२४.१.२००६
भक्ती अभ्यासवर्ग सुरू झाला.... भक्तीचा प्रभाव अतिशय सूक्ष्मपणे पण स्पष्टपणे जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर (साहित्य, कला, समाजकारण, अर्थकारण, राजकारण..) होत असतो. तरी त्या त्या विषयाच्या अभ्यासात भक्ती या मुद्द्याचा विचार केला जात नाही. त्यामुळे भक्ती हा स्वतंत्र अभ्यास विषय होऊ शकतो. भक्तीचा अशा तर्हेनं कधी विचार केला गेला नव्हता. तो करण्याची गरज आहे. अभ्यासवर्ग सुरू करण्यामागची ही भूमिका महत्त्वाची वाटली. त्यामुळे पुणे विद्यापिठात दिलीप चित्रे आणि सदानंद मोरे यांच्या कल्पनेतून भक्ती अभ्यासवर्ग सुरू होतायत असं कळल्यावर जायचं ठरलं....
आज पहिला दिवस... अभ्यासवर्गाचा हेतू आणि अभ्यासक्रमाचा आवाका तरी चांगला आहे. प्रत्यक्षात काय साध्य होतं बघू..!
.....
३.३.२००६
हायडेग्गर वाचतेय. समजत नाहीए. काल वाचताना वाटलं की कळलं नाही तरी वाचन थांबवू नये. कळत नाही हे कळणंही बरंच. या वाचनानं कोण कोण कुठल्या पातळीवर कसा विचार करत होतं हे तरी कळेल. पाश्चात्य तत्त्वज्ञानातले ‘वेगळे’ विचार वाचताना गोंधळून जाण्यातून विचार करण्याच्या साच्यातून बाहेर पडता येईल...
‘चांगदेव पासष्टी’चं आजच्या मराठीत अभंग छंदात रूपांतर केलंय. मनात आलं आणि सुरुवात केली तेव्हा पहिल्याच ओवीला इतकं अडायला झालं की जमणार नाही म्हणून नाद सोडून दिला. तरी ओवी मनात घोळत राहिली. ओवीतले शब्द आजच्या रूपात आणताना, त्यांची ओवीतली मूळ ‘व्यवस्था’ बदलताना त्यांच्या अधिक जवळ जाता आलं. ती एक आनंददायी कसरत होती... बौद्धिक पातळीवरची... पण एवढंच नाही झालं फक्त. या कसरतीमुळे आशय आणखी एक स्तर खाली झिरपला..! रूपांतर प्रक्रिया म्हणजे आकलनासाठी झालेला रियाजच असतो हे उमगलं.
एका बाजूला असं वाचन चालू असताना त्या जडपणावर उतारा म्हणून दूरदर्शन मालिका बघतेय. ‘भाग्यविधाता’ मधली सुनंदा (आई) भोंदू ज्योतिषाच्या आहारी गेलीय. आणि ती तन्वीला पांढर्या पायाची म्हणून त्रास देतीय. घरातून बाहेर काढलंय तिला. आणि काय काय चाललंय. फालतूपणा वाटतोय. पण सुनंदाचं बिनडोक खरेपणानं वागणं बघताना मनात आलं की कथानकाच्या दृष्टीनं असं घडणं आवश्यक असणार. कथानकाला कसं वळण द्यायचं ते कथाकार ठरवणार. त्यानुसार त्यातल्या पात्रांना वागणं भाग आहे. त्याला ती पात्रं काय करणार अभिनय निभावण्याखेरीज? प्रत्यक्ष जगण्यातही ‘माणसं’ अशी वागतातच का? असा प्रश्न पडतो तेव्हा ‘अज्ञात कथाकाराची तशी योजना असते म्हणून’ असं उत्तर देता येईल असं वाटून गेलं... पण कदाचित हा नियतीवाद झाला. तो नाकारून ‘का?’ या प्रश्नाला भिडायला हवं..!
......
१२.३.२००६
अवितोको
संस्थेतर्फे येरवडा जेलमध्ये कवीसम्मेलन आयोजित केलं होतं. मला निमंत्रण होतं.
गेले होते. बिचकतंच... तिथलं वातावरण नवं होतं. प्रत्येक गोष्ट लक्ष वेधत होती. तुरुंग
असून स्वच्छता आणि फुलझाडं, हिरवळ
इत्यादीमुळे प्रसन्नता होती. आम्हाला उशीर झाला होता. कवीसम्मेलन चालू झालं होतं. कैदी
बायका गझल गायन enjoy करत होत्या. त्यांच्या चेहर्यवरचे भाव
निरखत बसले. कवितेच्या शब्दांकडे लक्षच नव्हतं. त्यांच्या चेहर्यावरचं हसू पाहून
गलबलायला झाला. ते हसू चेहर्यावर येण्यासाठी त्यांनी केवढ काय काय मागे टाकलं
असेल... सगळ्या स्त्रिया तशा अशिक्षित, गरीब दिसत होत्या. झालं
गेलं विसरणं, अन्याय, अपमान, चीड, दुःख, हताशता, आगतिकता, निराशा, असं काय काय असेल जे हसून
झाकून टाकलं जात होतं.. हे सगळं तितक्या
तीव्रतेना त्यांना जाणवत असेल? की
रक्तात स्वाभाविकपणे गोठण्याची क्षमता असते वाहून जाऊ नये म्हणून तशी मनाचीही रचना
असेल आपोआप घट्ट होण्याची?... कुणाचा इतिहास कळण्यासारखा
नव्हता. पण हिरव्या पिवळ्या साड्यांच्या गणवेषामधे काय काय लपवलं गेलं असेल त्या कल्पनेनंही व्याकुळ व्हयायला झालं.
कवीसम्मेलनासाठी
आलेल्या कवयित्री नेहमीसारख्या ‘तयार’ होऊन
आल्या होत्या. तसं normal येणं त्यांनी जाणीवपूर्वक केलं
असेल काय? सोशल वर्कचं टेकनिक म्हणून?
निघताना तिथली एक बाई संस्थेच्या प्रमुख बाईंच्या गळ्यात पडून रडत होती. तुरुंगातल्या
कुणाला असं जवळ घेणं, अगदी शो म्हणून देखील सोपं नाही. कोणत्याही
हेतूनं असेना का, सर्व मर्यादांसह असं काही काम करतात
त्यांचं कौतुक वाटतं. कारण मला यातलं काहीच जमत नाही..!
***
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment