Wednesday, 9 February 2022

माझ्या डायरीतून- १२

५.२.२००३

काल कॉलनीतल्या तीन लहान मुलांनी मिळून एका बेडकीला खेळत असलेल्या बॅटनं ठेचून मारलं. मी गेटपर्यंत जाताना मुलांचं काहीतरी चाललेलं पाहिलं होतं. त्यांना बेडकाला त्रास देऊ नका असं म्हटलं होतं. मला वाटलं ती मुलं बेडकाला जाऊ देऊन खेळत असतील. पुढं गेल्यावर मी हे विसरूनही गेले होते. पण परत येताना पाहिलं तर त्यातला एक मुलगा बेडकीला पुन्हा पुन्हा बॅटनी मारूनच टाकत होता. मी त्यांच्यावर मनःपूर्वक रागावले. मला खूपच अस्वस्थ व्हायला झालं. रागावून घरी येताना वाटलं तीन..चार..पाच वर्षांच्या मुलांचं हे कृत्य क्रूरपणाचं म्हणता येईल का? त्यांनी काय म्हणून बेडकाला असं ठेचून मारलं असेल? केवळ खेळ म्हणून?... त्यांनी घरात मोठ्या माणसांना पाली, झुरळं मारताना पाहिलं असेल? अशा प्राण्यांना मारायचंच असतं असे संस्कार त्यांच्यावर नकळत झाले असतील? ... मेडीकलचे विद्यार्थी शिकण्यासाठी इतके बेडूक मारतात त्याच्याबद्दल काय म्हणायचं? ती मुलं आपापल्या अंतःप्रेरणेनं वागत होती? हे वाईट आहे. असं करू नये हे न कळता केलेलं कृत्य वाईट होईल? अस्वस्थतेला या प्रश्नांनी खोलवर गुंतवून ठेवलं..!

.....

रोजच्या सारखी सकाळी लवकर फिरायला गेले होते. दिवस कामाला लागला होता.. एक माणूस चहाची गाडी लावत होता. सर्व नीट लावून झाल्यावर पहिल्या चहातला थोडा चहा व पाणी त्यानं रस्त्यावर टाकलं... काय असेल हा ‘विधी’? काय भावना असेल त्याची या मागे?... दूध उतू घालवणे.. चित्राहुती.. अशा प्रथांशी काही नातं असेल याचं?

....

भर वाहत्या रस्त्याच्या कडेला भाजीवाले.. भाजी घेणारे यांच्या गर्दीत एक भाजी विकणारा १२-१३ वर्षांचा मुलगा पत्र्याचं एक पिटपिट वाजणारं छोटंसं खेळणं कानाशी धरून वाजवत होता. इतक्या तमाम आवाजांच्या गर्दीत खेळणं कानाशी धरून तो पिटपिट आवाज ऐकण्यातला आनंद घेत होता. त्याची ही सहज कृती बराच वेळ मनात रेंगाळत राहिली... आनंद किती हाताशी असतो ना..?

.....

२०.२.२००३

कवितेतील प्रतिमांचं एस्थेटिक फंक्शन समजणं म्हणजे कवितेचा आशय समजणं..! कुठून कुठून कमावलेल्या अशा आकलनांच्या सोबतीनं मी समृद्ध होत चाललेय आणि हे आकलन शेअर करावं असं कुणी समानधर्मी मला भेटेनासं झालंय...

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment