१३.४.२००६
हेलेन केलरचं आत्मचरित्र वाचायला घेतलंय. अंध, मूक, बधीर असलेल्या या बाई कशा शिकल्या ते वाचताना भाषेसंबंधीचं काही खोलातलं लक्षात येतंय..... आपल्या बाह्य जगाच्या आकलनानुसार पुस्तकात दिसणे, पाहणे, बघणे ही क्रियापदं खूपदा आलीयत. सांगणे, ऐकणे ही क्रियापदंही आहेत. दिसणं, ऐकणं या संवेदनातून आपल्याला आकलन होत असतं त्यामुळे त्याला ती क्रियापदं योजली गेली. ज्या व्यक्तीला ऐकण्याचा, बघण्याचा अनुभवच नाही ती व्यक्तीही लिहिताना.. भाषेतून व्यक्त होताना या क्रियापदांशिवाय मांडणी करूच शकत नाहीए. उदा. एक वाक्य आहे- ‘सांताक्लॉज आल्यानंतर काय करतात ते मला बघायचे होते.’ यात बघणे क्रियापदा ऐवजी दुसरे कोणते क्रियापद वापरता येईल? आणि दुसरं काही वापरलंच तर वाचकांना ते कसं समजेल?
मी आत्मचरित्राचा अनुवाद वाचते आहे. मूळ काय लिहिलंय पाहायला हवं...
भाषेचा असा विचार करताना लक्षात आलं की आपल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी डोळ्यांचा वापर सर्वाधिक होतो. आकलनासाठी डोळे हे माध्यम सर्वाधिक वापरलं जातं. पण त्यामुळे स्पर्श ही संवेदना तिच्या पूर्ण क्षमतेने अनुभवली जात नाही.
भाषा/शब्द यांचं स्वरूप ध्वनी+आकार असं आहे. या दोन्ही गोष्टींच्या आकलनाची क्षमता नसलेल्यांनी भाषा कशी शिकायची? स्पर्शानं..! अक्षरांना स्पर्श करून. वस्तूंना स्पर्श करून... स्पर्शातून पाहायचं.. ऐकायचं.. बोलायचं... (ब्रेल लिपीबद्दल एक छान वाक्य आहे. There is a wonder in reading braille that sighted will never know to touch words and have them touch you back. -Jim Fiebig.)
लहान हेलेनला भाषेची ओळखच नाही. तरी तिला काही वाटत असणारच.. त्या वाटण्याचं माध्यम काय असेल? सौंदर्याच्या अनुभवाचा बरेचदा उल्लेख आहे. तो वाचून वाटलं की सौंदर्य हा दृष्टीचा विषय असं इतकं पक्क मनात बसलंय की सौंदर्याचा अनुभव स्पर्श.. गंध अशा इतर माध्यमांतूनही घेता येऊ शकतो हे पटकन लक्षातच येत नाही..
आपल्याला वस्तू दिसते म्हणजे काय? वस्तूविषयीचं काही एक आकलन आपल्या मेंदूत नोंदवलं जातं. तसंच काही वेगळ्या पातळीवरचं आकलन स्पर्शातून होत असेल.... स्पर्श संवेदना तीव्र असेल तर प्रत्यक्ष स्पर्श न करताही वातावरणातल्या हालचालींचा स्पर्श आपल्या असण्याला होऊ शकेल. कुणी आल्याचा वास येऊ शकेल. आपली एकूण क्षमता आपल्या सर्व संवेदनांमधे विभागली जात असेल. ज्यांना दिसत नाही त्यांची दृष्टीच्या वाटची क्षमता स्पर्श/गंधाला मिळत असेल. आवाजाचाही स्पर्श होऊ शकेल. न ऐकता आवाज झाल्याचं कळू शकेल. आवाजांनी वातावरणात कंपनं निर्माण होतात. त्यांचा स्पर्श होऊ शकेल.
केवळ स्पर्शानं अख्खी भाषा आणि त्या माध्यमातून अख्खं वस्तू-ज्ञान मिळवणं आणि ते शेअर करता येणं किती अवघड आहे..!
.......
१७.४.२००६
हेलेन केलरच्या आत्मचरित्रात श्रवण, दृष्टी यांच्या अभावातून आलेल्या मर्यादांवर कशी मात केली त्याविषयी शेवटी बराच खुलासा होतो.... स्पर्शानं कसं समजतं त्यासंदर्भात एके ठिकाणी फार सूक्ष्म विचार मांडलाय... म्हटलंय, ‘मला असे वाटते की मानवजातीच्या सुरुवातीपासून अनुभवलेल्या भावना आणि मनावर झालेले परिणाम ही एकत्र करण्याची आणि समजावून घेण्याची सूक्ष्म शक्ती आपणा सर्वांमधे आहे. प्रत्येक माणसाच्या अर्धजागृत स्मृतीकोशात हिरवीगार वनराजी.... अशा सर्व ऐंद्रिय संवेदनांची आठवण असते. ती आठवण किंवा मागील पिढीपासून मिळालेला तो ठेवा आंधळेपणा अथवा बहिरेपणा लुबाडून घेऊ शकत नाही. ही वंशपरंपरेनं आलेली शक्ती म्हणजे एक प्रकारचे सहावे इंद्रियच आहे म्हणाना. त्या आत्मशक्तीच्याच आधारे आपण बघू, ऐकू किंवा स्पर्श करू शकतो..’
मूळ इंग्रजी वाचायची उत्सुकता वाटते आहे.
प्रत्यक्ष बघणं, ऐकणं, स्पर्श करणं हे ते ते ज्ञान होण्यासाठीचं, त्या विषयीचं सूप्त ज्ञान जागृत करण्याचं केवळ निमित्त ठरत असेल का?
.....
अंधांच्या जीवनात स्पर्शाचं स्थान काय असेल ते सांगणार्या माझ्या एका कवितेच्या काही ओळी
दृष्टीने प्रवेश नाकारला त्यांना
स्पर्श झाला पान्हा त्यांच्यासाठी
स्पर्श त्यांची माता स्पर्श त्यांचा पीता
स्पर्श सर्व गात्रा बळ देई
सर्वांगास त्यांच्या फुटतात नेत्र
जिवलग मैत्र तेच त्यांचे..
(‘उत्तरार्ध’ मधून)
***
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment