२.९.२००४
‘मी’ कोण? या प्रश्नाचं उत्तर असलेलं श्रीमद् शंकराचार्यांचं आत्मषटकम् हे स्तोत्र मी उत्सुकतेनं समजून घेतलं. देहापासून ‘मुक्ती’पर्यंतच्या लौकिक जगण्यातल्या सर्व गोष्टींचा एकेका कडव्यात निर्देश करून, ते म्हणजे ‘मी’ नाही असं या स्तोत्रात म्हटलं आहे... मग ‘मी’ काय आहे तर ‘चिदानंदरूपः शिवोहं शिवोहं..!’ पण हे समजल्यावर वाटलं की हे कळण्यानी काय होईल?
हा प्रश्न मनात पडून होता... काल वसुधाशी अशा काही विषयावर बोलता
बोलता एकदम क्लिक झालं की हे कळण्यानी दृष्टिकोन बदलेल. देहाच्या पायथ्याशी उभं
उभं राहून काय दिसेल? काय कळेल? त्यापेक्षा ‘शिवोहं’ या आकलनाच्या शिखरावरून वेगळं
दिसेल... वेगळं जाणवेल... जगण्याला प्रतिक्रिया देण्याची शैली बदलेल...
.....
१३.१०.२००४
सूक्ष्म आकलन विजेसारखं चमकून जातं. त्या क्षणार्धात त्याला
पकडून शब्दबद्ध करावं लागतं... पण हे कठीणच. केशवसुतांनी कविता म्हणजे आकाशीची वीज
पकडणं असं म्हटलंय तसं काहीसं... हे कठीण तर आहेच पण तसं करणं एका अर्थी केवळ अहं
सुखावण्यासारखं आहे. ‘आकलनाचं शब्दांकन करता येणं म्हणजेच आकलन’ असं मानणं म्हणजे
केवळ दंभ आहे. कारण हे आकलन जितकं सूक्ष्म तितकंच क्षणिकही असतं..! विजेच्या प्रकाशात
क्षणभर उजळावं आणि वीज निरवताच काळवंडून जावं तशी ही प्रक्रिया..! काळवंडलेलं
राहण्याचाच कालावधी दीर्घ. उजळण्याची क्षणचित्रं टिपण्यामुळे उजळलेपणात
स्थिरावण्याची शक्यता दुरावत जाईल काय? ही क्षणचित्रं आतल्या आत मुरवत ठेवावीत की एखाद्या
काळवंडल्या क्षणी आपल्यालाच किंवा इतरांनाही ती मार्ग दाखवतील म्हणून शब्दबद्ध करावीत?
.....
२४.१२.२००४
‘अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी’ हे रेखा इनामदार साने यांचं
पुस्तक वाचतेय... एम. ए. अभ्यासाच्या निमित्ताने अस्तित्ववादाची ओळख झाली होती. तो
अधिक समजून घ्यावा असं वाटत राहिलं. कारण जे समजलं होतं ते माझ्या दृढ झालेल्या
समजुतींच्या विरोधी होतं. तोपर्यंतच्या वाचन-विचारातून, ‘या विश्वाचा.. एकूण
‘असण्या’चा आपण अविभाज्य भाग आहोत आणि वैश्विक घडामोडीत माणसाला अगदी मर्यादित
स्वातंत्र्य आहे.’ या समजुतीत मी स्थिरावले होते. आणि अस्तित्ववाद तर सांगतो आहे
की माणसाला अमर्याद स्वातंत्र्य आहे आणि त्याची जबाबदारी नाकारणं ही दुःश्रद्धा-
बॅड फेथ आहे.... हे समजून घ्यायला हवं असं तीव्रतेनं वाटत होतं. त्याची सुरुवात
झाली.. मनात आलं, दोन महायुद्धांनंतरच्या खचून जावं अशा वातावरणात ‘माणूस स्वतंत्र
आहे’ असा विचार आला तरी कसा?...
***
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment