Friday, 25 March 2022

माझ्या डायरीतून- २४

२९.१०.२००५

फोन डेड आहे. तो आता फक्त एक हँडसेट आहे. कशाशीही, कुणाशीही न जोडलेला. तो चालू असतो तेव्हा त्यात जगातल्या कुणाशीही संपर्क करण्याच्या असंख्य शक्यता पडून असतात. तो चालू आहे की डेड आहे ते बाहेरून काहीच कळत नाही. उचलून कानाला लावला आणि त्याची धडधड ऐकू आली नाही की कळतं तो डेड आहे.

पोळीची वाफ हातावर आली आणि अंगठ्याला भाजलं. आग झाली. त्यावर पाणी ओतलं. मग कैलासजीवन लावलं. आग थांबली. त्वचा काळी पडली. जरा फुगवटा आला. आतून जखम बरी होईपर्यंत काळी त्वचा वर पांघरेलेली राहिली. तिचा रोल संपल्याचा आतून संदेश आल्यावर हळूहळू तडकत गळून पडायला लागली. तिच्या जागी तंतोतंत तशेच दुसरी त्वचा हजर झाली. मी काही न करता. प्रत्येक त्वचेखाली तिला रीप्लेस करण्याची शक्यता नेहमीच असते. पान गळून पडतं तिथूनच नवं उगवतं. ते असतं देठाच्या खाली शक्यतेच्या रूपात. प्रत्येक गळून पडण्याच्या क्रियेला उगवून येण्याची प्रतिक्रिया देत अनंत शक्यता ‘शून्यात’ असतातच.

पण असंही समजलं की शून्य.. emptiness अशी काही वस्तूस्थिती नाही. किंवा ती एक संकल्पनाही नाही. तर ‘विरचनेचं’ - deconstructionचं एक साधन आहे. (deconstruction म्हणजे साचेबद्ध विचार करण्याच्या सवयीतून बाहेर पडणं. परिस्थितीकडे पूर्णतः नव्या दृष्टिकोनातून पाहणं. एक प्रकारे ‘पुनर्वाचन’) ‘डेरीडा फॉर बिगीनर्स’ वाचून झालं. बरंचसं कळलं नाही. जे कळलं ते ग्रेट, वेगळं, नवी दृष्टी देणारं वाटलं. पुस्तकात शेवटी ‘बुद्धीझम आणि डीकन्सट्रक्शन’ अशी मांडणी केली आहे. बुद्धाचा शून्यवाद म्हणजे वैदिक परंपरेची विरचना करणं आहे.... शून्यवादाचं वेगळं आकलन झालं असं वाटलं.

‘डीकन्सट्रक्शन आणि मानसशास्त्र’ अशीही एक मांडणी आहे. तीही समजली. आवडली. पटली.... तसा विचार करून पाहावा असं वाटलं. ‘मी निराशेच्या गर्तेत आहे’ हे माझं, माझ्या अवस्थेचं एक वर्णन आहे. माझ्या वर्णनाच्या कित्येक शक्यता परिघावर आहेत. त्यातली कोणतीही मी केंद्रस्थानी आणू शकते. माझ्यावर नियंत्रण करणारा, मला दिग्दर्शन करणारा कुणी एक ‘स्व’ माझ्या आत आहे या समजुतीचं बोट सोडून मी मुक्त होणं शक्य आहे. असा कुणी एकच एक ‘स्व’ नाही. दर क्षणी बदलणारा, पूर्ण नवा विचार देऊ शकणारा ‘स्व’ मला कोणत्याही एका अवस्थेशी बांधून ठेऊ शकणार नाही.

......

३०.१०.२००५

तब्येत बरी नाही. काही उपाय म्हणून गव्हांकूर चूर्ण घेत होते. ते आज घेतलं नाही. पुन्हा ताकावरचं पाणी घेऊन बघतेय. दुर्लक्ष करून बघणं हाही एक उपाय करून बघावा म्हणतेय.... दिल्लीत बॉम्बस्फोट झालेयत. कुठेही होऊ शकतात. या ब्रेकिंग न्यूजनं आन्ध्र/तामिळनाडूतली अतिवृष्टी, वादळ, रेल्वे अपघात... या बातम्या मागे टाकल्यायत... भोवतीच्या सततच्या अशा काही वातावरणानं अस्वस्थ होतेय पण इतकी नाही की माझ्या त्रासाचा विसर पडावा... मनाच्या स्क्रीनवर तीच एक ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होतीय. यातून सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला. पण काही साधलं नाही... काही टाळण्याचं निमित्त म्हणून बरं नसणं मीच धरून ठेवलंय काय? पण मला काय टाळायचंय? तोल जाऊन पडायला लागलं की प्रतिक्षिप्तपणे हात जवळच्या कशाचा तरी आधार घेतात त्याप्रमाणे माझ्या आतल्या सिस्टिमला निमित्त पुरवायची सवय झालीय का? की या ना त्या प्रकारे मीच निर्माण केलेल्या बागुलबुव्याला मी घाबरतेय? हद्द म्हणजे हे कळूनही मी स्वस्थ होऊ शकत नाहीए. याला काय म्हणावं? डेरिडाच्या पुस्तकात एक वाक्य आहे- Intellectual clinging is one of the worst forms of suffering.... the meditator finds that there is no underlying basis for any emotion, experience or viewpoint- and with nothing to grasp, the mind is free.

......

१.१२.२००५

‘मी का लिहिते?’ या विषयावर लिहिण्याच्या निमित्तानं विचार करताना मी का वाचते? याचाही विचार झाला. असे प्रश्न पडणं महत्त्वाचं. पण केवळ प्रश्नांना धडकत राहाणं पुरेसं नाही. त्यांचा योग्य दिशेनं पाठपुरावा करायला हवा. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून प्रश्न पडणं म्हणजे काय? आणि त्याचा पाठपुरावा कसा केला जातो ते उमगलं. तितकं आपल्याला शक्य नसलं तरी आपल्या पातळीवरच्या प्रश्नांना सामोरं जाताना त्या समजुतीचा उपयोग होतो. ‘मी का वाचते?’ असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे बरेच विचारवंत दुसर्‍याचं वाचायला विरोध करतात. ज्ञान.. विचार आतून उगवायला हवेत.. इ. मी वाचते ते विचारांना चालना मिळावी म्हणून. वाचत नसते तेव्हा येणारं बौद्धिक शैथिल्य घालवण्यासाठी. अधिक वाचनाचे तथाकथित धोके (फुकाचा अहंकार वाढेल.. मनात अनावश्यक गर्दी होईल स्वतःचा स्वतंत्र विचार दबला जाईल.... इ.) मला घाबरवत नाहीत. कारण अधिक वाचनानं आपण किती अपुरे आहोत, खर्‍या ज्ञानापासून किती दूर आहोत हेच लक्षात येतंय. त्यामुळे अहंकार वाढण्याची शक्यता नाही. बाह्य वाचनाची गर्दी होऊ न देता त्याचा उपयोग आंतरिकतेला जाग आणण्यासाठी करून घेतेय. ही सजगता समजूत वाढवतेय ना हेही निरखत असते....

***

आसावरी काकडे

No comments:

Post a Comment