Monday, 25 July 2022

माझ्या डायरीतून- ७८

 

मी माझ्या ‘असण्या’ची भूमिका बदलली आहे.


२३.५.२०२१

व्हॉट्सॅपवर एक व्हिडिओ पाहिला. त्यातला संवाद-

“तुम्हे गरमी नहीं लगती? कितनी धूप है बाहर..’..

‘सोचता हूँ तो लगती है...!”

गरमी प्रत्यक्षात असली तरी ती आपल्या जाणिवेचा भाग होत नाही तोपर्यंत जाणवत नाही... त्याचा त्रास होत नाही. प्रत्येक बाबतीत हे लागू होऊ शकतं...

.....

८-२६.६.२०२१

मागे एकदा मारामारी करत भांडणार्‍या मुलांना म्हटलं, ‘अरे भांडू नका’ तर मुलं म्हणाली, ‘का पण आम्ही खेळतोय’... ही आठवण मनात घर करून आहे. वेगवेगळ्या संदर्भात ती आठवते. आज वाटलं जगण्यातल्या सगळ्या भांडण मारामारीकडे ‘आम्ही खेळतोय’ असं पाहता येईल.. शारीरिक दुखण्या-खुपण्यांकडेही असं बघता येईल... देहाच्या मैदानावर देहातल्या अगणित पेशींचे वेगवेगळे युद्ध चालू असते.. कित्येक लढाया आपल्या नकळतच समाप्त होतात. काहींची दखल घ्यावी लागते.. काहींकडे ‘खेळ’ म्हणून पाहता येते. दखल घेणं हाही एक खेळ म्हणता येईल.. देहाकडे दुरून पाहता आलं तरच त्यातल्या घडामोडींना खेळ म्हणता येईल... एकेका अवयवावर राज्य येतं.. बाकीचे लपून बसतात....

माझा देह... माझ्या आईचं बाळ... तिनं माझ्या हातात सोपवलं होतं... त्याला मोठं होत जाताना मी पाहात होते. त्याच्या भरवशावर मी कुठे कुठे फिरत राहिले. आता ते थकलंय आणि माझं लक्ष वेधून घेतंय तर मी त्याच्याजवळ असायला हवं.. ‘तो मी नव्हेच’ म्हणून नाळ तोडू नये..! मी देहात्मभाव सर्जक बनवीन. आमच्यातलं नातं फुलवत ठेवीन. उमेदीचं बळ देईन..

....

लॉकडाऊनच्या अस्थिर वातावरणाची सर्वांना सवय झालीय. रूटीन चेक अपसाठी अपॉइंटमेंट घेतली आणि जायचंय याचा फार विचार न करता सहज जाऊन आलो. तपासण्यादरम्यानही अगदी निवांत होते. वेटिंग करताना दिसणार्‍या हॉस्पिटलमधल्या नेहमीच्या दृश्यांकडे बघताना अस्वस्थ व्हायला झालं नाही. मी बसले होते तिथे जवळच एका माणसाला स्ट्रेचवर झोपवून आणलं होतं. तोही सोनोग्राफीच्या रांगेत होता बहुधा. दया, हतबलता, नाइलाज, काय हे.. कशाला अट्टहास.. असं काही मनात आलं नाही..!

रिपोर्ट्स नॉर्मल आले. आता एक वर्ष काही काळजी नाही..!

‘पहाट पावलं’ लेखांचं ‘विचारांचे कवडसे’ नावानं ईपुस्तक प्रकाशित झालं... आता ‘विचारार्थ’ उपक्रमातील लेखांचं स्क्रिप्ट केलंय..

कामं हातवेगळी झाली की छान वाटतंय तोपर्यंत रिकामपण येतं.. आनंदी राहायचं ठरवून चेहरा हसरा करतेय... लोकांनी छान म्हटलं की आपल्याला छान वाटतं. तसं आपणच आपल्याला छान म्हणायचं आणि खुश व्हायचं. आपल्याला  आनंद हवा तर आपणच आनंदरूप व्हायचं. बाह्य, वरवरचा, कृत्रिम कृतीरूप आनंद घेता घेता आपल्याला जन्मजात स्वयंभू आनंदमय कोषात शिरत येईल..! छान आहे ना कल्पनाविलास..?

.....

१९.७.२०२१

नवीन कविता सुचताहेत. ‘भेटे नवी राई’ संग्रहानंतरच्या या कविता ‘नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत’ शीर्षकाखाली सेव्ह करून ठेवतेय.

मी माझ्या ‘असण्या’ची भूमिका बदलली आहे. ‘एक्झिटच्या प्रतीक्षेत बसलेली’ हे तिचं जुनं नाव बदलून ‘नाट्यात रमलेली’ हे नाव दिलं आहे. नवी भूमिका निभावताना छान वाटतं आहे.... घरात थोडं रीनोव्हेशन करून घ्यायचा विचार चालू झालाय... ‘जिजीविषेत शतं समः’चं बोट धरल्यामुळे आता पंचाहत्तरी साजरी करण्याचा विचार अशक्य वाटत नाहीए... माझं कुंपण मृगजळासारखं दूर जात आपला पैस वाढवून घेतं आहे...!

४-३०.८.२०२१

‘विचारार्थ’ ईपुस्तक तयार झालं. फेसबुकवर झळकलं... मुखपृष्ठासह पूर्ण निर्मिती माझी आहे.. त्यामुळे समाधान वाटतं आहे..

‘विचारांचे कवडसे’ आणि ‘विचारार्थ’ या दोन्ही ईपुस्तकांचं मंदा खांडगे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन झालं.. आश्लेषा महाजन आणि निलीमा गुंडी छान बोलल्या.. एकूण कार्यक्रम सुटसुटीत, छान झाला.

....

४.१०.२०२१

‘ज्ञानेश्वरीतील उपमा’ आणि ‘Thoughts in a Nutshell’ या दोन ब्लॉगचं ईपुस्तक करण्याची कल्पना सुचलीय... कल्पना सुचल्यावर लगेच कामाला लागले आणि महिनाअखेर पर्यंत दोन्ही ईपुस्तकं प्रकाशितही झाली. डॉ. सदानंद मोरे सरांच्या हस्ते ऑनलाईन प्रकाशन झालं.. सर खूप छान बोलले. हुरूप वाढला...

या वर्षानं ईपुस्तक निर्मितीचं नवं दालन उघडून दिलं..! पेरलेल्यातून नवं उगवायला सुरुवात झाली..!

***

मीही आहे त्या खेळात

भोवती कशाकशाचा
हाहाकार माजलेला असताना
आयुष्याच्या तिन्हीसांजेला
मी शांत बसले आहे
खिडकीच्या चौकटीतून दिसणार्‍या
आपल्या वाटच्या
एक तुकडा आकाशाकडे पाहत...

मन प्रसन्न आहे
त्याला उमगलंय
आनंद.. संताप.. वेदना.. क्लेष.....
हे सर्व भिडू आहेत
एका विराट खेळातले
मीही आहे त्या खेळात
आता भोज्या बनून पाहते आहे

बाहेर सगळं पूर्ववत चालू आहे
अधिकच भयकारी..
खचवणारं झालंय आता

पण दुरून पाहताना वाटतंय
सृष्टीच्या आरंभापासून सुरू आहे
हे नवरसांचं संमेलन..
आणि आपला जन्म म्हणजे
जीवनाच्या या संमेलनात
सहभागी होण्यासाठी
मिळालेलं निमंत्रण आहे..!

मी आता रंगमंचावर नाही
नवनवीन खेळ पाहात
श्रोत्यात बसले आहे..
समोरच्या नाट्याला आणि
माझ्या इथं असण्याला दाद देत..!
***
(‘नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत’मधून)
आसावरी काकडे

Sunday, 24 July 2022

माझ्या डायरीतून- ७७

जगणं आपल्या हातात आहे. मृत्यू नाही..!!!

१-३१.१.२०२१

गुड मॉर्निंग ग्रुपवर ‘गीता आणि आपण’ हा गीतेतील निवडक श्लोकांचा उपक्रम झाल्यावर आता खलील जिब्रानच्या प्रॉफेट पुस्तकातील विचार अनुवादासह देण्याचा उपक्रम सुरू केलाय. अनुवाद माझा भाऊ भास्कर आपटे करतोय त्यामुळे मी त्या विषयात फार गुंतलेली नाही....

आज काहीतरी सुचायला हवं... नव्या वर्षाचं उद्‍घाटन करणारं...

ऑनलाईन कार्यक्रमांचा सिलसिला याही वर्षी चालू राहिला.. ‘विद्याताई, त्यांच्या पुस्तकातून’ या विषयावरच्या कार्यक्रमात मी त्यांच्या ‘साकव’ या पुस्तकावर बोलले..

शिकागो मराठी मंडळात ‘कविता आणि गप्पा’ असा कार्यक्रम झाला. माझ्या बरोबर संदीप अवचट होता. आमचं ट्यूनिंग छान जमलं.. कवितावाचनानंतरची प्रश्नोत्तरं छान झाली.. समाधान वाटलं.

......

१०.२.२०२१

एका कामाच्या निमित्तानं तीन अनुवादित पुस्तकं वाचली.. ‘काहीच नष्ट होत नाही’ मूळ हिंदी प्रियदर्शन. अनुवाद विजय चोरमारे, ‘वन पार्ट वुमन’ मूळ तमिळ- पेरुमल मुरुगन. अनुवाद प्रणव सखदेव आणि ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ मूळ तमिळ- सलमा. अनुवाद सोनाली नवांगुळ.

खूप वेगळं जीवनदर्शन घडलं एकेका पुस्तकातून...

३.३.२०२१

लसीकरण सुरू झाले आहे. एकेकजण लस घेऊन आल्यावर फोटो टाकतायत. अभिनंदन चाललंय.. इव्हेंट साजरा केल्यासारखं चाललंय... आम्हीही त्यात सामिल झालो.. मजाच वाटते आहे. पूर्ण जगाला वेठीस धरून मानसिकता बदलायचं हे सामर्थ्य अजब आहे.  

३-३०.४.२०२१

कोरोनाची दुसरी लाट आलीय. पुन्हा भीती.. अस्थिरता, लॉकडाऊन, ‘Ambulance’च्या सायरनचे आवाज...!

या वातावरणाचा एक परिणाम म्हणून काही होत असलं तरी लगेच डॉक्टरकडे जाणं थोपवावं लागतंय. एकप्रकारे परिस्थितीच निर्णय घेते आहे.

२१ तारखेला दुसरा डोस घेतला. त्रास झाला नाही. फायनल सर्टिफिकेट मिळाले. त्याला पासपोर्टचं महत्त्व आलंय...!

दुसरी लाट हातपाय पसरते आहे.. रोज धक्कादायक बातम्या कानावर येतायत.. वेगवेगळ्या कारणांनी अगदी जवळच्या नात्यातली, शेजारची माणसं गेल्याचं वृत्त कानावर येतंय.. एकावर एक अशा बातम्या आणि कोरोनाचा कहर त्यामुळे अस्वस्थता ठाण मांडून बसलीय...

.....

भैरवी पुरंदरेनं फेसबुकवर अनुभव लिहिलाय... आपला आपण श्वास घेता येण्यातला आनंद जबरदस्त आहे... काही दुखत असेल तर आपण सहनशक्ती वाढवू शकतो. पण श्वास घेता येत नसेल तर काय?.... तो घेता येण्यासाठी तिला सापडलेला उपाय म्हणजे आपण सगळ्यात आनंद घेणे.. दुसर्‍याला देणे.. मन आनंदी असेल तर प्राणवायूचं स्वागत होतं..! अनुभवातून आलेला तिचा हा विचार मननीय वाटला...

......

१-२०.५.२०२१

रोजचा सूर्योदय नव्याने आनंद देतो... उमलणारी तीच फुलं नव्याने लक्ष वेधतात... तशा शारीर वेदनाही रोज नवे रूप घेऊन येतात. या नवनवोन्मेषशाली वेदनांचा आनंद घेता आला तर..? किंवा वेदनेला जी प्रतिक्रिया दिली जाते तिलाच आनंद म्हटलं तर..?

ईशावास्य उपनिषद रोज म्हणता म्हणता ‘ओम पूर्णमदः...’ हा शांतिमंत्र, ‘ईशावास्यमिदं सर्वम्..’ हा पहिला मंत्र आणि ‘कुर्वन्नेवेह कर्माणी..’ हा दुसरा मंत्र यांच्या आशयाची अंतर्गत संगती काय आहे ते उमगलं... ‘ते’ पूर्ण आहे... तिथून वैश्विक आयोजन होते आहे. जे पूर्ण आहे तेच ‘इदं सर्वम्‍’ मधे वसतीला असते. आणि त्याच्या सहकार्याने ते आयोजन होते आहे.... या सर्वातला ‘मी’ एक किंचित कण...

वैश्विक आयोजनात मी स्वतःला समर्पित करते आहे. हे अर्घ्यदान... तुझे तुला.... हा वैश्विक आशय जाणवून, त्याला स्पर्श करून, ग्रेटर सेल्फशी हस्तांदोलन करून खाली, रोजच्या ‘मी’मधे उतरायचं आणि दिनचर्या पार पाडायची.. पहिल्या मंत्रातील ‘तेन त्यक्तेन’ म्हणजे कर्म करण्यासाठी खाली उतरणे..! Think Globaly act localy..!

‘कुर्वन्नेवेह कर्माणी... श्वास घेण्यापासूनची प्रत्येक लहान-मोठी, महत्त्वाची-बिन महत्त्वाची कृती-(कर्म) करत राहून शंभर वर्षे जगण्याची इच्छा धरावी. हेच आपल्या हातात आहे. दुसरं काही नाही. या कर्मांतून सुटकेसाठी मृत्यूची इच्छा धरणं चूक आहे... कारण जगणं आपल्या हातात आहे. मृत्यू नाही..!!!

आपण आपल्या देहाचे विश्वस्त असतो. हे ‘क्षेत्र’ रक्षणासाठी आपल्याला दिलेले आहे....

***

आसावरी काकडे

Saturday, 23 July 2022

माझ्या डायरीतून- ७६

आता परतीचा मार्ग नाही...

१-१५.४.२०२०

सकाळी उठल्यापासून ‘बाहेर पडू नका.. काळजी घ्या.. हात धुवा.. अंतर ठेवा..’ अशा सूचना दिल्या जातायत लाउडस्पिकरवर.. फोन लावला कुणाला तर रिंग व्हायच्या आधी या सूचना ऐकू येतायत... या घाबरवणार्‍या पार्श्वसंगीतावर दिनचर्या चालू आहे.... रामायण महाभारत मालिका चालू केल्या आहेत टीव्हीवर. सकाळ संध्याकाळ एकेक भाग दाखवतायत. वेळ छान जातोय..

व्हॉट्सॅपवरच्या गुड मॉर्निंग उपक्रमात आता चांगदेवपासष्टी हा विषय घ्यायचा ठरवलंय.. चांगले स्वागत झाले आहे.

पाच तारखेला रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे इलेक्ट्रिक दिवे बंद करून साधे दिवे लावायचेत प्रार्थनेचा एक भाग म्हणून.. पंतप्रधानांचं आवाहन आहे....

संपूर्ण लॉकडाऊन अनुभवत आहोत. घरात सर्व वस्तूंची रेलचेल असायची. आता एकेका वस्तूसाठी अवलंबून राहावं लागतंय.. वस्तू मिळतही नाहीएत... १४ तारखेला पहिले २१ दिवसांचे लॉकडाऊन संपले. तीन मे पर्यंत परत वाढवलेय. काही भाग सील केले आहेत. बातम्यांमधे सतत कोरोना बाधितांची, मृतांची संख्या किती वाढतेय ते सांगतायत...!

हे वातावरण हळूहळू अंगवळणी पडायला लागलंय.... ही लाट किती वर उसळून खाली येणार आहे कोणजाणे...

ओळखीचे लोक एकमेकांना फोन करतायत. ‘काळजी घ्या’ हे जगण्याच्या गाण्याचं ध्रुवपद झालंय. जवळची सगळी ओके आहेत. बाळं जन्माला येतायत. आई-वडील सुखावतायत. सूर्य उगवतोय.. मावळतोय. फुलं फुलतायत खुशाल.. आकाश रंगाकार बदलत सुखरूप आहे वर.... पक्षी किलबिल करतायत. मुलं खेळतायत... वॉचमन गस्त घालतोय रात्री... कुत्री भुंकतायत.. आपापल्या घरात सर्वांचे चहा- नाश्ते- जेवणं- झोपणं.. सर्व चालू आहे....

घरातून बाहेर न पडता स्वतःची काळजी घेणं हे समाजकार्य आहे सध्या. या भयंकर साथीला पुरून उरायचं आहे. कुणीही यावं उचलून न्यावं हे नाही चालणार...!

पण ज्यांना घरंच नाहीत, जे काम नसल्यामुळे बेकार झालेत त्यांचे हाल चालले आहेत. सरकार, समाजकार्य करणार्‍या संस्था त्यांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, पोलीस यांची कामं वाढलीयत....

कसं असेल जग या साथीच्या भयंकर त्सुनामीतून बाहेर पडलेलं? ‘माझ्यासारखं जैसे थे’? की अमूलाग्र परिवर्तन होईल?.. थोडं तरी बदलेलंच जग... बदलावं..!

.....

१८.५.२०२०

लॉडाऊन अजून चालू आहे. विषाणूंविषयीच्या अतिरिक्त माहितीमुळे समजुतीचा गोंधळही अजून चालू आहे. व्यक्तीशः मला, शेजार्‍या-पाजार्‍यांना, नातेवाईकांना विशेष त्रास नाही. पण बातम्यांमुळे बाहेर वातावरण तंग आहे ते कळतेय. आता परिस्थितीशी जुळवून घेत जगणं भाग आहे. अमुक दिवसात हे संपेल आणि सर्व सुरळीत होईल याची शाश्वती नाही. हे नाही तर ते सोबत असणारच आहे. नव्या बदलत गेलेल्या राहाणीचे, ‘विकासाचे’ साइड इफेक्ट्स सोसावे लागणार.. तंत्रज्ञान, जागतिकीकरण, विकास.. हे एक आकर्षक पॅकेज आहे, ‘अटी लागू’ असलेले. अटी न पाहता मान्य केलेले, करावे लागलेले. अशिक्षित माणसाने न वाचता कागदावर अंगठा उठवावा तसं वागतो आहोत आपण... पण आता परतीचा मार्ग नाही. कुणीतरी आपल्या सर्वांसाठी हे पॅकेज स्वीकारून टाकले आहे.... त्याच्या फायद्यांचा लाभ घेत आनंदात जगताना ‘घेतलेल्या कर्जा’चे मजबूत हप्ते फेडावे लागणं अपरिहार्य आहे.

.....

१०, १२.६.२०२०

मास्क, सॅनिटायझर, अंतर ठेऊन बसणे.. अशी सर्व सावधगिरी बाळगत आज जोशी हॉस्पिटलला रुटीन चेक अप टेस्ट झाल्या...  डॉ भट यांना रिपोर्ट दाखवून आलो. सर्व ओके आहे. पण तिथलं वातावरण अस्वस्थ करणारं होतं. डॉक्टर, असिस्टंट्स, रिसेप्शनिस्ट... सर्व पूर्ण ‘युनिफॉर्म’मधे.. गाऊन, मास्क, डोक्याला कव्हर, हँड ग्लोव्हज, चेहर्‍यावर शिल्ड.... गोंधळलेली अस्वस्थता सगळीकडे भरून राहिलेली वाटली. आलेल्या प्रत्येकाचं टेंपरेचर बघून बसायला देत होते. दारात सॅनिटझरची बाटली.. अशी सर्व यंत्रणा ठेवून काम चालले होते.. असं वातावरण.. तरी पेशंटसची गर्दी नेहमीसारखीच...!!

आता बाहेर सर्व पूर्ववत चालू झालंय. पण कार्यक्रमांना अजून परवानगी नाही. त्यामुळे ऑनलाईन कार्यक्रम चालू झाले आहेत... मला बाहेर गावी कार्यक्रमांना जाता येत नव्हतं.. ऑनलाईन सुविधेमुळे तेही शक्य झालं. त्यामुळे उसंत मिळू नये इतके कार्यक्रम सुरू झाले.. ‘भेटे नवी राई’ कवितासंग्रहाचंही ऑनलाईन प्रकाशन झालं. कवीसंमेलन, मुलाखत, भाषण, मार्गदर्शन, ‘लेखक आपल्या भेटीला’ अंतर्गत विविध शाळांमधे विद्यार्थ्यांशी संवाद.. असे बरेच कार्यक्रम होत राहिले. दीपक चोप्रा यांनी तयार केलेला २१ दिवसांचा ऑनलाईन मेडीटेशन कोर्सही केला...!

.....

२७.११, ३१.१२.२०२०

कोरोना साथ आटोक्यात आली म्हणता म्हणता आता दुसरी लाट आलीय म्हणे परदेशात. इकडे येऊ नये म्हणून ‘काळजी घ्या’ असं सांगायला सुरुवात झालीय..

कोरोना संकटानं पूर्ण जग हदरवलं. स्वतःला सांभाळणं हे आव्हान प्रत्येकासमोर होतं. बघता बघता एकेक लॉकडाऊन पार करत नववर्षात पदार्पणाच्या दाराशी पोचलं आहे जग. या सर्व काळात दिनचर्येच्या पार्श्वभूमीवर भोवतीच्या अस्वस्थतेचे सावट राहिले..!

***

आसावरी काकडे

Friday, 22 July 2022

माझ्या डायरीतून- ७५

प्रत्येकाचा स्वतःचा तुरुंग...

३-२९.१.२०२०

या वर्षी माझ्या ‘गुड मॉर्निंग’ या व्हॉट्सॅप ग्रुपवरील उपक्रमात छायाचित्र कविता देण्याऐवजी वेगळं काही करावं असं मनात आलं. आधी हा विचार सांगून काही अभंगांचं दोहा फॉर्ममधे मी केलेलं रूपांतर कालपासून शेअर करायला सुरुवात केली... थोडे दिवस ते झाल्यावर ‘तुकोबा ते विठोबा’ असा विषय घेतला..

....

२, ११, २८.२.२०२०

तीस जानेवारीला विद्याताई बाळ गेल्या. जसं ठरवलं होतं तसं सामोरं गेल्या मृत्यूला... अंत्यदर्शनाला कधी जात नाही कुणाच्या. पण या वेळेस गेले होते. रडू आलं. खूप आठवणी आहेत... माझ्या कोणत्याही मनोगताची सांगता त्यांच्या उल्लेखाशिवाय होत नाही...

‘मिळून सार्‍याजणी’साठी त्यांच्यावर लेख लिहायला सांगितला होता. लिहून पाठवलाय.

‘भेटे नवी राई’ कवितासंग्रह तयार होऊन हातात आला. निर्मिती छानच झाली आहे... प्रकाशन समारंभ करायचा आहे महिनाअखेर असं नीतीन मोरे यांनी सांगितलंय...

.....

११.३.२०२०

जगावर कोरोना व्हायरसचं संकट आलंय. बातम्यांचा पाऊस पडतोय सगळीकडून. नाही म्हटलं तरी भीती वाटतेच आहे. जी लक्षणं सांगतायत ती तर आपल्यात दिसतायतच असं वाटत राहिलं... एक बरं की नुकतंच डॉक्टरकडे जाऊन आल्यामुळे खुलासा झाला जरा...

मिळून सार्‍याजणी अंकात विद्याताईंचं शेवटचं मनोगत छापलंय. ते काहीसं हतबल निराशेतून, त्राग्यातून आलेलं वाटलं. त्यांच्या बोलण्यातले त्रोटक उद्‍गार- सुपारी देऊन काम करून घेणे.. सर्प मित्रांना बोलावणे... इ. संभ्रमात टाकणारे आहेत. त्यातून सूचित होतंय ते अतर्क्य आहे. त्यांच्याही विचारात बसणारं नाही... लिव्हिंग विलचा काही उपयोग नाही, इ ओ एल (एंड ऑफ लाईफ) फॉर्मचा काही उपयोग नाही.... मग मृत्यूची वाट पाहावी लागणारांसाठी असे मार्ग उरावेत... हा अनुभव निराश करणारा आहे...

थोडक्यात, जीव आहे तोपर्यंत आपण त्याच्या बाजूनं उभं राहायला हवं. तपासण्या, उपचार बंद करण्याचा तर काहीच उपयोग नाही. ते बंद करून लगेच मृत्यू येईल असं थोडंच आहे?

.....

२३.३.२०२०

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हळूहळू एकेक बंदी आणत आता आज कर्फ्यूच लागू केला आहे. युद्धकाळात अशी वेळ येते.... रोज या विषयाचं गांभिर्य वाढत चाललं आहे. जगभरात ही बंदी आहे. वरून कोणी पाहात असेल तर ही ‘शांतता’ कशी वाटेल? हे कधी आटोक्यात येणार?

सगळ्या जगाला कुणीतरी वेठीस धरलं आहे. युरोपमधली स्थिती दाखवणारे व्हिडीओज, मेसेजेस येत आहेत. ते भयंकर आहेत. तशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून इथले सरकार सगळीकडून बंदी आणत आहे...

मला घरात राहण्याची सवय आहे. बाहेर जाण्याचा कंटाळाच आहे. तरी आता खाली सुद्धा जाता येत नाहीए.. हे अवघड वाटते आहे....

हे काहीतरी फॅड आहे, उगीच काहीतरी पसरवतायत असं वाटता वाटता त्याचं गांभिर्य स्वीकारणं भाग पडतं आहे... प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासोबत घरात बंद आहेत. प्रत्येकाचा स्वतःचा तुरुंग. आत सगळे स्वातंत्र्य. काही शिक्षा नाही.....

.....

२५,२९.३.२०२०

काल पंतप्रधानांनी जगातली परिस्थिती लक्षात घेऊन चौदा एप्रिलपर्यंत पूर्ण भारत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कुणीही घराबाहेर पडायचे नाहीए. परदेशातल्या बातम्या तर घाबरवतायत.. वैश्विक महामारीचं हे संकट कोणत्याही जागतिक युद्धापेक्षा भयंकर आणि तोंड द्यायला अवघड आहे. या शत्रुशी लढण्याचे प्रयत्न तज्ञ लोक आपापल्या परीनं करत आहेत. सामान्य लोकांनी घरात राहून स्वतःचं स्वास्थ्य सांभाळून त्यांना मदत करायची आहे.

सगळा वेळ रिकामा आहे... पण या विषयीच्या बातम्यांनी मन ग्रस्त आहे. लेखन वाचन काही सुचत नाहीए...  

पूर्ण लॉकडाऊन आहे. वेगवेगळ्या कारणांनी कुठे कुठे अडकलेली माणसं गर्दी करून सैरभैर होऊन धावत आहेत. त्यांची सोय कशी करावी हे कुणाला सुधरत नाहीए... विषाणूचं स्वरूप पाहता हे चित्र हताश करणारं आहे.

गरजेच्या गोष्टी दूध.. खाद्यपदार्थ उपलब्ध आहे. गरजूंना पाकिटं पुरवली जात आहेत.... बाहेरून आणलेल्या वस्तू घरात घेताना कोणती, किती काळजी घेणार..? कशाला हात लागला तर ते लगेच धुवायचे... आपल्याच हातांवर सतत अविश्वास... समस्या आणि उपाय-योजना यांची सांगड कितपत घातली जातेय कोणजाणे... प्रत्येक दिवस अधिक गंभीर रूप घेऊन उगवतोय.. जगानं अशी परिस्थिती पूर्वी कधी अनुभवली नसेल...

***

आसावरी काकडे

Thursday, 21 July 2022

माझ्या डायरीतून- ७४

अंतर्मुख विचार ही पण एक साधनाच?

१४, २१.७, १७, २५.८.२०१९

‘आनंदघन’ दिवाळीअंकासाठी ‘भगवद्‍गीता आणि मी’ या विषयावर लेख लिहिण्याच्या निमित्तानं गीता मुळातून वाचावी अशी प्रेरणा झाली. गीताई, ज्ञानेश्वरी अशा वाचनामुळे गीतेचा विषय माहिती होता. पण संस्कृत भाषा समजत नाही म्हणून मूळ संस्कृत गीता वाचलीच नव्हती. आमच्या शेजारी राहणारी श्रीकांत सरीता गीता धर्म मंडळात गीता म्हणायला शिकलीय. तिच्याकडून शिकून रोज दहा श्लोक म्हणायला लागले.

