Sunday, 22 May 2022

माझ्या डायरीतून- ४१

१२.२.२००८

बहुभाषी कवीसंमेलनासाठी गोव्याला गेले होते. संमेलनानंतर गप्पा झाल्या. बोलताना ईशावास्य, हायडेग्गर हे विषय निघाले. या विषयात अधिक अभ्यास असलेल्यांबरोबर बोलताना जाणवलं की त्याविषयीच्या मी केलेल्या वाचनामुळं झालेल्या आकलनाबाबतचं माझं भारावलेपण बाळबोध, नवश्रीमंतासारखं आहे... अंतर्मुख, काहीशी अस्वस्थ झाले... अवधूत परळकर यांना, गीतेसंदर्भात अंतर्नाद अंकात त्यांनी  लिहीलेल्या लेखनाला प्रतिसाद म्हणून एक सविस्तर पत्र लिहिलं होतं.. ते वाचून त्यांचं छान, सविस्तर उत्तर आलं. ते वाचतानाही मनात आलं की माझ्यात्रातले प्रतिसादाचे मुद्दे, लेखनाचा सूर बाळबोध आहे असं त्यांना वाटलं असेल....

खरंतर अभ्यासाचा प्रत्येक टप्पा आपल्याला समजुतीच्या वाटेवर थोडं पुढे नेत असतो. पुढे गेल्यावरच कळतं की आपण मागे आहोत....!

......

२४.२.२००८    

मायमावशी अंकासाठी मंगेश पाडगावकर यांनी केलेल्या अनुवादांवर लेख लिहिण्याच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या वीस-पंचवीस अनुवादांपैकी सात अनुवाद वाचले. गुजराती कविता, कबीर, मीरा, सूरदास आणि शेक्सपियरची तीन नाटकं. या सर्व अनुवादांना दीर्घ प्रस्तावना आहेत.

सूरदास या अनुवादाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे, सूरदासाचे भक्ती-काव्य समजून घेण्यासाठी त्याचं चरित्र जाणून घेताना लोककथांचा आधार घ्यावा लागतो.... ते वाचताना जाणवलं की लोककथांचा अन्वयार्थ लावण्यातून सूरदासाची माहिती थोडीफार कळेल पण त्याहून अधिक त्यावेळचे लोकमानस कसे होते ते कळेल. तेव्हाचं सामान्यांचं वैचारिक मागासलेपण कळेल...

सूरदास साक्षात्कारी संत नव्हता. त्याच्या पदांकडे भक्ती-काव्य म्हणून पाहिले पाहिजे...’ प्रस्तावनेतला हा निष्कर्ष धाडसाचा वाटतो. काव्यात अनुभूती आहे की नाही कसं ठरवणार?

या निमित्तानं सूरदास वाचताना वेगळा आनंद मिळाला. कृष्णलीलांचं वर्णन हा भक्तीप्रकार म्हणजे जगण्यातल्या सर्व गोष्टीत ईश्वर-रूप बघणं.. त्या पातळीवरचा आनंद घेणं... ते सर्व (संसार) म्हणजे ‘माया’ किंवा खोटं किंवा पाप असं काही न मानता ते सर्व ईश्वर आहे असं समजून ते भोगण्यातला आनंद घेणं.....!

‘भ्रमरगीत’ भागात उद्धव गोकुळात येऊन गोपींना तत्त्वज्ञान सांगतोय- इथे तत्त्वज्ञान ‘प्रेम-भक्ती’च्या शेजारी ठेवून दाखवले आहे.... जे आवडेल ते घ्यावं...!

अशा भक्ती-काव्याचा पद्यात्म अनुवाद करणं सोपं नाही. त्यात अनेक त्रुटी राहाणं स्वाभाविक आहे. पण कितीही तडजोडी कराव्या लागल्या तरी मूळ आशयाचे सर्व आयाम अनुवादकाला माहिती होतातच. त्यापासून आपण किती दूर गेलोय हे माहीती असतं..!

......

२६.२.२००८

लेखाच्या निमित्तानं छान वाचन झालं... जुन्या काळातलं काहीही वाचताना जाणवतं की संत किंवा राजे महाराजे.. यांच्या खेरीजचा त्या वेळचा समाज बर्‍याच बाबतीत मागासलेला होता. त्या वेळेपेक्षा आताचा समाज वैचारिक दृष्ट्या खूप पुढे गेलेला आहे. त्या काळात जे ढोबळपणे, पुन्हा पुन्हा सांगितलं जायचं ते स्वाभाविकपणे आता कालबाह्य वाटतं. सूचकतेनं, सूक्ष्म विचार सांगणारी मांडणी आता प्रेक्षक, श्रोते, वाचक यांना हवी असते. मात्र ही बौद्धिक प्रगती वरवरची आहे. माणूस म्हणून तो आतून बदललेला नाहीए. कारण त्याला मिळालेलं शहाणपण भाषिक आहे. आणि भाषा ही प्रत्यक्ष जगण्यापासून वेगळीच असते. जशी डबा ही वस्तू आणि डबा हा शब्द दोन वेगळ्या गोष्टी आहेत... तसंच जगण्यातलं शहाणपण आणि त्याविषयीचं बोलणं यात अंतर आहे. माणूस भाषेत, भाषेच्या पातळीवर पुढे गेला आहे. जगण्याच्या पातळीवर नाही..!

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment