७ मे २००१
सध्या रामकृष्ण परमहंसांचं चरित्र वाचतेय.... त्याच्या प्रभावात आहे. त्यात म्हटलंय, ‘ते विराट चैतन्य जगद्रुपाने प्रकाशित असून सर्व चराचरात ओतप्रोत भरून निरनिराळ्या नामरूपात नटलेले आहे.’
मनात आलं, ‘मी’ त्यापैकी एक आहे.... माझे बोट साखळीसारखे
त्याच्या हाती गुंफले आहे म्हणजे मीही विराट चैतन्यच आहे..!
....
१३ मे २००१
सर्व ईश्वरावर सोपवणे म्हणजे काय? निराकारावर कसे सोपवायचे?...
सोपवायचे म्हणजे खरं तर सोडून द्यायचे. पण या सोडून देण्यात बेफिकिरी, असहायता, नाइलाज असू नये. आणि सोडून दिल्यावर निराशा, उदासीनता असू नये.
सोडून देण्यात विश्वास असावा आणि सोडून दिल्यावर घडेल त्याबाबत हार्दिक स्विकाराची भावना असावी.
इथे मानवी प्रयत्न, विचार, प्लॅनिंग... हे सर्व गृहीतपणाने हवेच आहे.
या सोडून देण्याला, सोपवण्याला ईश्वराच्या
सगुण रूपाचा आधार घेणं ही एक ‘सोय’ आहे..! तुकोबांनी म्हटलंच आहे, “तुका म्हणे
येथे अवघेचि होय । धरी मना सोय विठोबाची ॥”
***
आसावरी काकडे
१२.१.२०२२
No comments:
Post a Comment