११ १२ १९९७
मी रोज फिरायला जाते तिथल्या भल्या मोठ्या
वटवृक्षाखाली एक कुत्र उभं आहे असं दुरून वाटत होतं. पण ते इतकं निश्चल कसं उभं
आहे? आणि त्याचा रंगही निळसर कसा? असं वाटून कुतुहलानं त्याच्याजवळ गेले तर ते एका
दगडावर ठेवलेलं दप्तर आहे असं लक्षात आलं. तिथं अभ्यासाला आलेल्या एका मुलीनं ते
ठेवलं होतं तिथं... मला हसू आलं माझ्या प्रथम वाटण्याचं... दुरून काही ग्रह करून
घेणं किती हस्यास्पद असू शकतं ना?
***
१६ १२ १९९७
सूर्य उगवण्यापूर्वी असते तसे आकाश केशरी होत
होते आणि धुके पसरले अनावर. त्या दोघात किती अंतर असेल? त्या दृश्यापासून कित्येक
प्रकाशवर्षे दूर असलेल्या मला ते गुलाल उधळल्यासारखे दिसत होते. त्याच्याकडे पाहात
भराभर पावलं टाकत फिरायचा व्यायाम करायला निघाले होते. असंच चालत राहिलं तर त्या
दृश्यात मिसळून जाऊ आपण असा एक गंमतीशीर विचार येऊन गेला मनात... आत ग्राउंडवर
सुद्धा सगळं मस्त वातावरण होतं. व्यायाम करताना वाकून वर पाहिलं तर त्या धुक्यातून
वर चंद्र दिसला. आ हा हा.. असा उद्गार उमटला..!
*
जगण्याविषयीचं आकलन वाढवणारं शहाणपण ज्या
वाटेनं गेल्यावर फूल उमलावं तसं उगवतं मनात ती वाट परतून पुन्हा जगण्याशी का भिडत
नाही?
ते शहाणपण जगण्यात उतरण्यासाठी लागणारी तटस्थ अलिप्तता आणि शहाणपण उगवू देण्यासाठी हवी असलेली उत्कट माती एकत्र कशी येणार म्हणा..!
ते शहाणपण जगण्यात उतरण्यासाठी लागणारी तटस्थ अलिप्तता आणि शहाणपण उगवू देण्यासाठी हवी असलेली उत्कट माती एकत्र कशी येणार म्हणा..!
***
No comments:
Post a Comment