Sunday, 24 April 2016

तिच्या फूलपाखरूपणावर कुठलं कवच घालता येईल

      ३० ९ १९९७

पिऊन झालेल्या चहाचा कप टेबल पुसायचं फडकं पेन त्यावर चष्मा डायर्‍या पुस्तकं मासिकं घड्याळ बॅटरी कापूस रेडिओ पेनस्टँड पैसे रिकामी फाइल कॉर्डलेस फोन आलेली पत्रं सुपारीची पुडी लेटरहेड चष्म्याची केस चिकटवलेलं चित्र... अडीच बाय चार फुटाच्या चौकोनात पसरलंय सगळं. आणखीही काही मावू शकेल इथे. ‘असूदे पसारा कोण इथे मुक्त’ या माझ्याच ओळी आठवत कशाकशानं भरलेली मनाची पिशवीही ओतू पाहतेय मी या चौकोनात..!

***

१० १० १९९७

आज सकाळी मेडिटेशनच्या वेळी खूप छान वाटलं. काही हवं असण्याचा भाव नव्हता. नुसतं जाणवून घ्यायचं की स्वयंभूपणे गोष्टी होत असतात. त्या प्रेरणांच्या स्वागतासाठी आपण मोकळं राहायचं फक्त... काही गाठल्याचा.. मिळवल्याचा भाव होता. उंच उडीत वर, त्या एका उच्च बिंदूशी असण्याचं जे निमिष तितकंच का होईना..!

मग नेहमीसारखी फिरायला गेले. मेघना भेटली. काहीतरी उत्कटतेनं तिला सांगायचं आहे असं वाटत होतं. पण वेगळंच काहीतरी बोलणं झालं. आता ती अकोल्याला जाणार आहे. तिला एकटं जाऊ देताना तिच्या फूलपाखरूपणावर कुठलं कवच घालता येईल असं वाटून गेलं...

.... कुठल्या संदर्भात मनात आलं आठवत नाही. पण असं वाटून गेलं की, ‘पहले जीने की इच्छा मरती है बाद में मनुष्य...’ मात्र एखाद्याची जगण्याची इच्छाच इतकी तीव्र असते की तिचे पडसाद घुसतात कुणाकुणाच्या मनात आणि त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी ते ओढल्यासारखे धावून जातात. मदत दुसरं कुणी करत नाही. ती व्यक्ती आपल्या अजाण इच्छाशक्तीनं मदत करवून घेते... आजच्या काळात भोवती इतकी अनास्था, तुटलेपण, बेफिकीरी दिसतेय.. या दृश्य वास्तवाचं दुसरं टोक तिथं असेल...

काल एक पत्र आलंय. बच्चूलाल अवस्थी ‘ज्ञान’ यांचं. ‘मौन क्षणों का अनुवाद’ या माझ्या कवितासंग्रहाच्या शीर्षकाचं मर्मच उलगडलंय त्यांना. पत्रात त्यांनी लिहिलंय, ‘जो मानस में एक क्षण की बात होती है वह अनुवाद में कई क्षणों का समय लेती है’ किती खरं आहे ना हे?

आज सकाळी अनुभवलेला क्षण अनुभवत असतानाच शब्दबद्ध व्हायला लागला तेव्हा शब्दांना रोकलं. वाटलं तो क्षण ‘पूर्ण’ अनुभवून तर होऊदे..!


***

No comments:

Post a Comment