२८ १० १९९७
आज थोडी काठावर आलीय. ही सगळी भावनिक उलथापालथ
शरीरातल्या हार्मोन्सच्या पातळीत बदल झाल्याने होते... पाऊस पडतो तेव्हा तो नुसता
पाऊस कुठे असतो? वणवे सोसलेले असतात आधी.. त्या सगळ्या प्रक्रियेतून जावंच लागतं.
मग कोसळतो पाऊस. हलकं होतं आभाळ... हे कळतं सगळं. पण त्या त्या वेळी नाही उपयोगी
पडत.!
पण हे किती बरं आहे ना! नाहीतर एकचएक निरभ्र
अवस्था राहिली असती. प्रश्न अनुत्तरित राहाणं जितकं अस्वस्थ करणारं तितकं
जगवणारं.. जिवंत ठेवणारं.. काव्य आहे त्यात. पुढचाच क्षण.. माहीत नाही उचललेलं
पाऊल कुठे पडेल.. पडेल की नाही.. या माहिती नसण्यात किती मौज आहे ना..!
***
२९ १० १९९७
‘साधना’ दिवाळीअंकात मिर्झा गालीब यांच्यावर
नंदिनी आत्मसिद्ध यांचा एक लेख आहे. त्यात एक शेर आहे-
‘न था कुछ तो खुदा था
कुछ
न होता तो खुदा होता
डुबोया मुझको होने ने
न होता मैं तो क्या होता?’..
लेखात
यावर भाष्यही आहे थोडं. मला वाटलं, इथे ‘मैं’ म्हणजे सर्वनाम ‘मी’ नाही. ‘मैं’
म्हणजे अहं- ego. अहं म्हणजे मी आहे, असण्याची जाणीव. जी पाची
ज्ञानेंद्रियांमार्फत होत असते सतत. ‘मी’ आहे’ या असण्याच्या
जाणीवेमुळे समग्रतेशी एकरूप असणं बाधीत होतं. ही जाणीव जेवढी तीव्र तेवढं
समग्रतेतून दुरावणं आणि जेवढी कमी तेवढं निकट जाणं... ‘न होता मैं तो क्या होता?’
तो सीर्फ खुदा होता..! लेकिन डुबोया मुझको होने ने..!!
***
७ ११ १९९७
कितीही कामं असली तरी moment
to moment जगता आलं तर अधिक कामं अधिक कुशलतेनं प्रभावीपणे होतील. दुसर्या
क्षणाच्या घरात जाताना पहिल्या क्षणाचं ओझं बरोबर न्यायचं नाही. तिथं मोकळं
जायचं...
*
छोट्या शब्दांवर विश्वास ठेवून मी सोपवते आतला
मौल्यवान आशय त्यांच्या हाती तेव्हा तेही सर्वशक्तीनिशी जतन करतात तो आपल्या
आकारांमधे आणि पोचवतात खुलेपणानं त्यांच्याकडे येतील त्यांच्यापर्यंत...
*
काल गाडीतून जाताना उन्हाची तिरीप आली
डोळ्यांवर तर पटकन डोळे मिटले गेले प्रतिक्षिप्त क्रियेने आणि आपल्या शरीरातील
सर्व क्रियांच्या अद्भुत योजनेचे अपरंपार कौतुक वाटले. आपली प्रत्येक पेशी
स्वयंपूर्ण असते एका मर्यादित अर्थाने. अशा ‘अचानक’ वेळी मेंदूच्या संदेशाची वाट न
बघता तिथल्या पेशी स्वयंनिर्णय घेऊन टाकतात..!
***
No comments:
Post a Comment