Wednesday, 25 May 2022

माझ्या डायरीतून- ४२

२०.३.२००८

भारत सासणे यांची तीन-चार पुस्तकं आणलीयत वाचायला. त्यांच्या एकूण साहित्यावर दिवसभराचं चर्चासत्र आहे. ऐकायला जाणार आहे. होमवर्क म्हणून वाचायचीत... त्यातली ‘राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ ही कादंबरी आणि काही कथा वाचल्या. तेवढ्यावरून सासणे यांच्या शैलीची थोडीशी ओळख झाली. त्यावरून जाणवलं ते असं- कथावस्तूनुसार ही शैली बदलत नाही. छोटी छोटी वाक्यं.. वर्णनात सर्व सूक्ष्म छटा आणणारी. विशेषणं सलग... एकेका वाक्यासारखी स्वप्नं, पाऊस, धुकं अशी प्रतिकं वारंवार येतात. कथा-कादंबरीतलं वातावरण जुनं-पुराणं.. मध्यमवयीन, मध्यमवर्गीय.. स्त्री पात्रं बर्‍यापैकी समजूतदार, धीट.. पुरुष-पात्रं निराश, उदास, आत्मविश्वास नसलेली, वेडसर, नियतीवादी, खिशात हात घालणारी..

राहीच्या स्वप्नांचा उलगडा... संथ.. त्याच त्याच वर्णनांच्या चालीनं जात विशेष काही उलगडलेलं स्पष्ट न करणारा... हा उलगडा आपण समजून घ्यायचा.. राहीला वह्या... इ. काही कारण सापडलं. पण त्यापेक्षा ते सापडवताना स्वतःतल्या क्षमतांचा शोध लागला हे महत्त्वाचं... डॉक्टर आणि लेले ही हतबल आणि स्थितीशरण प्यादी.... महांकालेश्वर संस्थानिक काळातला असतो तसा नोकर, स्वतःसाठी नाही ‘आमच्या’साठी ग्रंथ शोधायला आलेला हट्टी तंत्रमार्गी गोसावी, आरशात तोंड उघडून जीभ बाहेर काढून स्वतःला बघत रानकाळातलं आपलं सौंदर्य आठवत बसणार्‍या वृद्ध आईसाहेब... त्यांना मरणाची चाहूल लागलीय पण त्यांना जगायचंय... बाळासाहेब धास्तावलेले, विक्षिप्त हसणारे, काहीतरी घडावं म्हणून काहीही नाटकं करणारे, आजुबाजूच्या सर्वांना रुबाबात वापरून घेणारे... त्यांची पत्नी उतारवयात गर्भारपण सोसणारी, बंदीवान, उमेद नसलेली.. नंतर पुत्रप्राप्तीमुळे उत्साहित झालेली... एक नर्स आणि राही एवढी पात्रं कादंबरीभर त्याच त्याच स्वभावानिशी, त्याच त्याच अंधार-उजेड-गंध-धुक्यात वावरत राहतात.... दिवाणखाना, खोल्या कितीतरी, कबूतरखाना, रानगव्याचं डोकं भंतीवर लावलेलं हे नेपथ्य.. त्याची तीच तीच वर्णनं.... कादंबरीवाचन ठरवून पूर्ण केलं... स्वप्नांचा अर्थ उलगडण्यासाठी अबोध मन.. तळघर.. प्रतिकं इ. फ्रॉइडचे विचार आलेत. कर्मफळ सांगणारी एक कथा, आपण फुलपाखरू झालोय असं स्वप्न पडलं. (चिनी तत्त्ववेत्ता) ते स्वप्न की हे सर्व जगणं हे फुलपाखराला पडलेलं स्वप्न? असा प्रश्न पडण्याचा किस्सा.. असे काही आधार कथन-शैलीला...

एकूण सासणे यांची लेखन-शैली भारावून जाण्याइतकी आवडली नाही. एकदा वाचायला ठीक. वाचल्यावर आपल्या घडणीत काही मोलाची भर पडली असं वाटलं नाही. पण वेळ वाया गेला असंही वाटलं नाही...

......

गोव्यातल्या कार्यकमानंतच्या चर्चेतून आलेली अस्वस्थता अजून छान वाटू देत नाहीए. माझ्या लेखन-शैलीबद्दलचा आत्मविश्वास विचलित झालाय. या निमित्तानं अंतर्मुख होऊन विचार करण्यातून काही सापडलं तर ठीकच आहे....

मी जे समजून घेते आहे ते स्पष्ट विवेकाच्या, बुद्धीच्या मार्गानं. त्याला स्वप्नं इत्यादी गूढांचा काही आधार घ्यावा असं मला वाटलं नाही. आणि मला जे कळलंय ते मी थेट, प्रतिकात्मक न करता मांडते आहे. अभिव्यक्तीची कसरत.. मोडतोड नाही.. माझं आकलन वैचारिक, तार्किक, बौद्धिक आहे. त्याला विवेकाची आणि आकलन क्षमतेची, चिंतनाची जोड आहे. पण ध्यान-साधनेतून किंवा जगण्यातल्या व्यापक.. व्यामिश्र अनुभवातून आलेल्या अनुभूतीची जोड नाहीय... म्हणजे मुळीच नाही असं नाही. पण बौद्धिक आकलन ज्या पातळीवरचं आहे त्या पातळीवरची अनुभूती नाही... जगण्यातल्या अनुभवातून प्रतिमा, प्रतिकं येतात... त्या आशय व्यक्त करण्यासाठीच येतात असं नाही. बरेचदा त्यांच्यामुळे आतला अमूर्त आशय मूर्त होतो, स्वतःला कळतो. माझं जगणं, ‘साधना’ चिंतन... साधं, सरळ, एकमार्गी असल्यामुळे अणि मी माझ्या असण्याशी प्रामाणिक असल्यामुळे माझं लेखन साधं.. सरळ.. होतं आहे.

मी जगण्यातले अनेक अनुभव नाकारते आहे. भीतीपायी... शारीरिक, मानसिक बौद्धिक आळसापायी... तशा झालेल्या संस्कारातून मी बाहेर पडू इच्छित नाहीए. ‘उद्‍ध्वस्त’ व्हायची भीती वाटते मला. मी बिनधास्तपणे झोकून देत नाही स्वतःला. आता तर आवराआवर करण्याची मानसिकता डोकं वर काढायला लागली आहे. नकोच, कशाला, जाउदे, बास झालं हे म्हणणं सोयीचं, सोपं वाटतंय. थोडीफार उमेद, उत्साह आहे / दाखवतेय तो ह्यांच्यामुळे... परिस्थिती अनुकूल असल्यामुळे...!

......

२३.३.२००८

काल भारत सासणेंच्या साहित्यावर दिवसभर चर्चेचा कार्यक्रम झाला. सासणेंच्या लेखनाविषयी आदर वाटेल असे काही मुद्दे समजले. त्यांची मुलाखतही चांगली झाली. त्यातून त्यांचं प्रामाणिक, जमिनीवर पाय असलेलं, भूमिका स्पष्ट असलेलं व्यक्तिमत्व उलगडलं. प्रश्न-उत्तरं थोडक्यात झाली. रमेश वरखेडेंनी त्यांच्या लेखनाचा इझमलेस लेखन असा चांगला उल्लेख केला. म्हणजे कोणतीही एकच भूमिका (राजकीय इ.) न घेणं चांगलं, प्रगल्भ असा..

‘जी गुढं सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात भाषांतरित होतात ती माझ्या लेखनात येतात.’ हे वाक्य लक्षात राहिलं.

स्वप्न म्हणजे आंतरिक उर्मी / शक्ती... इ. समजून घेता येऊ शकेल. पण अशी प्रतिकात्मक वर्णनं लिहिणं..वाचणं ही माझी आवड नाही. प्रतिकांचे अर्थ उलगडणं हे बेसलेस चिंतन होऊन बसतं असं मला वाटतं. ‘राहीच्या स्वप्नांचा उलगडा’ मधलं राहीचं स्वप्न आणि त्या आधारानं तिचं गावात येणं, वह्यांचा शोध, वह्यांच्या आधारानं वडलांवरचे आरोप दूर होतील ही समजूत.. त्यासाठी प्राणपणानं / प्राणापेक्षाही महत्त्वाचं शीलही पणाला लावून प्रयत्न करणं... हे समर्थनीय वाटलं नाही. असो. एक बरं की एकूण लेखन ( जेवढं वाचलं तेवढं) फारसं न आवडूनही चर्चासत्रामुळे सासणे या लेखकाविषयी आदर वाढला..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment