Wednesday, 19 January 2022

माझ्या डायरीतून- ६

 २३.६.२००१

डायरीचे नवे पान उलगडावे तसा दिवस उलगडतोय. कोरा. त्यावर तारीख नाही.. वार नाही.. सुट्टीची खूण नाही. सगळी पानं सारखी. त्यावर काय लिहायचं? समोर कोरा दिवस आणि त्याकडे बघणारं असंख्य कल्लोळ मागे टाकलेलं रिकामं मन... ‘मला निर्बुद्ध भक्ती आणि बुद्धीवादी अश्रद्धा यांचा मध्य गाठायचाय..’ मागे पडलेल्या कल्लोळातून काढून रिकाम्या मनानं एक सोंगटी टाकली कोर्‍या पटावर..!

.....

५.८.२००१

रेल्वेत झोपून प्रवास हा एक अनुभव असतो. गाडीच्या लयीत जोजवल्यासारखं पुढे पुढे जात झोपल्या झोपाल्या काही काही मनात येतं... आपण श्वास घेतो त्यामुळे बाह्य वातावरणाशी जोडले जातो. ही ये-जा नसती तर? आतल्या आत काय झालं असतं? आपलं अस्तित्व असतं लोखंडाच्या चिपेसारखं नाहीतर विटेसारखं बंदिस्त. पाच ज्ञानेंद्रियांच्या खिडक्यांतून सतत वर्दळ चाललेली असते. नाहीतर किती एकाकी झालो असतो आपण... या कल्पनेनं शहारे आले... गंमत वाटली तिची. पुन्हा पुन्हा खिडक्या बंद करून बघितल्या आणि दचकून पुन्हा पटकन उघडून टाकल्या...!

.....

२७.९.२००१

.... काल आणि अवकाश (Space and Time) मधला एक कण ‘मी’नं व्यापलाय... आणि मला ते समजतंय. जाणवतंय. ही सर्व सृष्टी निर्माण करणारं कुणी नाही.. ती स्वयंभू आहे. जर तिचा निर्माणकर्ता स्वयंभू मानायचा तर तिलाच का स्वयंभू मानायचं नाही? तर ती आहे स्वयंभू. निर्माणकर्ता सृष्टीच्या बाहेर नाही सृष्टीरूपच आहे. या सर्व असण्याचं मूलतत्व एक आहे ते म्हणजे vibrant energy ... तिचीच ही नाम-रूपं.. मी सुद्धा..!  Why me? By chance? मी इथं का आहे? उगीच?

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment