Saturday, 12 March 2022

माझ्या डायरीतून- २१

१२.५.२००५

लेखनासाठी भोवतालच्या पर्यवरणाबद्दल जागरुक असणं, समकालीन असणं आणि उपनिषदांचा अभ्यास करताना अंतर्मुख होत राहाणं या दोन विरुद्ध दिशांच्या डगरींवर पाय ठेवून मी निघालीय असं वाटत होतं. काल केनोपनिषदात असा उल्लेख अढळला की ‘आत्मसुख भोगण्यासाठी काव्य, संगीत, साहित्य, शास्त्राची उपासना इत्यादी गोष्टींचा अभ्यास करणे उचित ठरते.... आत्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी निराळी शक्ती आवश्यक असते. तिचे नाव प्रतिभा होय... शेवटी प्रतिभा जागृत होण्यासाठी आपली बुद्धी काही काळ विराम पावणे अवश्य असते. त्यासाठी तन्मयता हा उपाय आहे.’ हा उल्लेख मननीय आणि दिलासा देणारा वाटला.

.....

१५.६.२००५

मनापासून वाटतंय म्हणून उपनिषदं वाचतेय. पण भारावून जायला होत नाहीए. आत्मज्ञान करून घेणं हा उपनिषदांचा गाभा ‘माहिती’ झालाय. त्याची अनुभूती मिळणं अशक्य तर आहेच पण आवश्यक तरी आहे का? असा प्रश्न परत परत विचलित करतोय. वाचताना काही नवीन गोष्टी कळतायत. उदा. सद्‍बुद्धी म्हणजे प्रतिभा. तिच्यामुळे दृश्याच्या पलिकडला विचार शक्य होतो. त्याचं आकलन शक्य होतं. साधना, उपासना करण्याला या प्रतिभेचा उपयोग होतो. त्यासाठी ती एक प्रभावी साधन होते...

‘जागृती, स्वप्न, सुषुप्ती..’ विषयी वाचताना वाटलं की या अवस्थांचं आकलन करून घेणं हा आपल्या अस्तित्वाचं स्वरूप समजून घेण्याचा मार्ग आहे. स्वप्नात प्रत्यक्ष दृश्य जग नसतं. आणि त्याचं ज्ञान करुन घेणारी इंद्रियेही झोपलेली असतात. तरी दृश्याचे सर्व अनुभव येतात. त्या अर्थी स्थल-कालाची चौकट नसलेली स्थूलाची प्रतिरूप अशी सूक्ष्म सृष्टी असली पाहिजे... ती आपण स्वप्नात अनुभवतो...!

......

२५.६.२००५

उपनिषदं सांगतात की आत्मज्ञान करून घेणं हे माझ्या माणूस असण्याचं सार्थक. त्यासाठी मी बुद्धीला विराम द्यायचा, ‘मी’चं विसर्जन करायचं. त्यासाठी अनभ्यासाचा अभ्यास करायचा...’ वाचताना या सगळ्याचा मोह पडतोय... आणि ‘मराठी साहित्य आत्मकेंद्री आहे. त्याला भवतालाचं, वास्तवाचं भान नाही...’ असं काही वाचून, ऐकून एक साहित्य-रसिक, वाचक, लेखक म्हणून अस्वस्थ होतेय. एक माणूस म्हणून अशा ओढाताणीचं काय करायचं ते कळत नाही.....

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment