११.५.२००२
आम्ही तिघी मैत्रिणी वेताळ टेकडीच्या पुढे दगडाच्या खाणी आहेत तो परिसर बघायला.. फिरायला गेलो होतो. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले... आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. वादळ/वावटळ दबा धरून बसल्याच्या खुणा वातावरणात स्पष्ट दिसत होत्या. आणि आम्ही तिघी निघालो होतो. दुतर्फा पसरलेली झाडी पूर्णतः झडून नग्न झालेली. आमच्या मागे पुढे कुणी दिसत नव्हतं. क्वचित कुणी दिसत होतं ते परत येतानाच. आणि आम्ही आता चाललो होतो. गप्पा तत्त्वज्ञानाच्या, शहाणपणाच्या, उभारी धरण्याच्या विविध युक्त्यांच्या... आणि मनात भीतीनं पंख पसरलेले. त्या पंखांनी अंतराकाश झाकोळून टाकलेलं. डोळ्यांनी सौंदर्य टिपण्याचं आणि मेंदूपर्यंत पोचवण्याचं आपलं काम केलेलं. पण भीतीनं आगोदरच संवेदनांच्या दारावर नजर ठेवलेली.
गप्पा मारत आम्ही पुढे पुढे चाललो होतो. परत जाऊया असं वाटणं मी आत दडवून ठेवलं होतं. माझं लक्ष गप्पा, आतली भीती आणि बाहेरचा भिववणारा भव्य निसर्ग या तिघात विभागलं गेलं होतं. चालता चालता अखेर तो स्पॉट आला... दगडांच्या खाणीचा.. बहुधा माणसांनीच सतत खणत राहून रुंद आणि खोल करत नेलेला. इतक्या दूरवर माणसांची रहदारी बेताची. तरी आधार वाटेल इतपत होती. खाली उतरणार्या ढगांना दडपण येईल इतकी जास्त नाही आणि सुनसान एकाकी निराधार वाटेल इतकी कमीही नाही.
तिथं जरा निवांत बसलो. छान वाटत होतं. पण तिकडं पुरेसं लक्ष जात
नव्हतं. ते भीतीनं वेधून घेतलं होतं आणि मी तिला इतकी किंमत देत होते की ती समोर
दिसत असलेल्या सौंदर्याच्या आनंदासाठी जास्त वाटत होती. आता उठूया असं मी
म्हणायच्या आत मैत्रिण म्हणाली आणि आम्ही परतायला लागलो. हायसं वाटलं. भीती
घाबरवून मनासमोर चित्र उभं करत होती तसं काही झालं नाही. वादळ वारा विजा पाऊस...
काहीच आलं नाही. अंधारही अजून बाहेर पडला नव्हता. आम्ही सुखरूप घरी पोचलो.
आज दुर्गाबाईंच्या ‘पैस’ मधल्या लेखात भीतीबद्दल लिहिलेलं वाचताना हा प्रसंग आठवला. आणि लक्षात आलं की माझ्यातल्या निरीक्षकानं भीतीसह सगळंच टिपून ठेवलंय आणि मी मागताच माझ्या हातात दिलंय.
भीती वाटते तशी सर्वव्यापी नसतेच तर..! आताही त्या खाणी असलेला
परिसर त्यावेळच्या वातावरणासह डोळ्यासमोर येऊ शकतोय. निरीक्षकानं व्हिडिओ
रेकॉर्डिंग उत्तमच केलंय..!
.....
१३.५.२००२
आपण आपल्या मर्जीनं जन्माला येत नाही. मग
त्या जन्माचं सार्थक करण्याची जबाबदारी आपल्यावर का असावी?
***
आसावरी काकडे
२९.१.२०२२
No comments:
Post a Comment