Wednesday, 17 August 2022

मार्च १९९८-२००० मधील नोंदी- ६

२१

‘विश्वात आपण एकटेच आहोत का?’

१३, १७.६.१९९९

ठरल्याप्रमाणे सकाळी भूगावला शरद कापुसकर यांच्या डोंगरावरच्या घरी गेलो. नेहमीप्रमाणे मजा आली. स्वातीशी विशेष गप्पा झाल्या. एम ए नंतर आता पीएच डीचा विचार मनात येतोय.. ‘बुद्ध, तुकाराम, गांधी’ असा अभ्यास विषय सुचलाय.. इत्यादी बोलणं झालं.. तिला विषय आवडला... नंतर आप्पांचा, (माझे वडील) विषय निघाला. त्यांच्याविषयी सांगितलेलं ऐकताना तिला रडूच आलं.. मीही हलले. या विषयावर काहीतरी लेखन करायचे मनात आहे... मागे एकदा सचिनशी (माझा भाचा) बोलताना आप्पांचा विषय निघाला. तो त्यांच्याविषयी आदरानं बोलला. म्हणाला, ते कोण आहेत, काय आहेत हे त्यांना माहिती नसेल.. ते त्यांच्या काळात जगण्यासाठी नव्हते....

.....

 

बुद्धावरची तीन पुस्तकं आणलीयत... धर्मानंद कोसंबी यांचंही पुस्तक मिळवलंय. वाचते आहे... वेगळं काही समजतं आहे.. बुद्धाने चैनीचा गृहस्थाश्रम आणि संन्याशांची तपश्चर्या दोन्हीचा निषेध केला. त्यानी सर्व समकालिन वाद नाकारले. परलोक चर्चा त्यानी अनावश्यक मानली. दुःख दूर करणे महत्त्वाचे मानले... त्याने गृहत्याग केला तो केवळ आत्मज्ञान, आत्मबोध करून घेण्यासाठी नाही. परस्पर सलोख्यानं चालणारी समाजरचना कशी करता येईल असा विचार तो सतत करत असे. तपश्चर्येने यावर काही मार्ग सापडेल म्हणून त्याने गृहत्याग करून तपश्चर्या केली. पण त्यातून काही निष्पन्न होत नाही हे पाहून तपश्चर्या सोडून दिली आणि एक अभिनव मध्यम मार्ग शोधून काढला. त्याच्या या क्रांतिकारी विचारांमुळे त्याला नास्तिक, अक्रियावादी मानले गेले...

बुद्धाने यज्ञ, जातिभेद यांचा निषेध केला. ‘यज्ञ’ बेकारी नाहीशी करण्यासाठी करावा असे सुचवले. बेकारी घालवण्यासाठी यज्ञ म्हणजे रोजगार हमी योजना.....

.....

 

१८.६.१९९९

आज मूड जाण्याची परिसीमा झाली. सकाळी आणि संध्याकाळी अनावरपणे चिडले. मनातल्या मनात खुशाल वाईट विचार येऊ दिले. कुणाचं तरी देणं दिल्यासारखे. पारा नॉर्मलवर आला लगेच. धुमसत राहिले नाही. स्वतःला टोचत राहिले नाही. तरी प्रसन्नता कोसो मैल दूर आहे. आणि मी नखशिखांत दुश्चित अवस्थेत बुडते आहे. रूटीन पार पाडते आहे.... एकदा पूर्ण भिजल्यावर एखादी सर अंगावर आली तर तिच्यापासून बचावण्यासाठी धावत नाही आपण तसं झालंय. तब्येत, मूड कशाकडेच लक्ष द्यायचं नाही. नुसतं पाहात राहायचं. ‘Tolarance is obediance to God.. सहन करणं म्हणजे ईश्वराची आज्ञा पाळणं’ असं कुठं तरी वाचलं होतं. मनातल्या बिथरलेपणापुढे अशा शहाणपणाचे तुकडे टाकते आहे. शिदोरी काठोकाठ भरलेली आहे. त्यातल्या कोणत्या चेंडूचा नेम बसेल कळत नाहीए...

.....

 

११, १३.७.१९९९

आज जयंत नारळीकरांचा सकाळ पेपरमधला लेख वाचला. त्यातल्या ‘विश्वात आपण एकटेच आहोत का?’ या प्रश्नातील आपण म्हणजे ‘पृथ्वी’ हे स्केल लक्षात घेऊन विश्वातील गहन अथांगात आपण एकटेच आहोत या भयंकर कल्पनेनं पृथ्वीवरील सर्व मानवजात, जीवसृष्टी एखाद्या घरातील भावंडांसारखी एकमेकांना बिलगून बसली आहे असं चित्र डोळ्यासमोरून तरळून गेलं...

....

१९९५ सालच्या ‘लाहो’ या कवितासंग्रहानंतरच्या कविता एकत्र करतेय. नव्या संग्रहाची तयारी...!

 

१५, १९, २५.९.१९९९

बँकेत नवीन योजनेनुसार आपोआप प्रमोशन मिळते आहे. ते स्वीकारावे म्हणून जवळची, सोयीची शाखा देणार आहेत. बरीच उलटसुलट चर्चा चालू आहे. होय नाही करत मी ते स्वीकारायचं ठरवते आहे.. याकडे मी स्वतःतील मर्यादांच्या पार होण्याच्या दिशेने केलेला प्रयत्न म्हणून पाहते आहे. जे मला जमत नाही, जमावं असं वाटत नाही त्यातला ‘आळस’ झटकून फुल स्विंगमधे नोकरी करायचं ठरलं... स्वेच्छानिवृत्तीचे वेध लागलेलेच आहेत. प्रमोशन घेऊन बाहेर पडेन तेव्हा आत्मविश्वास वाढलेला असेल...

चोवीस तारखेला ‘स्पेशल असिस्टंट’ च्या पोस्टसाठी लेखी स्वीकृती दिली आणि निर्णय-प्रक्रियेवर पडदा पडला..! यथावकाश त्यासाठीचं आठ दिवसांचं ट्रेनिंग झालं...

......

 

२५.११, ११.१२.१९९९

 

कवितासंग्रहाचं स्क्रिप्ट डीटीपीला गेलं. ‘मी एक दर्शनबिंदू’ असं शीर्षक अचानक सुचलं आणि पक्क झालं... मुखपृष्ठाची निवड झालीय. आता मनोगत लिहायचंय..

.....

पुस्तकाचं मी करायचं काम संपलं... पुस्तक चांगलं होईल आणि त्याचं भवितव्यही असं लिहिता लिहिता मनात आलंय...

.....

२३.१२.१९९९

आज एम ए (मराठी)चं सर्टिफिकेट मिळालं. प्रथम वर्ग असं लिहिलेलं पाहून छान वाटलं... कवितासंग्रहही तयार होऊन हातात आला... वर्षाखेर छान साजरी झाली..!

***

No comments:

Post a Comment