२५.६.२००८
आज आम्ही दोघं मनीषा दीक्षितच्या घरी गेलो होतो... चौघांच्या बर्याच गप्पा झाल्या.. ‘ताओ ऑफ फिजिक्स’ या पुस्तकातल्या काही संकल्पनांवर चर्चा झाली. antiparticle म्हणजे reverse time / negative time activity.
energy / matter.... जे जे व्यक्त ते भौतिक. जाणीव अव्यक्त असते.. सुपर कॉन्शसनेस म्हणजे ब्रह्म आणि देहातील जाणीव म्हणजे आत्मा असं काहीतरी वाटून गेलं.
Rem- Randum eye movement and Deep sleep असे झोपेचे दोन
स्तर असतात. रेम झोपेत दिवसभराच्या सर्व गोष्टींचे मेंदूत व्यवस्थापन होते.
अन्वयार्थ लावणे, दुर्लक्षित करणे, विकृत करणे
(generalazation, delition, distortion) या प्रक्रियेतून स्मृतिकक्षात स्मृतीरूपात
हे साठवलं जातं. माणसाचं व्यक्तित्व या स्मृतींनी बनतं.
प्रत्येकाला आतलं एक स्वप्न असतं. आणि एक बाहेरचं स्वप्न असतं. बाहेरचं स्वप्न म्हणजे जागेपणातलं जगणं. आतलं स्वप्न म्हणजे आंतर्विश्वातले विचार... बाहेरचं स्वप्न बदलायचं असेल तर आतलं स्वप्न बदलायला हवं. NLP- neuro linguistic programming या थेरपीमधे माणसाचं प्रोग्रामिंग बदललं जातं. जन्माला आल्यावर सर्व गोष्टी एका प्रोग्रामिंगनुसार चालू असतात. जीवन बदलायचं तर मूलभूत निवड, मूलभूत धारणा / विश्वास, प्रोग्रामिंग बदलायला हवं. स्वप्नात कुणीतरी पाठलाग करतंय. भीती वाटतेय. तर पुढे न पळता थांबून पाठलाग करणाराला विचारलं की का पाठलाग करतोयस? तर तो म्हणाला मी पाठलाग करत नाहीए... I am not chasing you, I am follwing you.... स्वप्न बदलणं म्हणजे स्वप्नाचा अन्वयार्थ बदलणं. आपणच ठरवलेलं असतं ‘आपलं बुवा असं आहे’. हे ठरवणं बदलायचं...
आजच्या चर्चेत अशा काही गोष्टी समजल्या.... आपल्या समोर सगळं
काही खुलं असतं. आपण आपल्या नजरेत, आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या पाहण्याच्या
क्षमतेनं पाहतो. आपले मूलभूत विश्वास त्यातलं एवढंच निवडतात जे स्वतःचं समर्थन
करतील. बाकीचं तसंच दुर्लक्षित राहतं.....
.....
२८.६.२००८
या संपूर्ण पृथ्वीवर एकाच वेळी जगत असतात असंख्य स्तरांवरची
माणसं. अत्यंत प्रगल्भ ते अत्यंत हीन या दोन टोकांच्या अधल्या-मधल्या स्तरांवर
असतं कुणी ना कुणी... एका ‘मी’मधेही वसलेली असते ही संपूर्ण रेंज... अत्यंत
प्रगल्भ ते अत्यंत हीन यांच्या मधली...!
......
७.७.२००८
काल अक्षरस्पर्शचा कार्यक्रम झाला. नीलिमा कढे यांनी नृत्य,
शिल्प, चित्र यामधील अवकाश या विषयावर मांडणी केली. चांगली केली. कलांचा आंतरसंबंध
या बद्दलचं ऐकत असताना असं वाटलं की मूळारंभाचा शोध घेण्याच्या आंतरिक उर्मीतून
घेतलेल्या शोध-प्रक्रियेत जे सापडतं ते व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग म्हणजे
वेगवेगळ्या कला. या कला म्हणजे गाभ्यातून उत्स्फूर्तपणे प्रकटलेला पूजाविधीच
असेल... एक प्रकारची रिचुअल्स असतील....
परवा दीक्षितांकडे झालेल्या चर्चेत ‘इन्स्टंट हीलींग’ संदर्भातलं ऐकतानाही
असं वाटलं की या सर्व थेरपीज, युक्त्या म्हणजेही रिचुअल्सच... मनोभावे केलेली, निर्मितीचं
समाधान देणारी कोणतीही कृती म्हणजे पूजाच की..!
....
कविता लिहिताना सुचणारे शब्द वेगवेगळ्या संस्कारांच्या थरांमधून
येतात... ते ‘माझे’ नसतात. ‘माझ्या’ कवितेसाठी हे सर्व थर बाजूला करत शुद्ध ‘माझा’
शब्द शोधायला हवा.. कवितेत आयता हातात आलेला शब्द वापरणं म्हणजे अनुभव किंवा जाणीव
नीट न न्याहाळणं. स्वतःचा शब्द शोधणं म्हणजे अनुभवाचं, जाणिवेचं स्वत्व शोधणं...
***
आसावरी काकडे