तस्मात गीता – रमेश सप्रे हे पुस्तक मिळालंय. त्यात २२ श्लोक आहेत. ते पाठ करून म्हणायचं ठरवलं. पण अर्थ समजून घेतल्यावर ते संकलन महत्त्वाचं वाटलं नाही. त्यापेक्षा गीता वाचताना मला जे महत्त्वाचे वाटतील ते ओळीनी लिहून घेऊन पाठ करावेत असं वाटलं.

सर्दीचे जंतू आणि माझ्यातल्या पांढर्‍या पेशी यांचे युद्ध चालू आहे. आवाज फुटत नाही म्हणजे काय ते अनुभवतेय. एक दोन दिवसात आवाज ठीक झाल्यावर गीता पठण चालू झालं... स्पष्ट शब्दोच्चार येण्यावर भर दिला जातोय. अर्थ आधी समजून घेतला तरी म्हणताना समजून म्हटलं जात नाहीए...

‘विचारार्थ’ उपक्रम छान चाललाय.  

उत्साह टिकला. गीता पठण पूर्ण झाले. पण त्याच्या जोडीनं आशयात रमता आलं नाही. आधिक आकलन, निष्ठा, भक्ती असं काही झालं नाही....

.....

२५.९.२०१९

मधे एकदा सांगलीहून श्री जगदाळे यांचा फोन होता. सांगलीत पूर परिस्थिती असताना बारा दिवस घरात अडकले होते. तेव्हा ‘ईशावास्य..’ हे माझं पुस्तक वाचत होते. पुस्तक आवडल्याचे सांगत होते. परवा फोन करून भेटायला आले... आता वाचन बास. अंतरंग साधना करायला हवी असं त्यांना वाटत होतं. त्या संदर्भात बोलायला आले होते. पण मी काही साधना करत नाही असं सांगितलं... मग त्यावर फारसा संवाद झाला नाही. नंतर वाटलं की अंतर्मुख विचार ही पण एक साधनाच असेल तर ती मी करते आहे..!

काल आनंद नाडकर्णी यांचा फोन होता. तेही ‘ईशावास्य..’ वाचतायत. ते ठाण्यात वेदान्त आणि व्यक्तिमत्वविकास यावर तीन दिवस शिबीर घेणार आहेत. त्याच्या तयारीत त्यांना माझ्या पुस्तकाचा उपयोग झाला असं सांगत होते. समाधान वाटलं..

.....

२७.१०, १६.१२.२०१९

‘भेटे नवी राई’ कवितासंग्रहाचं स्क्रिप्ट नीतीन मोरे यांच्या सुखायन प्रकाशनाकडे दिले आहे. आदरानं काढताहेत.

म्हातारपण हे दुसरं बालपण असं म्हणतात. पण ते शारीरिक  पातळीवरच राहातं. मनही तसं मूल व्हायला हवं.... काही दुखत असेल तर त्या दुखण्याच्या आकाराइतकंच नाही दुखत मन. त्याच्या मागे पुढे धावते आणि दुखणे विस्तारून टाकते... पाय, गुढगा, कंबर दुखणं चालू आहे. त्याला सामोरं जायचा कमी त्रासाचा मार्ग शोधतेय..

आरतीच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला गेले होते. मी ब्लर्ब लिहिले म्हणून सत्कार केला. नको वाटत होतं पण गेले. स्टेजवर चढताना उतरताना आधार घ्यावा लागला... पूर्वी असं कुणी कार्यक्रमात दिसलं की ‘या वयात, त्रास होत असताना कशाला यायचं?’ असा विचार मनात यायचा.. मी आता तेच करते आहे...! याला काय म्हणावं?... आपल्यावर वेळ आली की समजते त्या वेळची मानसिकता..!

‘भेटे नवी राई’ तयार होत आलं. चांगलं होईल असं वाटतं... ‘विचारार्थ’ उपक्रम वर्षभर राबवला याचं समाधान आहे....

बघता बघता वर्ष संपत आलं... वय वाढलं. अनुभवलेल्या पावसाळ्यांच्या संख्येत भर पडली..!

***

आसावरी काकडे

Wednesday, 20 July 2022

माझ्या डायरीतून- ७३

‘ऑल इज वेल’चा सिग्नल मिळाला

१-८.१.२०१९

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!

काल शेजारची मैत्रिण रेखाकडे ३१ डिसेंबर साजरा केला.. फुगे लावून घर सजवलेलं.. खाणं..पिणं.. गप्पा.. गाणी.. फोटो काढणं.. ते लगेच शेअर करणं.. सगळं हौसेनं केलं तिनं... मजा घेतली आम्हीही.. आनंद वाटून घ्यायचा.. साजरा करायचा.. सगळ्यांना दाखवायचा.. स्वतःला, इतरांना बूस्ट करण्याचा हा एक उपाय...

....

पेट स्कॅन टेस्ट झाली.. एकूण तपासणी सत्रातला हा बहुधा शेवटचा टप्पा. रिपोर्ट डॉक्टरना दाखवून आलो. सर्व ओके आहे. बघता बघता सर्व तपासण्या झाल्या. ‘ऑल इज वेल’चा सिग्नल मिळाला आणि नव्या वर्षाची गाडी सुटली..!

.....

एक तारखेपासून गाण्याचा क्लास लावला आहे. श्वसनाचा व्यायाम म्हणून रोज एक गाणं म्हणायाला सुरुवात केली होती. म्हणतेच आहे तर जरा बरं म्हणता यावं म्हणून कॉलनीतल्याच मैत्रिणीचा क्लास लावलाय..

पाच तारखेपासून साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या व्हॉट्सॅप ग्रुपवर ‘विचारार्थ’ हा उपक्रम सुरू करते आहे.

.....

९.३.२०१९

कॅन्सर सरव्हायव्हर म्हणून घेतलेली सोनाली बेंद्रेची मुलाखत ऐकली. असंख्यांच्या अनुभवाला सेलीब्रेटी लोक कसे सामोरे जातात या बद्दल सामान्यांना उत्सुकता असते. तिनं छानच निभावलं सगळं... या काळात झालेल्या आंतरिक संघर्षात स्वतःला सावरताना तिनं लॉजिकल थिंकिंगचा आधार घेतला. ‘हे मला का झालं?’ याचा पाठपुरावा करताना नशिबासारख्या गोष्टींचा आधार न घेता विवेकाचा आधार घेतला हे विशेष वाटलं. बर्‍याचदा कळतं पण वळत नाही असं होतं. अशा वेळी लोक अध्यात्मिक साधनेचा आधार घेतात... ती म्हणाली, मला आध्यात्म कळत नाही. पण मला आलेल्या अनुभवातून मी म्हणू शकते की माणुसकीवरचं प्रेम हेच अध्यात्माचं सार आहे...

या निमित्तानं पुन्हा स्वतः बद्दल विचार झाला.. मी याला कशी सामोरी गेले त्याचा आढावा घेतला गेला.. ‘बाय बाय’ करण्याचं निमित्त म्हणून एका कोपर्‍यात या आपत्तीचं स्वागतच झालं होतं. आजार थर्ड डीग्री थर्ड स्टेजचा आहे हे समजल्यावर ‘आता सहा महिने राहिले’ याचा डॉक्टरांनी सांगण्यापूर्वीच स्वीकार झाला. पण तसं काहीच झालं नाही. नाही..होय करत सर्व उपचार करून घेतले. त्या अग्निदिव्यातून उजळून निघताना वाटलं आपल्या हातून काही घडायचं असेल म्हणून हा अनुभव वट्याला आला... रोगजंतूंबरोबर केसबीस.. सगळं अवांछित नाहीसं झालं... रिनोव्हेशन केलेल्या घरासारखं झालं शरीर... पण गेलेले केस हळूहळू परत आले तसे बाकीचे सगळे अवांछितही हळूहळू हजर झाले. मी ‘नॉर्मल’ झाले आणि मागील पानावरून पुढे दिनचर्या सुरू झाली. भव्य..दिव्य, वेगळं काही घडलं नाही. छोटी छोटी कामं हातून होत राहिली अगदीच काही नाही असं नाही.. पण एवढ्यासाठीच का झाला ‘पुनर्जन्म’? असं वाटून मन खट्टू झालं... हळूहळू या अपेक्षाभंगाची धग निवली. असं बरं होऊन बाहेर पडलेल्या असंख्यांपैकीच मी एक..! फार अपेक्षा कराव्या असं काही घडलंच नाही हे मान्य करून, सामान्यपण स्वीकारून जमेल ते करत छोट्या परिघात आनंद देत-घेत राहाण्यात आता समाधान मानते आहे.,,!

.....

२४.४, २.५.२०१९

‘लेखकाची गोष्ट’ हे विश्राम गुप्ते यांचं पुस्तक वाचतेय. त्यातील ‘वाचन-लेखनातून मी कसा घडत गेलो’ याचा आलेख म्हणजे भ्रमनिरासांचा प्रवास वाटतोय.. साहित्य वर्तुळातल्या सगळ्या ग्रेट वाटणार्‍या गोष्टींमधला पोकळपणा उघडा केला आहे. इतकं आतलं, इतकं खरं लिहिण्यासाठी वाचन मनन यांचा आवाका दांडगा असायला हवा... पाश्चात्य साहित्याच्या तुलनेत मराठी लेखक, वाचक, समीक्षक कसे किरकोळ आहेत ते येताजाता सारखं दाखवून दिलेलं आहे. हे सर्व वाचताना जाम कॉम्लेक्स आला.. या पुस्तकानं अस्वस्थ.. अंतर्मुख केलं..

या पार्श्वभूमीवर एका कवीसंमेलनाला गेले होते. अनिच्छेनच. कार्यक्रम खूपच उशीरा सुरू झाला. तोपर्यंत सहनशक्ती संपलेली. काहीच छान वाटत नव्हतं. ‘लेखकाच्या गोष्टी’नं वारंवार मराठी साहित्याचं क्षुद्रपण परोपरीनं दाखवून दिलेलं... अख्ख मराठी विश्वच इतकं लहान परीघ असलेलं.. तर त्यात हे असे समारंभ साजरे करणे म्हणजे जगण्याला दयनीय उत आणणंच आहे.. असं वाटत राहिलं...

‘लेखकाची गोष्ट’ मधे सगळ्याचा इतका किस काढलाय की वाटलं सर्व धडपडीचा  ‘भमनिरास’ हाच सारांश निघतो... आजाराच्या अनुभवानं सगळ्यातलं वैयर्थ दाखवून दिलंय.. आता कशाचा जाच करून घ्यायचा नाही. आला क्षण आपला. तेव्हा जे वाटेल, जमेल ते करायचं..!

.....

५.७.२०१९

रुटीन चालू आहे. व्यायामामधे गाणं सामिल झालं आहे. आज एक हिंदी गाणं म्हटलं. ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाएँ हम दोनो..’ गाणं म्हणताना एकदम मनात आलं की यातलं हम दोनो म्हणजे शरीर आणि चैतन्यतत्त्व..! हे आधी वेगळे, अपरिचित, अजनबीच असतात. जन्म-पक्रियेत ते एकत्र येतात. शरीर थकलं की त्याला म्हणावसं वाटू लागतं- ‘चलो एक बार फिरसे अजनबी बन जाएँ हम दोनो..’

***

आसावरी काकडे

Tuesday, 19 July 2022

माझ्या डायरीतून- ७२

जिवंत राहिल्याचं सार्थक झालं..

१४,१५.८.२०१८

आज ‘ओम पूर्णमदः पूर्णमिदं..’ हा मंत्र म्हणताना जाणवलं की मृत्यू म्हणजे या जगण्याच्या त्रासातून सुटका नाही. सगळं पूर्ण, एकाकार असेल तर जगणं – मरणं, असणं – नसणं.. म्हणजे ताटात काय आणि वाटीत काय..! कुठल्या ना कुठल्या आकारात असावंच लागणार.. असण्यातून सुटका नाही... Man is condemned to be free’ च्या चालीवर माणसाला ‘असावं’च लागतं.. असं म्हणता येईल.. एक मुक्तक लिहिलं-

‘कळी असा वा गळुन पडा असण्यातुन सुटका नाही

इथे रमा वा निघून जा असण्यातुन सुटका नाही

पूर्णच असते आहे ते अन पूर्णच बाकी उरते

नसण्याला नाही जागा असण्यातुन सुटका नाही..!’


असं जाणवून काल एकदम मोकळं वाटायला लागलं..!

.....

३.९.२०१८

काल एकांचा फोन होता... ‘शिक्षण संक्रमण’ अंकातील इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात असलेल्या ‘खोद आणखी थोडेसे’ या माझ्या कवितेवर लिहिलेला लेख वाचून त्यांना नैराश्याच्या काळात धीर आला असं सांगत होते. ते जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरीला आहेत. त्यांची नोकरी धोक्यात आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही यश मिळत नाही म्हणून जीव देण्याच्या टोकाचे निराश झाले होते. कविता वाचून त्यांना या परिस्थितीत उभं राहायचं बळ मिळालं असं म्हणाले.... ऐकून बरं वाटलं.

एवढा व्याप करून जिवंत राहिल्याचं सार्थक झालं असं मनात येऊन गेलं..!

‘पहाट पावलं’ मधल्या लेखांनाही छान प्रतिसाद मिळतो आहे..

.....

७.११.२०१८

परवा रेखाशी बर्‍याच गप्पा झाल्या. बरेच दिवस मनात येतं आहे की मी सतत ‘स्वीकारा’च्या टोकावरच उभी असते सारी आवराआवर करून.. ‘परततच होते मी..’ असा भाव असतो. माझ्या या मानसिकतेची समीक्षा कशी करता येईल? जे स्वीकारतेय ते निमूट, तक्रार न करता हे ठीक. पण बदलण्याचा प्रयत्न न करता हा स्वीकार आहे का? तसं नाही खरं तर.. कारण लेखनाच्या बाबतीत मी कृतीशील आहे. मागे लागत नाही, हाव धरत नाही पण समोर येतंय ते नाकारतही नाहीए. तब्येतीच्या बाबतीत वेळोवेळी तपासण्या, वेळेवर औषधं, पथ्य इ. सर्व प्रामाणिकपणे करतेच आहे. या सर्व प्रयत्नांचं चित्र मी स्वीकाराच्या कॅनव्हासवर रेखते आहे.... मी संघर्ष करत नाही याचा अर्थ मी अट्टहास करत नाही. माझा ‘स्वीकार’ म्हणजे लढण्याआधीच शस्त्र टाकणं नाही तर अपेक्षांवर तुळशीपत्र ठेवणं..! त्यामुळं जे मिळतं ते सगळंच जमेत दाखल होतं आणि म्हणता येतं की मृगजळासारखं माझं कुंपण आणखी थोडं दूर गेलंय...

.....

१०.१२.२०१८

साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या स्त्री साहित्य संमेलनात पाच संक्षिप्त कादंबर्‍यांचं प्रकाशन झालं. त्यात ‘आनंदी गोपाळ’ कादंबरीही होती. पुस्तकाची एक प्रत, मानधन देऊन सत्कार झाला सगळ्यांबरोबर. पुस्तक हातात आल्याचा आनंद झाला मनापासून. स्क्रिप्ट एकदा दिल्यावर परत काहीच करावं लागलं नाही. वाटही पाहावी लागली नाही....

.....

२०.१२.२०१८

बोनडेन्सिटी टेस्ट झाली. डॉ. गोडबोलेंना रिपोर्ट दाखवून आलो. वयानुसार बोनडेन्सिटी कमीच होत जाते. ती स्थिर राहिली हे महत्त्वाचं असं म्हणाले. परत टेस्ट सांगितली नाही... हेच अपेक्षित होतं.

छांदोग्य उपनिषद वाचतेय... भाग्यलता पाटसकर मॅडमचा फोन होता. हे उपनिषद शिकवताना त्यांनी माझ्या ‘मॅरेथॉन’ या ‘पहाट पावलं’मधल्या लेखाचा संदर्भ दिला असं सांगत होत्या. एखादी कल्पना मनाचा ठाव घेऊन सर्वत्र जाणवणे म्हणजे काय ते कळावे म्हणून... छांदोग्य उपनिषदात त्या ऋषींना सगळीकडे ‘साम’ जाणवू लागला म्हणजे काय हे त्या समजावत होत्या.. हे ऐकून साम म्हणजे काय याची उत्सुकता वाटली. त्यातून हे वाचन सुरू झाले. सायनेकर सरांशी या संदर्भात बोलणं झालं. ते छान समजावून सांगतात. ते म्हणाले, साम म्हणजे एका वाक्यात ‘ईशावस्य’मधे जे ईश तेच ‘छांदोग्या’त साम..! ऐकताना असं वाटलं की वेद-उपनिषदं म्हणजे ऋषींचा आकलन-प्रवासच आहे....

.....

सध्या मूड छान आहे. ‘आवराआवरी’चा मूड ‘रहाटाला पुन्हा गती दिली’ असा बदलतोय...

***

आसावरी काकडे

Monday, 18 July 2022

माझ्या डायरीतून- ७१

खुराड्यातून बाहेर पडल्यासारखं वाटलं...

१.१.२०१८

आजपासून ‘पहाट पावलं’ हे ‘सकाळ’मधलं सदर सुरू झालं.

‘अथांग’ कादंबरीचे काम प्रकाशनाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आणि ‘आनंदी गोपाळ’ कादंबरीचे काम हातावेगळे होऊन प्रकाशनाच्या पहिल्या टप्प्यावर गेलेय.

सध्या लेखन जोरात आहे.. छोटं..मोठं बरंच काही चालू आहे. ‘भेटे नवी राई’ कवितासंग्रह करावा असं मनात यायला लागलंय...

.....

२७.२, १९.४.२०१८

‘पहाट पावलं’ लेखांना चांगला प्रतिसाद मिळतोय..

‘संवादु अनुवादु’ हे उमा कुलकर्णी यांचं आत्मचरित्र वाचतेय... ग्रीप आलीय. किती सहज साधेपणानं लिहिलंय.. केवढा समृद्ध अनुभव.. समोर येईल तसा स्वीकारलाय.. छान वाटतंय वाचताना.. आपणही लिहावं असं मनात तरळून गेलं. वैचारिक प्रवास असं सूत्र घ्यावं.. ‘लाहो’ असं शीर्षकही सुचलं..! मजा....

सध्या डॉक्टरखेरीज इतरत्र जाणं पूर्वीसारखं चालू झालंय. अचानक ठरून कोल्हापूर.. पन्हाळा... पारगाव प्रवासही झाला...

.....

१, १२.५.२०१८

महाराष्ट्र दिनानिमित्त मेजर जनरल शशीकांत पित्रे यांचं भाषण कॉलनीच्या हॉलमधे झालं... भारत-चीन सीमा प्रश्न असा विषय होता. दोन्ही देशांचा इतिहास, भूगोल थोडक्यात सांगून ते विषयाला भिडले. एवढा मोठा विचार-व्यूह तासाभरात डोळ्यासमोर उभा केला. आर्मीतल्या माणसाच्या तटस्थ दृष्टिकोनातून हे ऐकताना फार छान वाटलं.... खुराड्यातून बाहेर पडल्यासारखं वाटलं.... रोज बातम्यांमधे बघतो, ऐकतो तो भारत आणि आज दिसलेला भारत... केवढी तफावत आहे.. कुठे कुठे काय काय चाललेलं आहे आणि आपण त्यापासून किती दूर आहोत..!

.....

काल ‘अथांग’च्या प्रती हातात आल्या. छान वाटलं. एक प्रतीक्षा संपली..!  आमच्या बँकेच्या मैत्रिणींच्या ग्रुपमधे.. मीना देशपांडेच्या घरी ‘अथांग’चे प्रकाशन साजरे केले. प्रस्तावना आणि एक प्रकरण वाचले. चर्चा झाली.

....

१०.७, १.८.२०१८

भाच्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला कोल्हापूरला जाऊन आलो. कार्यक्रम, प्रवास सर्व छान झाले. सगळ्यांच्या भेटी झाल्या. ‘पहाट पावलं’ वाचत असल्याचं कुणी कुणी सांगितलं. आवडतंय, वाचलं जातंय हे कळल्यावर बरं वाटलं...

प्रचंड पाऊस होता. तिथल्या मुक्कामात एकदा भर पावसातून घरी जाताना वाटेतल्या कडाप्पा कठड्याला जोरात थडकले. पाय घासला गेला. थोडक्यात निभावलं असं वाटलं. पण हळूहळू पाऊल काळेनिळे होऊन सूज आली. घरगुती औषधं पुरली नाहीत. डॉक्टरकडे जावं लागलं. त्यांनी तपासून औषधं दिली. एक्सरे काढावा लागला नाही. काही दिवसांनी बरं वाटलं.. ही एक बोनडेन्सिटी टेस्टच झाली. हाडं इतकी काही ठिसूळ झालेली नाहीत. असा रिपोर्ट आला...!

.....

१.८.२०१८

आज एक टेस्ट झाली. पोर्ट बसवला होता त्या बाजूला गळ्याला शिरेजवळ पुटकुळीसारखं हाताला लागत होतं. डॉक्टरना सांगितलं. त्यांनी तपासलं. त्यांना तसं काही वाटलं नाही. पण माझी शंका म्हणून Doppler neck views sonography करायला सांगितली. ती आज झाली.. आत बाहेर कुठेही काही आढळलं नाही... टेस्ट रिपोर्ट नॉर्मल आले. खर्च आणि त्रास झाला पण शंकानिरसन झालं. काही नसताना केवळ शंका काय करु शकते त्याचा अनुभव घेऊन झाला होता.. त्यातून धडा घेतला..! ऑपरेशनच्या वेळी इतकी शांत राहिले आणि आता छोट्या छोट्या गोष्टींचा एवढा बाऊ करतेय.. गंमतच आहे मनाची...

***

आसावरी काकडे

Sunday, 17 July 2022

माझ्या डायरीतून- ७०

कामात व्यस्त राहाण्याचा उपचार प्रभावी ठरला..!

१, १५, ३०.१.२०११७

‘कोहं’ – सुरेश व्दादशीवार आणि ‘आनंदी गोपाळ’- श्री ज जोशी ही दोन पुस्तकं वाचायला घेतलीयत.

सध्या कविता सुचतायत. ‘भेटे नवी राई’ या कवितेच्या ब्लॉगमधे छान भर पडतेय.. पण दाखवायला आई नाहीए..!

वाचन होत नाहीए. सगळा वेळ मोबाईलवर, व्हॉट्सॅप उपक्रमात चाललाय.. पण त्याचमुळे घरबसल्या अनेकांच्या संपर्कात राहता येतंय. कवितेला प्रेरणा मिळतेय. वेगवेगळ्या साहित्यिक ग्रुपमधे प्रत्यक्ष भेटून जे साध्य होत होतं ते काम व्हॉट्सॅप ग्रुपमुळे होतंय. माझ्या स्वभावाला आणि तब्येतीच्या दृष्टीनं हे चांगलंच आहे..!

२१.५, ४.६.२०१७

अनिल मोहरीर यांनी ‘Soul’ नावाचं एक पुस्तक लिहिलंय- आत्मा, पुनर्जन्म या संकल्पनांचं वैज्ञानिक आकलन अशी त्यांची भूमिका आहे त्यात. मी त्याचा मराठी अनुवाद करावा असं त्यांनी सुचवलंय. करावा असं मनात आलं आहे. विषय आवडता आहे. आणि मत जुळणारे वाटतेय. वाचून ठरवीन.

‘सोल’ वाचन चालू आहे. पण ग्रीप येत नाहीए. ‘आनंदी गोपाळ संक्षिप्तीकरणाच्या कामाला नाही सांगितलं. आणि तेवढ्यात विलास खोले सरांचा अचानक फोन आला. बोलता बोलता त्यांना सहज या बाबतीत सल्ला विचारला तर त्यांनी हे काम मी करावं असं पटवून दिलं. आणि मला पटलं. मंदाताईना लगेच फोन करून तसं कळवलंही. पुस्तक शोधून वाचायला सुरुवात केलीय. जमेल असं वाटतंय. सरांनी अंजली कीर्तने यांनी लिहिलेलं आनंदी जोशी चरित्र वाचायला दिलंय. तेही वाचतेय.

२४, २९.६.२०१७

बोन डेन्सिटी टेस्ट झाली. सुधारणा आहे. पण कंबर दुखतेच आहे... आता वाटायला लागलंय की दुखण्याला मीच धरून ठेवलंय खांबासारखं. काय काय टाळायला निमित्त म्हणून.. सुटका हवी असेल तर मीच सोडायला हवी मिठी लेट इट बी म्हणत, दुखण्याच्या कारणांमागे, परिणामांमगे धावणार्‍या कल्पनांना दुखण्याच्या वर्तमान रूपात पाहायला लावत... हातातला सुसह्य क्षण अशा  कल्पनांनी क्लेषकारक होतो...

एकदा मीच मला विचारलं, काय होतंय?, कंबर दुखतेय... केव्हा? उभं राहून काम करताना.. एरव्हीही मधे मधे लक्ष वेधतेय.. हं.. आणखी?, पोट डब्ब झालंय.. त्याचा जोर पडत असेल.. बाकी? अं... आणखी काही नाही... विचार करता करता ‘जमतंय, ठीक आहे..’ याची यादी मोठी झाली... एवढं दुःख तर अनेकांच्या वाट्याला आहे... मी का धरून बसलेय त्याला?

२४.७.२०१७

‘गौहरजान म्हणतात मला’- सुजाता देशमुख, ‘पाथेर पांचाली’- नीलिमा भावे ही पुस्तकं वाचली.. त्याविषयी नेहमीप्रमाणे डायरीत काही लिहिलं नाही.. फोनवर बोलणं झालं..

१८, ३०.८.२०१७

वंदनाच्या ‘सृजनसेतू’ अंकासाठी ‘कुसुमाग्रजांच्या कवितेतील ईश्वर-शोध’ या विषयावर लेख लिहिण्याच्या निमित्तानं कुसुमाग्रजांचे सगळे कवितासंग्रह वाचले. के रं शिरवाडकर यांचं ‘तो प्रवास सुंदर होता’ हे पुस्तकही वाचलं.. त्यात पार्श्वभूमीसह संग्रहांची सलग माहिती मिळाली. लेख लिहिता लिहिता विषयात घुसत गेले. २० पानी लेख झाला. माझा विचारही त्यातून स्पष्ट झाला.

समतोल अंकासाठी लिहिलेला ‘विश्वकुटुंब’ लेखही मोठा झालाय. लेखांच्या निमित्तानं अभ्यास, वाचन, विचार झाला... तो लेखापुरता राहिला.

८, १५.११.२०१७

राजेश्वरी कोठाण्डम यांनी ‘मेरे हिस्से की यात्रा’ या माझ्या कवितासंग्रहाचा तामिळ अनुवाद केलाय. तो प्रकाशित झाल्याचं समजलं. पाठोपाठ दोन प्रतीही हातात आल्या. उघडून पाहिलं पुस्तक. काही समजत नाहीए... अक्षरं म्हणजे मला आनंद देणारी नक्षी वाटली..!

‘आनंदी गोपाळ’च्या संक्षिप्तीकरण कामाला सुरुवात झाली. तीन प्रकरणं झाली.

‘पहाट पावलं’ या सकाळ पेपरमधल्या सदरात लिहिण्याबद्दल संतोष शेणई यांचा फोन होता. लिहीन म्हटलं. दोन लेख लिहून पाठवलेत.

२१.११, २१.१२.२०१७

आनंदी जोशी यांच्यावर अंजली कीर्तने यांनी बनवलेली फिल्म पाहिली. त्रोटक वाटली. मात्र त्यांच्या ५०० पानी पुस्तकातून बरीच माहिती, त्या काळची पार्श्वभूमी समजली. संक्षिप्तीकरण करताना या माहितीचा उपयोग झाला.

‘अथाह’चा अनुवाद केलेली ‘अथांग’ कादंबरी प्रुफं तपासायला आलीय. हे काम वाटलं त्या मानानं जिकीरीचं झालं. पण पूर्ण करून पाठवलं...

मधे मधे डॉक्टर... कार्यक्रम आणि वेगवेगळ्या प्रकारचं लेखन यात वर्ष भरकन गेलं... डॉक्टरांच्या औषधांइतकाच वेगवेगळ्या कामात व्यस्त राहाण्याचा उपचारही प्रभावी ठरला..!

***

आसावरी काकडे