२२.९.२००७
कविता महाजन यांची भिन्न कादंबरी वाचतेय. त्यातल्या वास्तव-दर्शनानं
अवाक् होतेय. रचिताचा नवरा विठ्ठल... तो बाहेरख्याली.. मुलं मोठी.. शिकतायत. दोघंही शिकलेली आणि नोकरी करणारी... ही लोकलनं
जाणारी. निवेदनातून लेखिक विश्वदर्शन घडवतेय. खचाखच शिव्या. रचिताच्या तोंडी न
शोभणार्या. कुठून कुठून डोक्यात शिरलेलं भडाभडा बाहेर पडतंय कसंही कुठेही.. काही
जागी भावना उत्कटपणे सुंदर होऊन प्रकटल्यायत... आत आग असेल तर धग आणि धूर दिसेल
त्या फटीतून झिरपत राहणार..!
....
२३.९.२००७
शिकता शिकता ईशावास्यचं पद्यरूपांतर होतं आहे. आज अचानक शांति-मंत्राचं
पद्य-रूपांतर करून झालं. चांगलं वाटतंय... ‘भिन्न’मधल्या वास्तव-दर्शनाचा मेळ कसा
घालायचा या आकलनाशी? त्या आकलनाचा आनंद या दर्शनानं झाकोळलाय... अशा वास्तवांसाठी
हे तत्त्वज्ञान काय करतं? हा प्रश्न विचलित करणारा आहे.
.....
२६.९.२००७
‘भिन्न’ मधलं वास्तव-दर्शन मला इतकं विचलित करतंय की वाटतंय वास्तवाच्या
पूर्ण कॅनव्हासवर हेच एक वास्तव पसरलेलं आहे... जगात अशी दुःखं, अशा विकृती, अशी
हतबलता, असे भ्रमनिरास, अशा फसवणुकी, असं निगरगट्टपणे जगणं.... अजून कितीतरी किती
किती परीनं चाललेलं असेल. तरी बुचाच्या झाडाचा बहर टपटपत राहतोय... विजयाबद्दल
जश्न मनवले जातायत... विसर्जनाच्या मिरवणूकी निघतायत बेभान जल्लोषात...
केरवारे..चहा-नाश्ते.. जेवणीखाणी... सर्व आपापल्या जागी आपापल्या तर्हेनं चालू
आहे....!
जगताना कुणाला स्वतःचेच प्रश्न दिसतात, छळत राहतात. कुणाला परिसराचे,
कुणाला देशाचे, कुणाला जगाचे, कुणाला विश्वाचे, कुणाला विश्वाच्या आरंभ-अंताचे...!
कुणाला कोणत्या प्रश्नांनी समूळ हलवावं, मेंदूच्या
पेशींवर कब्जा करून कृतीशील.. चिंतनशील बनवावं हे प्रत्येकाच्या
इच्छा-कुवतीप्रमाणे ठरणार. इच्छा-कुवत आत-बाहेरच्या, आज-इथेच्या घटकांनी ठरणार.
ज्याच्या वाट्याला जे येईल ते प्रामाणिकपणानं करणं तेवढंच हातात आहे आपल्या. आणि
हेही की यातलं एक श्रेष्ठ दुसरं हीन असं काही नाही हे समजून घेणं..! हे असंही
समजून घेता येईल की एक विशालकाय व्यक्ती अनंत कालाच्या पटावर असंख्य हातांनी
निभावत असते एकेक कर्तव्य त्यांची आंतरिक सांगड कळत नाही हातांना. आपल्यातील श्वास
घेणार्या संस्थेला पचन संस्थेच्या कार्याचा परिचय असणार नाही. असून चालणार नाही.
सर्व संस्थांच्या कार्याचं संतूलन राखलं जातं... समतोल ढळतो तेव्हा कोलमडतो
डोलारा.. लहान चित्राचं असं विस्कटून जाणं मोठ्या चित्राचा तोल सांभाळणारा एक भाग
ठरू शकतं... हा नियतीवाद नाही. नियतवादही नाही. हे आहे फक्त मर्यादा समजून घेणं..!
.....
टीम इंडियाची विजययात्रा चाललीय. त्यांना राजतीलक केलाय. ‘चक दे
इंडिया’च्या तालावर नाचतायत सगळी. पाऊस कोसळतोय आणि हजारो सामान्य लोक जल्लोष
करतायत... विजयरथाच्या बाजूनं धावत.. फूटपाथवर, इमारतींवर उभं राहून.. खेळडूंवर
फुलांचा वर्षाव होतोय. स्तुतीचा आणि बक्षिसांचाही...
या प्रचंड गर्दीतल्या विजयीरथाच्या बाजूनं धावणार्या सामान्य सामान्य
माणसाचं मन या क्षणी किती शुद्ध असेल.... ‘स्व’तून उठून देशाला विजय मिळवून देणार्यांचं
निखळ, उत्स्फूर्त कौतुक करण्याइतकं मोठं झालं असेल..!
हेच समूह-मन हारलेल्या टीमला खाली खेचण्याइतकं खालीही येत असतं...!!
**
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment