२३
आपला खारीचा वाटा
२.७.२०००
स्वेच्छानिवृत्तीचा
विचार चालू आहे. निवृत्तीनंतरचं नियोजन म्हणून पीएच डीचा विचार करत होते. पण तो
विचार मनातून काढून टाकल्यावर तत्त्वज्ञान विषय घेऊन एम ए करावं हा विचार पकड
घ्यायला लागलाय. काल सिलॅबस वाचलं. रेने देकार्त अभ्यासाला आहे. कुठेतरी त्याच्या
विषयीचा लेख वाचून त्याचं तत्त्वज्ञान समजून घ्यायची उत्सुकता निर्माण
झाली....
देकार्त म्हणतो,
‘वेळ थोडा राहिलाय. अनादि-अनंताचे गुंते सोडवत बसायला मला वेळ नाही. ईश्वर आहे.
त्याने मला मुक्तच जन्माला घातलेय. स्वतःला तुच्छ, हीन न लेखता मला माझे काम
सर्वक्षमतेनिशी करणे शक्य नाही काय?..’
....
पुणे विद्यापिठात एम
ए (तत्त्वजान)चा अर्ज भरून झाला. इंटरव्ह्यू झाला. तत्त्वज्ञान विषय का घ्यावासा
वाटला?... मी सांगितलं, ‘घरातल्या वातावरणामुळे हा विषय जिज्ञासेचा झालेला आहेच...
पीएच डी साठी ‘बुद्ध, तुकाराम, गांधी यांचा मानव ते महामानव प्रवास कसा झाला याचा
एकत्रित अभ्यास करावा अशी कल्पना सुचली होती. पण हा विषय साहित्याच्या विभागात बसत
नाही, त्यासाठी तत्त्वज्ञान विषय घेऊन एम ए करावं लागेल असं समजलं. म्हणून अर्ज
करतेय...’
.....
१७.९.२०००
अर्ज मंजूर होऊन प्रवेश मिळाला. एक महिन्याची रजा घेऊन विद्यापीठात जायला सुरुवात झाली...
एकदा बसनी उतरून घरी
चालत येताना एक माणूस दिसला. आजारामुळे त्याचा एक पाय आणि एक हात वाकडा झाला होता.
पायरी उतरताना त्याला दुसर्याचा आधार घ्यावा लागला. उतरून तो लंगडत चालायला
लागला. त्याला पाहून उगीच आठवून गेलं की ‘आजारा’शिवाय आयुष्याजवळ पुष्कळ काही
असतं. तो गृहीत धरून त्याला त्याच्या जागी ठेवून दिला की इतर गोष्टीत समरसायला
होतं. तो चालताना काहीतरी पुटपुटत होता. वाटलं की तो नामस्मरण करतोय. जरा पुढे
गेल्यावर स्पष्टच ऐकलं. तो ‘ओम नमः शिवाय’चा जप करत होता. एक गहीवर आला. नंतर बरंच
काही घडलं... तरी स्मृतीपटलावर तो ‘ओम नमः शिवाय’ म्हणणारा माणूस तरळत राहिलाय.
त्यानं कुठली साधना केली असेल?
.....
३, ७.१०.२०००
आज बँकेत जायचंय. महिनाभर रजा भोगून घेतली. कॉलेजचा अनुभव झाला. तत्त्वज्ञानाचा आवाका लक्षात आला आणि शिकवण्याचाही. सध्यातरी नोकरीला पर्याय नाही असा फील आलाय.
प्रत्येक कळणं (आकलन) हे एका अर्थी प्रतिकात्मकच असतं. माती घेऊन त्याला वेगवेगळे आकार द्यावेत तसे प्रत्येक आकलन म्हणजे भाषेत व्यक्त झालेला आकार. एक चिन्ह. शब्द-ज्ञान म्हणजे या चिन्हाचं ठरलेल्या नियमांनुसार डीकोडिंग करणं. आत्मज्ञान म्हणजे ते स्वतःला आपणहोऊन कळणं... पण आपलं कळणं हे स्वतंत्रपणे आपलं असतं का मुळात? जन्माअधीच्या आणि नंतरच्या संस्कारातूनच ते उगवत असणार...
आकाशाचं आकलन न होणं सहन करत कसं काय जगू शकतो आपण?
कितीही उंच उडी
मारली. अगदी बांबूचा आधार घेऊन उंच उडीचे रेकॉर्ड केले तरी आकाशाच्या संदर्भात
त्या उडीला काय अर्थ?... तरी जिवाच्या आकांताने उंच उडीचा सराव का चालू ठेवायचा?
.....
१७.१०, ७.११.२०००
सध्या नोकरी एके
नोकरी चाललंय... काम अंगवळणी पडलंय. हळूहळू त्यात रमायला झालंय. व्हि आर एस स्कीम
येण्याची चिन्ह दिसत नाहीएत... एम.ए. बारगळलंय...
.....
२०.११.२०००
मी स्वस्थता,
प्रसन्नता, शांतता मिळवू पाहतेय... कवितेला तर अस्वस्थतेचं अग्निकुंड सतत पेटतं
ठेवावं लागतं.... कवितेचा रोल (माझ्या आयुष्यातला) आता संपला आहे काय? मला होत
असलेल्या आकलनासाठी दुसरे एखादे माध्यम शोधायला हवेय? की जगणं हेच अभिव्यक्तीचं
माध्यम करू? जे माझं प्राथमिक ध्येय आहे...
.....
३१.१२.२०००
सगळ्या बाजूचे दरवाजे बंद झाल्यासारखी... बँकेची एकच वाट राहिल्यासारखी स्थिती झाली. अस्थिरतेतून बाहेर येत सहर्ष बँकेत रमले... आणि आता ज्याची वाट पाहात होते ती स्वेच्छा निवृत्ती योजना आली आहे... आनंद आहे..! समाधान आहे. नवं जबाबदारीचं काम जमेल की नाही असं वाटत होतं. पण निष्ठेनं, जिद्दीनं केलं आणि जमलं..! रजा न घेता कामात असतानाच निवृत्त व्हायचं असं ठरवलेलं तेही जमतंय...!
उद्या एकविसाव्या
शतकाचा पहिला सूर्योदय. या नव्या शतकाचा शेवटचा सूर्योदय आपण पाहाणार नाही. या दोन
सूर्योदयांमधल्या घडामोडींमधे आपला खारीचा वाटा असेल तो आपल्या परीनं अर्थपूर्ण
करणं, सुंदर करणं आपल्या हातात आहे..!
***