Wednesday, 2 February 2022

माझ्या डायरीतून- १०

१६.५.२००२

माझ्या सख्ख्या मैत्रिणीची आई गेली. तिला भेटायला गेले होते. ती स्थिर होती. थोडेच दिवसांपूर्वी तीची ताई गेलेली. ताईच्या आकस्मात मृत्युच्या धक्क्याहून कुठला धक्का मोठा असूच शकत नव्हता... आपल्या ताईचं मरण स्विकारून जणू काही तिनं मरण ही कल्पनाच स्विकारून टाकलीय असं तिच्याशी बोलताना वाटलं.... जवळच्या कुणाचा मृत्यु किंवा कुणाच्या मृत्युची बातमी पचवणं हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असतो. तरी त्याचं गूढ कुणाला म्हणून उकलत नाही. तो अनुभव क्षणकाल अंतर्मुख करून बाजूला होतो. मिनिमाइज करून ठेवलेल्या कॉम्प्युटरमधल्या फाइलसारखा खालच्या पट्टीवरच्या कोपर्‍यात पडून असतो काही काळ आणि मग आपल्या जागी जातो..!

आत्ता, या क्षणात मी काय आहे तेवढं महत्त्वाचं. बाकी सगळं काळाच्या बोगद्यात गुडुप असतं..! ‘आत्ता’च्या ‘मी’मधे गत ‘मी’च्या स्मृती असतात आणि आगामी ‘मी’विषयीचे संकल्प असतात. प्रत्येक क्षणी आपण त्रिमूर्तीसारखे असतो... दोन बाजूचे दोन ‘मी’ मूक.. अदृश्य..!

आज आम्ही दोघं स्मृतीबनात लावलेल्या झाडाला पाणी घालायला गेलो होतो. दोन कॅन भरून घेऊन वर चाललो होतो. चालता चालता हे वाटेतल्या झाडांनाही पाणी घालत होते. वर पोचेपर्यंत ‘आपल्या’ झाडाला उरू दे ना पाणी असं मनात आलं. पण म्हटलं नाही काही. वाटलं की ती वाटेतली झाडं चोची उघडून खुणावत असतील आणि त्या प्रेरणा बनून कुणाकुणाला कृतीशील करत असतील. ‘आपल्या’ झाडालाही कुणी घालत असेल पाणी...

........

२७.६.२००२

काल एक स्वप्न पडलं... कुठे तरी गावाला गेलीय आणि आता परतायचं म्हणून बॅगा भारतीय. गाडीची वेळ होत आली तरी मला माझं सामान सापडतच नाहीए. इतःस्ततः विखुरलेले कपडे गोळा करतेय आणि पुन्हा पुन्हा ते हरवतायत.  स्वप्नभर हाच शोध चाललेला. शेवटी थकले. जाग आली तरी थकवा गेला नव्हता. वाटलं, स्वप्नातला असो की जागेपणातला.. कोणताही शोध थकवणाराच असणार..!

***

आसावरी काकडे

२.२.२०२२

No comments:

Post a Comment