Sunday, 29 May 2016

शहाणी निरागसता..

४ १ १९९८

‘तादात्म्यानं जगणं ही सुद्धा एक क्रिएटिव्ह गोष्ट आहे..!’
*
आत्ता डोळे मिटून काही क्षण बसले तर जाणवून गेलं की सगळं काही घडत जातंय. योग्य तेच.... आणि तो अभंग आठवला- ‘जेथे जातो तेथे । तू माझा सांगाती...’ आता मी फक्त ओझं सुपूर्द करायचं बाकी आहे.. विश्वासाच्या हाती..!
*

६ १ १९९८

काल दिवसभर जडपणा जाणवत राहिला. ‘ओझं’ सुपूर्द करता आलं नाही बहुधा... ओझं बाळगायची हौस मिटली नाहीय की ज्याच्या हाती सुपूर्द करायचं त्याच्या अस्तित्वाविषयी पुरेसा विश्वास नाही? काल रात्री असं जाणवून गेलं की थकलेली मान टेकवावी असा खांदा आहे असं मानता येत नसेल, असा विश्वास वाटत नसेल, बुद्धी, विवेकावरच विसंबायचं असेल तर ते ओझं, ते थकलेपण हे सुद्धा काल्पनिक आहे, मीच निराधार काळजीनं, विचारानं ते वाढवून घेतलंय, जसा मान टेकवावी असा खांदा नाही तसं थकवणारं ओझंही नाही हे शहाणपण मला का अनुसरता येऊ नये?
*

७ १ १९९८

काल ‘ओझं’ आणि ते सुपूर्द करावं असं विश्वसनीय ठिकाण याबद्दलचे दोन दृष्टिकोन सुचले. एक, दोन्ही आहे असं मानायचं. ओझं सुपूर्द करून हलकं व्हायचं आपण किंवा दोन्ही नाही हे समजून घ्यायचं खूप आणि निवांत व्हायचं. काल मंजूशी बोलता बोलता असं लक्षात आलं की ‘नाही’ हे समजून घ्यायचं पण तरी ‘आहे’ असं मानण्यात ‘सोय’ आहे. काव्य आहे. ती एक हार्दिकपणे जगण्याची सुंदर शैली आहे. दीपू कशी रमलेली असते आपल्या कल्पना-विश्वात तसं निरागस, निर्विकल्प व्हायचं आणि रमायचं आस्तिकाच्या कल्पनेत. सर्व संतांनी अनुसरली ही पद्धत. अशी शहाणी निरागसता प्रयत्नांनी येईल? की सहज असायला हवी?
*

९ १ १९९८

प्रकाशाचा नाद मालवला तेव्हा नीरव काळोख तिथं होताच हे लक्षात आलं..!

काल सकाळी संस्थेत फिरायला गेले होते. तिथे मुलींची कवायत चालली होती. बाssए मुड.. लेफ्ट..राइट.. असा आवाज ऐकून तिकडे गेले. ते दृश्य बघताना डोळे भरून आले. ओघळलेल्या आश्रुंना कारण नव्हतं कळलेलं...

रोज बँकेत जाताना मेटॅडोरमधे जोशीबाई येतात. त्या आजी झाल्यायत. धावपळ करून घरातलं आवरून  मेटॅडोर गाठतात. मुलगा स्कुटरवर आणून सोडतो. गाडीचा पाठलाग करत येतात दोघं. कुणाला तरी दिसल्या की गाडी थांबवली जाते. मग त्या जेत्याच्या आविर्भावात गाडीत चढतात. त्यांचा खुललेला चेहरा मला खूप आवडतो. अशी छोटी छोटी युद्ध प्राण पणाला लावून लढायची आणि विजय साजरा करायचा...!
*

११ १ १९९८

‘अनुदिनी अनुतापे... घडी घडी विघडो हा निश्चयो अंतरीचा... तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधो... ’ शुभमंगल सावधान ऐकताच खरोखर सावधान झालेल्या आणि संसार सोडून निघून गेलेल्या समर्थ रामदासांना सुद्धा असं म्हणावं लागलं? .. की ही एक सार्वत्रिक तळमळ त्यांच्या शब्दांतून व्यक्त झाली? ... कर्वे संस्थेत फिरायला जाते तिथे वाटेत कोपर्‍यावर एक चहाचं दुकान आहे. तिथे चक्क करुणाष्टकं लावलेली असतात. फिरून येताना ऐकू येतात...

तिथेच कोपर्‍यावर इमारतीशिवाय असलेल्या रिकाम्या, म्हणून उकिरडा झालेल्या जमिनीच्या तुकड्याकाठी एक बाई, गोळा करून आणलेल्या कचर्‍याचं भलं मोठं पोतं उशाला घेऊन चिंध्याचिंध्यांचं पांघरूण डोक्यापासून घेऊन झोपली होती... एक चैतन्यपूर्ण मानवी देह कचर्‍यात... माथ्यावरच्या नित्यनवेपणानं सुंदर दिसणार्‍या आकाशाखाली? आणि मी काय करतेय इथे त्यासाठी?... हा गहिवर कसला? श्रद्धांजली.. आदरांजली.. मुर्दाड निरीक्षक.. अनेकांसारखी एक रस्त्यावरून जा-ये करणारी वाटसरू केवळ? असो...!!

क्षितिजातून डोकावणारा लालचुटुक सूर्याचा गोल वर अनंत अंतरावर.. आणि इथे खाली पोटापाण्यासाठी निघालेल्या म्हातार्‍या हातगाडीवाल्याच्या ओठात बिडीचा लालचुटुक जळता गोल.. एकानंतर दिसलेले दुसरे दृश्य...!

आज दादाजींशी गप्पा झाल्या.. भीतीबद्दल ते म्हणाले, एकेकाचा एकेक वीक पॉइंट असतो. कुणाला राग अनावर होतो.. कुणाला भीती..! to overcome it is to understand it thoroughly..!

***

No comments:

Post a Comment