Sunday, 27 February 2022

माझ्या डायरीतून- १६

३.१०.२००३

सध्या नवरात्र चालू आहे. माईकवर मोठ्या आवाजात गाणी.. आरत्या चालल्यायत. आश्चर्य म्हणजे काल लिहिण्यात मी एवढी गढले होते की त्या कर्कश्य आवाजावर चक्क ताल धरला गेलाय हे लक्षातही आलं नाही. गाणं होतं डोकं फिरलया... लगीन ठरलया... नेहमीप्रमाणे एक्साईट होण्याइतपत चिडचिड होण्याऐवजी ही सहज प्रतिक्रिया जाणवून मजाच वाटली..! हा काही माझ्यातला बदल वगैरे नाहीए. काल तब्येत चांगली होती असं फारतर म्हणता येईल.

......

४.१०.२००३

काल एकांशी फोनवर बोलणं झालं. ‘परमेश्वराची लीला बघा कशी असते’ असं ते एका संदर्भात म्हणाले. ऐकून आश्चर्य वाटलं... परवा डाळिंब सोलताना आतली रचना पाहून अशा निर्मितीचं आश्चर्य वाटलं... ही परमेश्वराची लीला म्हणता येईल. पण कितीही आश्चर्यकारक असल्या तरी मानवी घटनांना परमेश्वराची लीला कसं म्हणता येईल? गणितात जे उत्तर शोधायचंय त्यासाठी प्रश्नात एक अक्षर घालतात.. गणित सोडवून त्या अक्षराची किंमत काढायची असते. ‘परमेश्वराची लीला’ हा गणितातल्या त्या ‘क्ष-य’ सारखा एक पोकळ आकार आहे. जे कळत नाही, गूढ आहे त्याबद्दलचं नवल व्यक्त करणारा एक आविष्कार फक्त..!

......

७.११.२००३

डायरीतील जुनी पानं वाचताना किती कसा विचार करत होते ते पाहून सध्या तसा विचार होत नाहीए याचं नवल वाटलं. खरंतर एम ए अभ्यासामुळे ‘तत्त्वज्ञान’च इकडे तिकडे चोहीकडे अशी स्थिती आहे.. तरी?.... आता भराभरा नुसतं ग्रास्प करणं चाललंय. तिथं रेंगाळता येत नाहीए. परिक्षेत स्वतःच्या विचारांना जागा नाहीय. कदाचित परिक्षार्थी म्हणून चाललेल्या वाचनात मला रस नाहीए...

बर्‍याच घुसळणीनंतर मी श्रद्धा.. भक्तीभाव समजून घ्यायला लागले होते. अभ्यासानी त्याला खिळ घातलीय. विचारांची उलथापालथ झालीय. नव्या आकलनाचं व्यवस्थापन करायला वेळ मिळत नाहीए. चिडचिड.. कंटाळा... लगेच ताबा घेतायत मनाचा..!

......

३१.१२.२००३

एकूण वर्ष चांगलं गेलं. बराच प्रवास.. वाचन.. अभ्यास.. ‘मेरे हिस्से की यात्रा’, ‘बोल माधवी’ हे दोन कवितासंग्रह... तरी कंटाळा सारखा भोवती घुटमळत राहिला.. नव्या वर्षात त्याच्या विळख्यातून बाहेर पडायला हवं..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment