१४.२.२०७
मनात आल्यावर लगेच सातारला जाऊन आले.
जाताना वाटेत विनोबांचं ‘रामनाम - एक चिंतन हे छोटसं पुस्तक वाचलं. अनेक संत
नामस्मरणाबद्दल सांगत असतात. पण मी निमुट श्रद्धाळू नसल्यामुळे नमस्मरण ही अशी काय
प्रक्रिया आहे की ते एक भक्तीचं साधन व्हावं? या जिज्ञासेतून या संदर्भातलं काही
काही वाचत असते. विनोबांसारख्या विवेकी कार्यकर्त्यानेही यावर पुस्तक लिहावं हे
मला उत्सुकता वाढवणारं वाटलं. म्हणून प्रवासात बरोबर घेतलं. त्यात तीन महत्त्वाचे
मुद्दे मिळाले.
१- रामनाम.. खरंतर कुठलंही ‘नाम’ हे
अंतःकरण शुद्धीचं साधन आहे. त्याचं उच्चारण म्हणजे अंतरजगत आणि बहीर्जगत यांच्या
मध्यावर ठेवलेला दिवा. तो दोन्ही उजळवतो. तुलसीदासाच्या दोन ओळी दिल्या आहेत-
‘रामनाम मनी दीप धरु दीह देहरी व्दार
तुलसी भीतर बाहेरहू जौ चाहती उजियार
२- ईश्वरनाम, वैराग्य, अध्यात्म... अशा
गोष्टीमधे ढोंग, दंभ आहे. फसवेगिरी आहे. म्हणून अपण ते नाकारतच चाललो आहे. असे
एकेक पवित्र शब्द (मार्ग) आपण पुसायला लागलो तर ते फार भयंकर होईल. ते नव्या रूपात
पुन्हा पुन्हा समोर यायला हवेत.
३- विष्णुसहस्रनामात दोन नावं आहेत-
शब्दातीगः , शब्दसहः . त्यांचा अर्थ ईश्वर शब्दापलिकडे आहे पण तो शब्द सहन करतो.
......
२१.२.२००७
काल ‘बोल माधवी’ या माझ्या अनुवादित कवितासंग्रहाला अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. लोकसत्ता आणि ई टीव्हीवर बातमी दिली गेली. दिवसभर अभिनंदनाचे फोन येत राहिले. त्या निमित्ताने हा अनुवाद करताना काय काय जाणवलं ते आठवत राहिलं....
‘बोलो माधवी’ कवितासंग्रहातील कवितांचा
विषय असलेली कथा अंगावर येणारी आहे. तिचं कुठेही भांडवल न करता, त्यातल्या
‘आकर्षक’ गोष्टी अधोरेखित न करता ती कथा परिशिष्टामधे यथातथ्य निमुटपणे ठेवून
दिलीय. त्या कथेचं पूर्ण आंतरिकीकरण करून त्यातलं माधवी हे पात्र / व्यक्तीरेखा
समजून घ्यायचा, तिला बोलतं करण्याचा प्रयत्न या कवितांत केला आहे. आणि हे करताना
काळ, इतिहास, कविता या मूलभूत संकल्पना प्रस्तावनेमधे स्पष्ट करून घेतल्या आहेत.
कवितांमधे माधवी येते ती केवळ प्रतिमा बनून... पूर्ण तपशील लगडलेला तो काळ
परिशिष्टातल्या कथेत बांधून ठेवलाय आणि त्या संदर्भातल्या उत्कट प्रतिक्रियांना
काव्यरूप दिलंय. प्रतिमेला चिकटून काही तपशील येतो जो आजच्या वास्तवाशी जोडता
येतो.
इतिहास आणि कवितेचा संबंध समजून घेतला
आहे. इतिहास-पुराणातला साररूप आशय काळाला भेदून खेचून आणलाय आणि वर्तमानाच्या
मुशीतून काढून त्या समकालिन आशयाला कविताबद्ध केलंय.
कालसापेक्ष तपशील वजा करून त्यातल्या
वृत्ती-प्रवृत्तींना अधोरेखित करत ही कविता आजच्या स्त्रीवास्तवाचं चित्रण करते.
रचनाकाराची निर्मित पात्रं लोकमनात रुजून
निर्मात्यापासून अलग होऊन स्व-तंत्र होतात. काळ आणि तपशील गळून पडतो आणि सदैव
समकालिन आशय प्रक्षेपित करणारी प्रतिमा बनून ती अमर होतात. ‘माधवी’ हे असं पात्र
आहे.
माधवीला समजून घेण्यातली कवीची तात्त्विक,
प्रगल्भ भूमिका महत्त्वाची आहे. या आकलन प्रक्रियेतून मिळालेल्या आशयाला काव्यात्म
पातळीवर नेतानाची कवीची खानदानी, उत्कट आणि प्रामाणिक शैली प्रभावी आहे.
यात केवळ माधवीच्या आधाराने आजच्या स्त्रीवास्तवाचे चित्रण केलेले नाही तर या वास्तवाला एक पुरुष या नात्यानं मीही जबाबदार आहे... त्यातून मुक्त होण्यासाठी काय प्रायश्चित्त घेऊ माधवी? असा प्रश्न विचारलेला आहे.
या अनुवाद-प्रकियेच्या प्रभावातून नंतर
माझा ‘स्त्री असण्याचा अर्थ’ हा कवितासंग्रह आला. त्यातल्या एका कवितेत आलेली ओळ ‘पुरुषही
पेलू शकतो असं स्त्रीपण’ हे ‘प्रायश्चित्त’ आणि एकेका कवितेतील व्यक्तीरेखेतून
आलेलं असं स्त्रीपण म्हणजे काय त्याचं चित्रण.. म्हणजे ‘बोल, बोल माधवी / स्त्री
कधी बोलणारच नाही काय?’, ‘काय प्रायश्चित्त घ्यायला हवंय?.’...या ‘बोल माधवी’तील
कवितांमधे आलेल्या दोन प्रश्नांची उत्तरंच आहेत असं आता विचार करताना जाणवलं..
२००१ साली केलेला अनुवाद आणि २००५ दरम्यान
लिहिलेल्या ‘स्त्री असण्याचा अर्थ’ मधील कविता ही स्वतंत्र निर्मिती यांच्यातला हा
आंतरसंबंध समजून घेण्यासारखा आहे.
......
२८.२.२००७
देकार्त – पास्कल संवाद असा एक लेख वाचनात
आला. त्यातला एक उल्लेख लक्षात राहिलाय- पृथ्वी सूर्याभोवती फिरते या
कोपर्निकसच्या मताला पुष्टी देणारा सिद्धान्त देकार्तने मांडला पण प्रसिद्ध केला
नाही. या संदर्भात देकार्त म्हणतो, ‘हा सिद्धान्त म्हणजे संकटाला निमंत्रण.. चर्च
सामर्थ्यवान आणि शंकेखोर आहे. आणि मी काही रोज शूर असत नाही...’ हे वाचल्यावर
माझ्यातल्या घाबरटपणाला मला माफ करता आलं.
***
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment