२०.४.२००६
‘ज्ञाना’साठी श्रद्धेची गरज नाही आणि ज्ञानप्राप्तीनंतर भक्तीची गरज नाही हे आधीच्या लेक्चर्समधून लक्षात आलं होतं. भक्ती-अभ्यास वर्गात आज समजलं की ज्ञान मिळवण्याची पात्रता येण्यासाठी विवेक, वैराग्य, क्षमादी सहा गुण, आणि मुमुक्षुत्व (मोक्ष मिळण्याची इच्छा) या साधन चतुष्टयाची गरज आहे. असा मुमुक्षु (मोक्ष मिळण्याची इच्छा असणारा साधक) वेदान्त वाक्यांचे योग्य गुरूकडून श्रवण करतो. त्यावर मनन चिन्तन, निदिध्यास, तत्त्वपदार्थ शोधन... साक्षात्कार या मार्गाने ज्ञान मिळवू शकतो. असा ज्ञानातून झालेला साक्षात्कार क्षणिक नसेल. आणि असा ज्ञानी, जो ज्ञानपूर्व अवस्थेतच विवेकी, वैराग्यसंपन्न असेल तो ज्ञानी झाल्यावर कसा वागेल याची कल्पना करता येईल. अनिष्ट काही त्याच्या हातून घडणारच नाही...
अव्दैत वेदान्ताची ही भूमिका न सोडता ज्ञानेश्वरांनी भक्तीचा पुरस्कार केला हे विलक्षण आहे. पूर्णतः रॅशनल असूनही, नव्हे रॅशनल राहूनच सर्व समजून घेता येणं शक्य आहे. आणि अशा परिपूर्ण समजुतीनंतरची भक्तीच खरी भक्ती आहे. ती जगणं हार्दिक करेल, प्रेममय करेल. अशा भक्तीला पंचम पुरुषार्थ म्हटलं आहे. अमृतानुभव ग्रंथात ज्ञानेश्वरांनी भक्तीचं समर्थन फार सुंदर आणि बुद्धीला पटेल असं केलेलं आहे. ती ओवी-
‘अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभ मिळे ।
तरी स्वतरंगांची मुकुळे । तुरंबु का पाणी ॥१/५९॥
भावार्थ- पाण्याचा अखंड एकपणा अबाधित राहूनही पाणी आपल्या तरंगफुलांचा आस्वाद घेत असते तसा ज्ञानी भक्त भक्तीप्रेम अनुभवतो... ज्ञानी भक्ताच्या मनातील अव्दैत भाव स्थिर असल्यामुळे सगुण भक्ती केल्यानेही त्याच्या मनातील ऐक्याचे मुद्दल कमी होत नाही.
......
११.५.२००६
भारतीय तत्त्वज्ञानाची पूर्ण मांडणी मोक्ष हे साध्य केंद्रस्थानी ठेवून झाली. अशा मोक्षालाही गौण मानणार्या भक्तीला ज्ञानेश्वरादी संतांनी पाचव्या पुरुषार्थाचं स्थान देऊन चार पुरुषार्थांची चौकट ओलांडली. भक्तीचं हे स्वरूप साद्यंत समजावून दिल्यावर भक्ती-अभ्यास वर्गाची सांगता झाली... या निमित्तानं सर्वांनी भक्तीच्या स्वरूपाविषयी निबंध लिहायचा होता. मीही लिहिला....
......
२३.५.२००६
तत्त्वज्ञानाच्या वाचनाबरोबर इतर वाचनही चालू आहे. काल ‘आयदान’ हे उर्मिला पवार यांचं आत्मचरित्र वाचून झालं. उर्मिला पवार या व्यक्तीबद्दल काय ढालगज बाई आहे अशी समजूत व्हावी इतकं खरंखुरं थेट लेखन आहे. व्हीलनचा खराच राग यावा ही त्याच्या अभिनयाला पावती असते तसं उर्मिला पवार यांनी त्या किती ग्रेट आहेत याचं दर्शन न घडवता त्या त्या प्रसंगी त्या जशा आहेत त्याचं प्रामाणिक दर्शन घडवलंय....
पुस्तकात एका वेगळ्या आयुष्याचं दर्शन घडलं. इतकी गरीबी की पाणी घालून वाढवलेलं अन्न एका ताटात पसरून एकत्र जेवायचं. प्रत्येकानं मोजून घास घ्यायचे. कुणी एखादा जास्त घेतला तर त्यावरून भांडणं... दोन पैशाचं लोणचं आणायला जाण्याचा प्रसंग.. कुणीतरी वाढून दिलेला उरलेला/उष्टा भात एकत्र करून नदीत धुऊन घेऊन परत गरम करून खाणं... होळीत ‘इडा पिडा टळो...’ अशी प्रार्थना म्हटली जाणं... जन्मलेल्या मुलाला अंघोळ घालताना कानात चुळा टाकणं... अंघोळ झाल्यावर नखाची माती कपाळाला लावणं... असल्या असंख्य गोष्टी वाचून थक्क व्हायला झालं. किती गरीबी, अज्ञान, कसल्या कसल्या चालीरीती, किती सहज अन्याय.....करतोय, सोसतोय हेही समजू न देता होत राहणारा..!
तत्त्वज्ञानाच्या वाचनातून होणार्या वैचारिक आकलनाचा आनंद या जीवनदर्शनापुढे तग धरू शकला नाही.....!
***
आसावरी काकडे
No comments:
Post a Comment