Wednesday, 20 April 2016

कशाची पूर्वतयारी आहे ही ?

२५ जुलै १९९७

      दिवस उजाडलाय. पाण झाकोळलेलंच आहे वातावरण. आकाशात ढगही नाहीत जमलेले. अख्ख आकाशच एक ढग झालंय की काय ? पावसानं ओथंबलेलंही वाटत नाहीय. नुसताच सुंद मुड आहे हवेचा. तळ्यासारख्या माझ्या मनाच्या पाण्यात प्रतिबिंबित झालंय हे सगळं ! बळेच स्वत:ला उठवून कामाला लावलंय. 

       हवेचं बरं आहे ना... वाटलं तरच वाहते प्रसन्नपणे. नाहीतर ठप्प राहाते निःशंकपणे. त्या त्या वेळच्या वाटण्याशी एकनिष्ठ. तिला भीती नाही वाटत की, पुन्हा प्रसन्नतेचा ऋतू येईल की नाही याची ! आतून फाकेल प्रकाश, उजाडेल या विश्वासाचीही गरज नसल्यासारखी हवा ‘असते’ नुसती. कधी ठप्प तर कधी सळसळत. दोन्ही ‘अवस्थाच’ केवळ..! हे स्वयंभू शहाणपण कसं विसरतं पुन्हा पुन्हा? की मरगळ आपला रोल इतक्या इंटेन्सली, खरेपणानं, बजावतेय की ती कायमसाठी आलीय मनात वास्तव्य करायला असं वाटावं!

       आजतर ती इतकी अस्ताव्यस्त पसरलीय मनभर की सकाळी फिरयला गेल्यावर आपापल्या दिनचर्येत मग्न झालेल्या तमाम लोकांचं कौतुक कौतुक वाटलं ओतप्रोत ! मुलांना शाळेत घेऊन जाणारा रिक्षेवाला, पेपर टाकणारी मुलं, मुलांची दप्तरं हातात घेऊन मुलांना शाळेत सोडायला जाणार्‍या आया, देवासाठी फुलं.. दुर्वा गोळा करणार्‍या गृहिणी, मस्तीत वाहनं चालवणारी माणसं.... वाटलं की उभारी धरून ही सर्व माणसं काहीतरी करताहेत हे किती बरं आहे ना ? 

       मरगळून, ढेपाळून सगळी ठप्प राहिली तर? भलेही ती आतून कशीही असतील, वरच्या या कृतींनाही महत्त्व आहेच आहे. कुणासाठी काही करायला हवं अशी बांधीलकी नसलेली माझ्यासारखी माणसं, काठावरून बघत राहतात नुसती. विचार करतात (किंवा करत नाहीत), अर्थ लावत राहतात सगळ्याचा, निष्कर्ष काढतात... जगणारी वेगळीच राहतात. आज असं वाटलं एकदम की काळजी करावा असा देहाचा संसार तरी आहे, हे बरं आहे ना ? एका अर्थी जमीनीवर यायला. नाहीतर .... काय माहीत ?

रुटीनमधें अडकलेल्या, सुखेनैव (?) गुंतलेल्यांच्या कौतुकाची मजल कुठंपर्यंत गेली माहीती आहे ? भ्रष्टाचार... इत्यादी, ‘कु’व्यवहारात गुंतलेल्या लोकांचंही एका अर्थी कौतुकच वाटलं. वाटलं की किती त्रास घेऊन ते निभावतायत आपला ‘कु’रोल ! या सर्वव्यापी मरगळीनं, निराशेनं, निष्क्रियतेनं त्याना थोडाही स्पर्श केलेला नाही. किती समरसून, at any cost, उमेदीनं ते निभावतायत त्यांनी निवडलेली लाईफस्टाईल !... की तेही नाईलाजानेच चाललेत पुढे... परतीची सोय नसलेल्या या वन वे रस्त्यावरून ?

***

२७ जुलै १९९७

वावटळीचा जागीच घुमवणारा वेग कमी झालाय. उडालेली धूळ हळुहळु खाली बसतेय. वाट चुकून भरकटलेले धुळीचे कण परतलेत आपल्या घरी. जमीन सुखावलीय मुलं सुखरूप परतल्यावर नकळत निःश्वास टाकणार्‍या आईसारखी. आतले प्रवाह कसलीशी चाहूल लागल्यासारखे आंतरिक ओढीनं निघालेत कुठेतरी .... कशाची पूर्वतयारी आहे ही ?

*** 

Monday, 18 April 2016

काही सेकंदांचं ते दृश्य..

११ जुलै १९९७

आपल्या दुःखातून उजळून निघायचं, संकटातून नवा मार्ग काढायचा, नवं वळण नवी दिशा मिळवायची आयुष्याला.. हे संत तुकारामांनीही सांगितलंय. नुसतं सांगितलं नाही, तसं जगून दाखवलंय. ते म्हणतात, ‘बरं झालं शूद्र म्हणून जन्माला आलो नाहीतर अहंकारानंच बुडालो असतो. बरं झालं बायका मुलं मेली.. दुष्काळात सगळं उद्‍ध्वस्त झालं.. आता मोह करावा असं काहीच नाही उरलं. लौकिक आयुष्यातल्या या संकटांकडे त्यांनी असं पाहिलं. हे केवळ पराभव स्वीकारणं नव्हतं तर संकटातून तावून सुलाखून अधिक उन्नत करणार्‍या मार्गाचा शोध घेण्याची संधी आहे असं मानणं होतं... अशा आत्मशोधाचा पूर्ण आलेख असलेले अभंग इंद्रायणीत बुडवले तेव्हा तर या दृष्टिकोनाची कसोटीच होती. तुकाराम महाराज या कसोटीलाही उतरले. लोक म्हणतात की अभंग तरले... केवळ अभंग नाही ते स्वतःपण तरले....!
     
      परवा सातारला जाताना प्रवास अनुभवत होते. बाहेरचं धावतं दृश्य, ओव्हरटेक करणारी वाहनं, मागे पडणारी वाहनं.. झाडं.. रस्ते.. एका ट्रकला अमच्या एस. टी.नं ओव्हरटेक केलं. तेव्हा त्या ट्रककडे लक्ष गेलं.. २५-३० वर्षांचा तरूण ड्रायव्हर ट्रक्क चालवताना स्टीअरिंगवर हातानं ताल देत गात होता बहुधा. तो ड्रायव्हिंग एन्जॉय करतोय असं त्याच्या चेहर्‍यावरच्या हावभावावरून वाटलं. तो गाण्याच्या तालावर अंगही मजेत हलवत होता. आमची गाडी ओव्हरटेक करून पुढे जाताना गाडीकडे बघत जाओ जाओ असं इतक्या सहज गंमतीनं म्हणत होता की वाटलं आमचं पुढं जाणंही तो एन्जॉय करतोय. काही सेकंदांचं ते दृश्य, हा अनुभव त्या ड्रायव्हरच्या सर्व प्रतिक्रियांसह उगीचच लक्षात राहून गेला..!

***

Saturday, 2 April 2016

हिणकस गोष्टीच आकार पेलत असतात..

२७ जून १९९७

      या असीमाच्या पसार्‍यात आपल्या नगण्यतेला काही सीमाच नाही ही जाणीव सतत क्षीण होत जाऊन मी म्हणजेच सगळं काही हे वाटणं इतकं ताजं, इतकं खरं होऊन आपल्याला लपेटून बसतं की बस..! पण हे किती बरं आहे ना? अभिमानानं, उमेदीनं जगायला बळ त्यातूनच तर मिळतं!... कोणी केव्हा केलं असेल ‘केव्हा काय वाटायला हवं’ असं जाणीवेचं प्रोग्रॅमिंग?

***

२८ जून १९९७

      कालचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम छान झाला. पण अशा कार्यक्रमांचं भाबडं कौतुक आता वाटत नाही. उलट अशा उत्सवांमुळे कमअस्सल साहित्य / कला लोकांसमोर येतात. त्यांचाच गवगवा होतो. ती म्हणजेच कला / काव्य असा समज होतो... असे विचार मनात येऊन ‘काय चाललंय हे?’ अशी प्रतिक्रिया मनात उमटली. आणि लगेच असंही वाटलं की आपल्याबद्दलही इतर काहींना असं वाटत असेल.. हे जाणवून अस्वस्थ व्हायला झालं.

      आजुबाजूच्या सगळ्या अशा गुंत्यात, भंगारात मनाला न पटणार्‍या, बरं न वाटणार्‍या गोष्टी निर्ममपणानं नाकारायच्या ठरवल्या तर सगळ्यातून निवृत्तच व्हावं लागेल. जगण्यासाठी उमेद बाळगायची तर काही कमअस्सल गोष्टी स्वीकाराव्या लागतात. नाकारण्यात वाइटाबरोबर बरंही नाकारलं जातं. त्याहून अधिक बरं होण्याची शक्यताही नाकारली जाते. काकांशी बोलताना समजलेली ‘मिथून’ कल्पना इथे आठवतेय. शुद्ध गोष्ट शुद्ध स्वरूपात ‘आकार’ घेऊच शकत नाही. कल्पनेतून ती आकारात ‘उतरते’ तेव्हा हिणकस गोष्टीच तो आकार पेलत असतात. जसा मृण्मय देह चैतन्य, आत्मतत्त्व धारण करत असतो.!


*** 

Friday, 1 April 2016

आपल्याही हालचाली अशाच कुणी निरखत असेल काय?

१९ जून १९९७

      काल आम्ही टेकडीवर फिरायला गेलो होतो. निघताना वाटलं नव्हतं की वरपर्यंत जाऊ. पण सहज जमलं. जरा थांबून अनुभवला भवताल. खाली उतरताना एका जागी बसावसं वाटलं. बसलो. आकाशाचा भव्य घुमट नेहमीच लक्ष वेधून घेत असतो आपल्या नित्य बदलत्या विलोभनीय रूपांनी. काल टेकडीच निरखत बसले. टेकडीत सरळ उभा छेद देऊन रस्ता करतायत. एका प्रचंड यंत्राच्या सहाय्यानं दगड माती बाजूला करायचं काम चाललंय. तिथेच बाजूला त्याचा भला मोठा ढीग तयार होतोय. टेकडीची ही उलथापालथ पाहातेय अधुनमधून.

तंद्रीत विचार करता करता जमिनीवर समोर लक्ष गेलं. मुंगळ्यापेक्षा किंचित मोठा एक किडा दिसला. चकचकित निळसर काळा रंग, चार-सहा पाय, दोन मिशा आणि एवढुसं धड. स्वतःच्या आकाराहून मोठा एक खडा (तो गोल दिसत होता. पोकळ होता की काय कोणजाणे.) मिशांनी ढकलत खाच खळग्यातून, त्याच्या दृष्टिनं कडेकपार्‍यातून तो कुठेतरी चालला होता. विलक्षण वाटत होतं त्याचं ते खडा ढकलत कुठेसं जाणं. एके ठिकाणी तो थांबला. दमला असावा असं वाटलं. पण नाही. मातीत रुतलेल्या दुसर्‍या त्याहून मोठ्या खड्याला उचकटून काढायचा प्रयत्न करत होता. खालून पायांनी माती उकरून ( माती पण कसे खेळ करू देते सगळ्यांना ना? कुणी अशी उकरतं माती तर कुणी प्रचंड यंत्राच्या सहाय्यानं..) मिशा की डोक्यानं तो त्या खड्याला धडका देत होता. त्याच्या मानानं ती प्रचंड मोठी शीलाच होती. त्याचे प्रयत्न फसले. सगळं तसंच तिथेच टाकून तो दुसरीकडे निघाला. बरोबर ‘तो खडा’ होताच आता वाटायला लागलं की ते कदाचित अंड्याचं कवच असेल. आत चिमुकली अंडी असतील? कोणजाणे किड्यांचं पुनरुत्पादन कसं होतं ते... तो किडा स्वतःहून मोठा खडा ढकलत चाललाच होता... त्याच्या गावीही नसेल की आम्ही त्याच्या हालचाली निरखतोय ते!

      अंधार झाला तसे आम्ही परतलो. पाऊस केव्हाही येईल ही शक्यताही होतीच. मोठा पाऊसच काय थोडी दमदार वार्‍याची झुळुक जरी आली तरी तो किडा त्याच्या दृष्टिनं मौल्यवान अशा त्या खड्यासह फेकला जाईल कुठेही. काहीच उरणार नाही त्याचं असं!

      आपल्या यच्चयावत् हालचाली अशाच कुणी निरखत असेल काय?

***   

२५ जून १९९७

संस्थेत फिरायला जाते रोज सकाळी. कडक उन्हाळा होता.. थंडी होती.. सध्या पावसाळा आहे. संस्थेतल्या झाडांशी दोस्ती झालीय. त्यांच्यातले बदल निरखत असते. निव्वळ खोडं आणि वाळक्या फांद्या असतात कित्येक दिवस.. गळून पडलेल्या पानांचे ढीग असतात. चालताना चुरा होतो त्यांचा. इतका बारीक की मातीत मिसळून जातो. आता पाऊस पडतोय ना तर त्या पानांचा थर जमिनीचाच भाग झालाय. असं वाटलं, ही जमीन नाही. शेकडो युगं दर ऋतुत गळणार्‍या पानांचे थर आहेत एकमेकांवर साचलेले! आणि ही ताजेपणानं चमकणारी झाडं आहेत ना ती म्हणजे जमीन आहे आतलं सृजनेच्छेचं वादळ घेऊन उफाळून वर आलेली..!  
***

२६ जून १९९७

      एक कविता लिहिली या आशयाची.. कविता म्हणजे फँटसाइजिंगच! फँटसाइज करण्यामुळं आपलं आकलन वाढू शकतं. समज वाढू शकते. एवढंच नाही तर फँटसाइज करता येण्यानंच फँटसाइज न करणं म्हणजे काय ते कळू शकतं... जगताना आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्या गोष्टी नकळत फँटसाइज करतो. त्या आहेत तशा, तेवढ्याच बघायला आलं पाहिजे.

Tuesday, 29 March 2016

आपलं मन म्हणजे अजबच आहे ना?

१३ जून १९९७

      काल विमला ठकार यांचं ‘ध्यानमय दैनंदिन जीवन’ हे छोटसं पुस्तक वाचलं. आवडीचा विषय असल्यामुळे सध्याच्या वेगळ्या मूडमधेही वाचता आलं. मूळ इंग्रजी मिळवून वाचावसं वाटलं. त्यात एके ठिकाणी म्हटलंय, आपलं मन काही केवळ मेंदूत स्थानबद्ध झालेले नसते तर संपूर्ण, अगदी नखशिखांत आपण म्हणजेच आपलं मन असते. हे वाचताना क्लोनिंग पद्धतीनं मेंढी बनवली त्या संदर्भातली नुकतीच वाचलेली सगळी माहिती आठवली. आपली प्रत्येक पेशी एक पूर्ण अस्तित्व असते. बीजात वृक्ष लपलेला असावा तसं प्रत्येक पेशीत एक पूर्ण अस्तित्व असणार..! (गझलेचा प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असतो.. हे कशाला आठवलं इथे? मजाच आहे मनाची.. असो.)
     
      ध्यान साधनेनं निरीक्षण करण्याची कला आत्मसात केली जाते तेव्हा आपण आपल्याला समोर ठेवून आपलं निरीक्षण करू शकतो. आपल्या चांगलेपणाबरोबर आपल्या क्षूद्रपणाचेही दर्शन आपल्याला घडते. या संदर्भात या पुस्तकात खूप छान लिहीलंय- अशा निरीक्षणानंतर तुम्ही तुमच्या क्षूद्रपणाचे बेगुमान समर्थन करणार नाही. तेव्हा तुम्ही एका विलोभनीय अशा असहाय अवस्थेत उभे असता. अशी निव्वळ असहायता अथवा असुरक्षितता म्हणजेच खरी निरागसता.. इनोसन्स..!
***  

१८ जून १९९७

      मी रोज लिहायला बसते त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघितलं की झाडं दिसतात. मोठी झालीयत आता ती. पानांनी गच्च भरलीयत. त्यांच्या पलिकडे एक इमारत आहे. अर्धवट बांधकाम झालेली. झाडांच्या आड झाकली गेलीय. पण मधल्या फटींमधून दिसते ती. त्यात एक खोली बांधली असावी. दार (?) आमच्या बाजूला. बाकीच्या बाजू पूर्ण बंद असाव्यात. कारण इथून फक्त अंधार दिसतो. त्या अंधाराचा आकार वेड्यावाकड्या त्रिकोणासारखा आहे. तो रोज दिसतो मला आणि उगीचंच बर्म्युडा ट्रँगलची आठवण होते. आपलं मन म्हणजे अजबच आहे ना? कशाशी काय रिलेट करेल सांगता येत नाही. इतकंच नाही तर त्यानं अशीही कल्पना करून टाकली की आपल्या प्रत्येकात असा एक बर्म्युडा ट्रँगल असतो. त्याचा कुणालाही, अगदी आपल्यालाही तपास लागत नाही. त्याच्या जवळपास गेलेले आपले प्रश्न उत्तर घेऊन कधीच परत येत नाहीत. आतल्या आत गडप होऊन जातात..!

***

Monday, 28 March 2016

अंतर फक्त स्थळाचं नाही काळाचंही...

२७ मे १९९७

      ‘एकविसाव्या शतकातील मराठी साहित्याचे भवितव्य’ या विषयावर काल चर्चासत्र झालं. सरोजिनी वैद्य चांगलं बोलल्या. त्या म्हणाल्या मी दुरून आले याचं इथं कौतुक झालं. पण इथं ९१ वर्षांचे द.न. गोखले आलेत... हे ऐकताना गावाच्या अंतरासारखं वयाचंही अंतर असतं (म्हणजे लहान मोठा असं नव्हे) असा काहीसा फील आला. ९१ वर्षांपूर्वी एक जन्म झाला तेव्हापासून ९१ वर्षे सतत तो काळासमोरून सरकतो आहे. हे सरकणं हे अंतर..

      क्ष आणि य हे दोघं अ या ठिकाणी आलेत. क्ष ९१ वर्षांचा आणि य ६१ वर्षांचा. क्ष पुण्याचा रहिवासी य मुंबईचा. क्ष हा केव्हापासून प्रवास करतोय.. पहिल्या वर्षापासून आज ९१ वर्षापर्यंत. किती दुरून आलाय तो. किती पाहिलंय, अनुभवलंय त्यानं.. पोचल्याचा बिंदू एक पण प्रवासाला निघाल्याच्या बिंदूंमधे केवढं अंतर..!  अंतर फक्त स्थळाचं नाही काळाचंही...
***

३ जून १९९७

      कुठलीही व्यक्ती, घटना तिची अवस्था सगळं काही ‘एक’ एवढं असतं. एका अर्थी पूर्ण असतं. झाडाला वर एक पान फुटतं तेव्हा खाली मुळं वरच्या पानांच्या वाढीला तोलणार्‍या दिशेनं वाढत असतात. म्हणूनच तर वर तिरकं, वाकडं कसंही वाढलेलं झाड आपला तोल सावरत ऊन पाऊस वार्‍यात उभं असतं. एखाद्या व्यक्तिमत्वातल्या एखाद्या उणीवेला तोलणारी दुसरी एखादी धन बाजू त्याच व्यक्तिमत्वात असते. असं समग्र आकलन हाच खरा आपल्या स्थैर्याचा आधार होऊ शकेल.
*** 

Thursday, 24 March 2016

वादळ कोंबून भरलेली पिशवी आहे मी..

९ मे १९९७

सई,
आज थोडं काठावर येता आलंय. इथं आल्यावर कळतंय की धुमसणारं एक वादळ (कसलं कोणजाणे. वादळाला कुठं नाव असतं? वादळ वादळ असतं फक्त.) कोंबून भरलेली पिशवी आहे मी. वादळालाच मिठी मारून बसलेय. नि त्यालाच घाबरतेय. ते निघून गेलं तर उरणार्‍या पोकळीची अधिक भीती वाटतेय का मला?
     
     
१६ मे १९९७

सई,
      तुझ्यापर्यंत पोचायला एखादी फट शोधणंही किती कठीण जातंय..! तब्येतीची कुरकुर किती दिवस चालणार कोणजाणे. सगळं तर करतेय. पण नंतर उरत नाहीए तुझ्यासाठी माझ्यातलं काही.. असूदे. कदाचित ही तडफड, ही अनावर ओढ सगळ्यातून मोकळी होईन तेव्हा असेल की नाही कोणजाणे. किंवा ही ओढ म्हणजे ‘ट्रॅफिक जॅम’चा करसपाँडिंग इफेक्ट असेल..!
     
      दिवस दिवसाएवढे असत नाहीत कधी. ते कधी क्षण असतात तर कधी युगं असतात..!

१८ मे १९९७

सई,
      काल ‘भावपेशी’ या अरूण गद्रे यांच्या पुस्तकावरील चर्चेला गेले होते.. हे समीक्षेवरचं पुस्तक आहे. एका डॉक्टरच्या चिंतनातून आलेले मौलिक विचार आहेत त्यात. मेंदूत अनेक पेशी असतात. कोsहं? हा प्रश्न जिला पडतो ती भावपेशी..! विकत घेऊन वाचावसं वाटलं… एकानी आपल्या भाषणात एक कविता कोट केली- 

      Stone suffers
      From its stoneness
Light suffers
From its lightness
Word suffers
From its windness
I suffer
From my whoness..!


२० मे १९९७

सई,
ही घुसळण आता अनावर झालीय. धावत्या गाडीत बसलेले असलो की गाडीचा वेग गाडीत स्थीर असलेल्या आपल्याला येतो म्हणतात. सध्या मी अनुभवतेय तो वेग कुठल्या चक्रीवादळाचा? अलगद उचलून घे वर मला यातून. प्रत्येक निर्माणाच्यामागे एक वेदनांचे वादळ असते. पण प्रत्येक वादळाच्या निवळण्यातून काही जन्मते का?.. हो म्हण सई.. मग सोपं जाईल घुमत राहाणं..

***