णभक्ती (यांना अवशेष किंवा प्रतिक्रिया
म्हणता येईल) या गोष्टी नाथपंथाने इतिहासाला दिल्या. महानुभाव, वारकरी पंथाने
त्यातले काही घेऊन, नवे जोडून नवा मार्ग आखला.
अभिजातवादाला
प्रतिक्रिया म्हणून रोमँटिसिझम आला. रोमँटिसिझमला प्रतिक्रिया म्हणून वास्तववाद
आला. तसा नाथपूर्व अवस्थेला प्रतिक्रिया म्हणून नाथपंथ आला असे वाटून गेले.
‘आणि हे कर्म मी
कर्ता । का आचरेन या अर्था । ऐसा अभिमान झणें चित्ता । रिगो देसी ॥’ या ओळी
वाचताना वरचं सगळं मनात आलं. तत्त्वज्ञानही असंच कात टाकत, नवी धारण करत पुढे जात
असतं. अमुक एका टप्प्याचं सुटेपणानं मूल्य ठरवून त्याचे कौतुक किंवा त्यावर टीका
करणं चूक आहे.
***
No comments:
Post a Comment